अपना Time आएगा… गली बॉय निघाला ऑस्करला!

रणवीर सिंह आणि आलिया भटचा गली बॉय या चित्रपटाला ऑस्कर २०२० साठी नामांकन मिळाले आहे.

Mumbai
Gully Boy Movie
गली बॉय

धारावीची झोपडपट्टी आणि या बकाल वस्तीमधून रॅप सिंगर होण्याचे स्वप्न उराशी घेऊन धडपडणारा युवक, रॅप संगीताची जादू आणि वास्तवाच्या जवळ जात तरुणाईवर केलेले भाष्य… असा आजच्या युवा पिढीचा चित्रपट असलेल्या रणवीर सिंग आणि आलिया भट्ट अभिनीत ‘गली बॉय’ हा सिनेमा भारताकडून ९२ व्या ऑस्कर पुरस्कारासाठी पाठविण्यात येणार आहे. ‘बेस्ट इंटरनॅशनल फिचर फिल्म’ या कॅटेगरीसाठी गली बॉयची भारताकडून निवड करण्यात आली आहे. या सिनेमातील ‘कौन बोला मुझसे न हो पायेगा? कौन बोला? कौन बोला? अपना time आएगा’, या गाण्याने तरुणाईला आपल्या तालावर थिरकायला लावले होते. तोच ताल आणि जोश आता ऑस्करवर कोणती जादू चालवतो याकडे आता भारतीयांच्या नजरा लागल्या आहेत.

‘गली बॉय’सह ‘उरी द सर्जिकल स्ट्राइक’, ‘केसरी’, ‘बधाई हो’, ‘आर्टिकल १५’ आणि ‘अंधाधून’ आदी चित्रपट ऑस्करवारीच्या स्पर्धेत होते. मात्र या सर्व सिनेमांवर गली बॉयने मात केली आहे. गेल्या वर्षी भारताने ऑस्करसाठी ‘व्हिलेज रॉकस्टार’ची निवड केली होती.

झोया अख्तरने या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. या आधी मेलबर्नमध्ये पार पडलेल्या भारतीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये गली बॉयला सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार देण्यात आला होता. त्याशिवाय दक्षिण कोरियातील २३ व्या बुकियॉन इंटरनॅशनल फॅन्टॅस्टिक फिल्म फेस्टिव्हलमध्ये नेटवर्क फॉर द प्रमोशन ऑफ एशियन सिनेमाचा पुरस्कारही गली बॉयला मिळाला होता. धारावीतील एका स्लम रॅपर्सच्या जीवनावर आधारित हा सिनेमा आहे. यापूर्वी झोया अख्तरने ‘लक बाय चान्स’, ‘जिंदगी न मिलेगी दोबारा’ आणि ‘दिल धडकने दो’ आदी सिनेमांचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटातील अभिनयामुळे रणवीर आणि आलीय यांच्यावर कौतुकाचा मोठा वर्षाव झाला होता.