घरफिचर्सधार आणि काठ

धार आणि काठ

Subscribe

वाघूर नदीतल्या धार आणि काठाचं मिलन ‘सवानी’त पहावं. डोळ्यांचं पारणं फेडणारं दृश्य असतं इथे. सावनी हा वाघूरचा माथ्यावरचा समृद्ध काठ. माझं मन इथे जास्त रमायचं. इथून गायरान जवळ होतं. आमच्या वाडवडिलांचं ‘भाटी’ हे वावरही सावनीपासून चर्‍हाटभर अंतरावर होतं. नदीत मनसोक्त पोहचण्याचा, मासे खेकडे पकडण्याचा आनंद सवानीत मिळायचा. नदीला पूर आलाय हे सावनीतल्या खळखळाटावरून सहज कळे. हा भाग थोडा पसरट, उथळ आणि खडकाळ होता. एकट्यानं खेकडे-मासे पकडणं इथे शक्य असायचं.

धार आणि काठ नदीचे अविभाज्य घटक. काठ हा देह मानला तर धार नदीचा आत्मा आहे. नदी वाहते तेव्हा काठ जिवंत असतो. धार दोन्ही काठांची तहान भागवते. काठांवरची जीवसृष्टी समृद्ध करते. धारेचं मंजुळ संगीत मंत्रमुग्ध करतं काठाला. काठ धारेला वाहू देतात आपल्या उदरातून. डोहाचा तळ हा काठाचा पायथाच असतो. काठ जितका उंच तितकी धार खोल जाते तळ गाठत. धार हीच काठांची धमनी. काठ खोदत जाल तर सापडतो धारेचा अंश. धारेला उपसलं तर काठ सापडतोच अंतरंगात. काठ अथांग आहे. धार अमर्याद आहे. धार आणि काठ यांचं नातं अतूट आहे. नदीची धार या धरेला भिजवत आलीय युगानुयुगे.

वाघूर नदीतल्या धार आणि काठाचं मिलन ‘सवानी’त पहावं. डोळ्यांचं पारणं फेडणारं दृश्य असतं इथे. सावनी हा वाघूरचा माथ्यावरचा समृद्ध काठ. माझं मन इथे जास्त रमायचं. इथून गायरान जवळ होतं. आमच्या वाडवडिलांचं ‘भाटी’ हे वावरही सावनीपासून चर्‍हाटभर अंतरावर होतं. नदीत मनसोक्त पोहचण्याचा, मासे खेकडे पकडण्याचा आनंद सवानीत मिळायचा. पूर्वेकडच्या काठावरचं सुपीक वावर एका शेतकर्‍याने सव्वा रुपयाला विकत घेतलं होतं म्हणून या वावराला आणि त्यापुढच्या नदीभागाला ‘सवानी’ हे नाव पडलं. नदीला पूर आलाय हे सावनीतल्या खळखळाटावरून सहज कळे. हा भाग थोडा पसरट, उथळ आणि खडकाळ होता. एकट्यानं खेकडे-मासे पकडणं इथे शक्य असायचं. नदी तीन धारांमध्ये विभागली होती सवानीत. उतारावरून पाणी प्रचंड वेगानं खडकांवर आदळायचं. या पाण्याचा आवाज इतका मोठा असायचा की जवळच्या माणसाचं बोलणं ऐकू येईना. शिवाय नावेच्या आकाराचे महाकाय पाषाणही होती इथं. गुरांमागे फिरून दमलो की त्यांना नदीवर मोकाट सोडून मी वाघूरच्या धारेत मनसोक्त पडून रहायचो. मासे पकडून थकवा आला की दगडावर पडून रहायचो. तन-मनातून वाघूर वाहायची. नदी बोलते असं ऐकून नवल वाटेल; पण सावनीतल्या भागात वाघूर बोलायची. तिच्या आवाजात स्वतःचा लहेजा होता. रांगडेपणा होता.

- Advertisement -

चैत्र-वैशाखात वाघूरचा जोर-शोर मंदावलेला असायचा. काठापासून धारेचं अंतर ओसरलेलं असायचं या काळात. रानात उलंगतीचे दिवस असल्याने गुरं सुनाट सोडली जायची. मजूर माणसं बायांच्या हातची कामं जवळपास संपलेली असायची. घरातल्या डाळी-साळी खाऊन मातकट झालेल्या तोंडाची चव पालटण्यासाठी ही माणसं वाघूरभर मासेमारी करायची. मासोळ्या धरायच्या कितीतरी तर्‍हा वाघूरकाठच्या माणसांकडे होत्या. जो तो आपापल्या परीने मासेमारी करायचा. सामूहिक मासेमारीचा मला आवडणारा एक रोचक प्रकार सवानीत चाले. तो म्हणजे ‘धार दाबणे’. नदीची अख्खी एक धार बांध घालून अडवणे. तिचं पाणी दुसर्‍या धारेत वळवणे. हे मेहनतीचं काम असायचं. कधी मोहल्ल्यातले लोक, कधी कोळीवाड्यातल्या माणसांची टोळी सावनीत कायम असे. एका टोळीत साधारणतः आठ ते दहा जण. कोळ्यांच्या टोळीत आत्माराम गोविंदा, प्रकाश नथ्थू, चिंधू चावदस आणि आमचे बाबा या कामातले माहीर माणसं. तर मोहल्ल्यातली अफजल, अजमुद्दीन चाचा, बशीर, काळा इब्राहिम ही शातीर. सवानीतल्या तीन प्रवाहांपैकी उत्तरेकडचा प्रवाह खोल आणि लांब होता. पण धार दाबून मासे पकडण्यासाठी ही उत्तम जागा. दगड मातीचा बांध घालून त्यातले मासे पकडणे याला एक अख्खा दिवस लागायचा. टोळीतल्या गड्यांची मानसिक तयारी महत्त्वाची असायची. ठरलेल्या दिवशी सकाळची न्याहारी आटोपून टोळी घरून टिकम, कुदळ, घेमेल्या, बादल्या, छोट्या तागार्‍या घेऊन निघत. टोळीतला म्होरक्या गड्यांच्या कुवतीनुसार काम वाटून देई. कामाची आखणी केली जायची. काठावरचे छोटे-मोठे दगड वाहणे आणि चिकन मातीचा गारा तयार करणे हे काम धडाक्यात सुरू होई. टोळीसोबत आलेली चिल्लीपिल्ली बायामाणसंही मदतीला असायची.

काहीजण झाडाखालची फळं वेचावी तसे मासे, खेकडे, झिंगे हाताने वेचून भांड्यात टाकायचं काम करत. या डाबांचेही छोटे छोटे भाग करून उपसा करावा लागे. डाबेतले मोठे दगड हलवून त्या खालीचे खेकडे-मासे पकडायला फार कस लागे. धारेच्या शेवाळांवरून पाय निसटून गडी धबधबा पडत. मग हशा पिके. म्होरक्या सर्वांची खेसर करून अधूनमधून मनोरंजन करायचा. हसत खेळत मासेमारी होई. धारेतल्या मासोळ्या रुचकर. मुर्‍ही, मह्या, झिरमोटी, केंगडा, वावतोडी, सांडकोई, गेर, खार्रच्या, ढोडर, ढेबर्‍या, पिंझार्‍या, तारू या खास धारेत सापडणार्‍या मासोळ्या. याशिवाय गांडोग, येडे झेग्रे, लाल मिरची या मासोळ्याही असतात, पण त्या खात नाहीत. लाल मिरची ही इवलीशी मासोळी दंश करते. त्याच खूप दाह होतो. पांढरे झिंगे जिंवतच तोंडात टाकायचो. आमच्यातले काही काठावर पेटवण शोधून त्यात खेकडे आणि मासे भाजून खायचे. कधीकधी ठरवून सावनीत भाजी बनवून मच्छीची मेजवानी व्हायची. एकदा धार दाबली की महिनाभर तरी पुन्हा त्या जागी कुणी मासे धरायला जात नसे. धार दाबणे धरण उभारण्यासारखंच काम. हे धरण खेकडे आणि पानचिड्यादेखील फोडून टाकत. म्हणून म्होरक्या बांधावर लक्ष ठेवून असायचा. साधारणपणे एकदा धार दाबून किमान दहा ते बारा किलो मासे मिळत. दिवस मावळतीला जाईस्तोवर मोठ्या कष्टाने मिळवलेल्या माशांतला आपापला वाटा घेऊन टोळी घराकडे निघायची. चेहर्‍यावर एक मोठं समाधान घेऊन. शेवटी धार फोडणे हे माझं आवडतं काम. एक बारकासा दगड हलवला तरी धार अंगावर येई. क्षणार्धात धार पूर्ववत वाहू लागे. पुन्हा तो खळाळ कानांवर आदडे. धार आणि काठ पुन्हा गजबजून निघे.

- Advertisement -

नामदेव कोळी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -