घरमनोरंजनहॅम्लेट ... शोकनाट्याचा महानुभव...

हॅम्लेट … शोकनाट्याचा महानुभव…

Subscribe

हॅम्लेट नाटकाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी हा लेख नक्की वाचा...

शेक्सपियर हा महानाट्याचा कर्ताकरविता मानला जातो. किंग हेनरी, किंग रिचर्ड सारखी ऐतिहासिक नाट्यमालिका, कॉमेडी ऑफ एरर्स, अ मिडसमर नाइटस ड्रीम सारखी विनोदी, रोमिओज्युलिएट आणि अँथनीक्लियोपात्रासारखी रोमँटिक ट्रॅजेडी अशी त्याची ३४ नाटके आहेत. पण  शेक्सपियर आजही मुख्यत्वे मानला जातो तो त्याच्या किंग लियर, मॅकबेथ, ऑथेल्लो आणि हॅम्लेट या महाशोकनाट्यांमुळेच. या शोकनाट्यांचे प्रयोग सोळाव्या शतकापासून आजवर अव्याहतपणे सुरू आहेत. मराठीत ही शोकनाट्ये दोन प्रकारे सादर झाली. एक  भाषांतररुपात तीन अंकात बसवून  आणि दोनवसंत कानेटकरांनी त्यांचे आजच्या सामाजिक परीघात केलेले रूपांतर. अगदी आपली ऐतिहासिक नाटके किंवा नटसम्राट  (किंग लियर) देखील शेक्सपियरीयन ट्रॅजेडीवर बेतलेली आहेत. कानेटकरांचे गगनभेदी तर हॅम्लेट, मॅकबेथ, ऑथेल्लो आणि किंग लियर यांतील भावाचे एकत्रीकरण होते. थोडक्यात, अगदी संगीत नाटकांपासून ते आजवरमराठी नाटकांत शेक्सपियरला पर्याय नाही.

हॅम्लेटहा शेक्सपियरचा मास्टरपीस. त्यात माणसाच्या अंतर्मनाचे जे पडसाद नायकामध्ये उमटताना दिसतात ते मनोव्यापाराचे सखोल चित्रण आहे. फ्रॉइडने आपली थियरी मांडण्याच्या काही शतके आधीच हे घडले आहे, म्हणून निर्विवाद महानाट्य. हॅम्लेटचे नाना जोग लिखित नाट्य हे पहिल्या प्रकारचे, म्हणजे भाषांतरित आहे. शेक्सपियरच्या महानाट्याचा थेट अनुभव देणे, हा त्याचा हेतू.  भव्य किल्ला, उत्तम कलाकार आणि तांत्रिक टीम, यांनी तो साध्य झाला आहे. मूळ पाच अंकातील नाटक तीन अंकांत बसवताना काही गोष्टी त्यांतून निसटणे अपरिहार्य होते. मात्र हाती उत्तम टीम असल्याने गोष्टी अगदीच जुळून आल्यात.

- Advertisement -

हॅम्लेट हा डेन्मार्कचा राजकुमार, आपल्या वडिलांचा मृत्यू आणि त्या पाठोपाठ आई गर्ट्र्युडनेकाका क्लोडियस सोबत केलेल्या विवाहामुळे अस्वस्थ आहे. त्यात एल्सिनोरच्या किल्ल्यात त्याच्या वडिलांचे भूत वावरते आहे. त्याचा परममित्र होराशीयो आणि त्याला ते दिसते आणि आपल्या मृत्युचा सूड घ्यायला बजावते. पण हा सूड त्याने आपल्या तितक्याच प्रिय आशा व्यक्ती सोबत घ्यायचा आहे. ही हॅम्लेटची शोकांतिका आहे. एका प्रिय व्यक्तीसाठी तितक्याच प्रिय व्यक्तीवर सूड घेणे. हॅम्लेट विद्यार्थीदशेत आहे. माणसांमधील संबंधांचे हे विलक्षण, दुर्गम रूप त्याला हादरवून गेले आहे. अशा दशेत तो असताना त्याने आपल्या प्रेमाचा स्वीकार करावा असे ऑफिलियाला वाटते. हॅम्लेट सोबतच्या सर्वांकडे, त्यांच्या हेतुकडे संशयाने पाहू लागला आहे. त्याचा सद्सद्विवेक भुताने सांगितलेल्या गोष्टीवर विनाधार विश्वास ठेवायला तयार नाही. त्याला सत्य जाणून घ्यायचे आहे. सूड घ्यावा की स्वत:ला संपवावे? हा त्याच्यापुढील यक्षप्रश्न आहे. हॅम्लेटच्या आतील हे द्वंद्व चिरंतन आहे, कालातीत आहे. म्हणूनच हॅम्लेट हे महानाट्य आहे.

नेपथ्यकार प्रदीप मुळे यांनी स्खलनशील पात्रांच्या या नाट्यासाठी पार्श्वभूमी म्हणून, एल्सिनोरचा भव्य किल्ला संपूर्ण ग्रे शेडमध्ये उभा केला आहे. त्याची भव्यता ठसत रहावी म्हणून त्यांनी किल्ल्यातील जागा मोकळी ठेवली आहे. मुख्य म्हणजे तटबंदी आणि राजाचे स्थान यासाठी व्हर्टिकल स्पेस वापरून संपूर्ण रंगावकाशाचा या भव्यतेसाठी वापर केला आहे. दिग्दर्शक चंद्र्कांत कुलकर्णी यांनी सर्वप्रथम सर्व कलाकारांच्या उच्चार आणि संवादफेकीवर घेतलेली मेहनत जाणवते. हॅम्लेट मधील सर्वच कलाकार नाटक स्पष्टपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतात. क्लोडियस तुषार दळवी, पोलोनीयस सुनील तावडे आणि मुग्धा गोडबोले, ऑफिलिया मनवा नाईक हे खास करून. भूषण प्रधान यांनी लेयार्टीस विशेष लक्षवेधी केलेला आहे. राहुल रानडे यांचे संगीत नाटकाच्या स्वरुपाला अनुरूप वातावरण निर्मिती करते. महेश शेरला यांची वेषभूषा आकर्षक.

- Advertisement -

मात्र वेगळा उल्लेख करायला हवा, हॅम्लेट, सुमित राघवन यांचा. त्यांनी हॅम्लेटच्या मनातील द्वंद्व नेमके पकडले आहे. संपूर्ण ऐतिहासिक वातावरणातील त्यांचा हॅम्लेट वास्तववादी शैलीने आपल्याशी जोडला जातोहॅम्लेटचे अनिर्णयन, त्याची घालमेल, काकाविषयी तीव्र राग पण सत्याचा आग्रह. ऑफिलियाची अस्थानी प्रेमअपेक्षा. कुठेही तो निर्णयन करू शकत नाही. ही दोलायमानता सुमित राघवन उत्कृष्टपणे मांडतात. त्यांचा हॅम्लेट हा मोठ्या काळानंतर रंगमंचावर आलेला महानायक आहे. त्यांनी रंगभूमीसाठी जास्त वेळ द्यायला हवा, असे नाटक बघून वाटते.

का पहावे?
सुमित राघवन यांचा हॅम्लेट आणि जिगीषाअष्टविनायक यांची भव्य निर्मिती.


आभास आनंद

(लेखक नाट्य अभ्यासक आहेत)

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -