घरफिचर्ससमुद्रकिनारीची मैफिल

समुद्रकिनारीची मैफिल

Subscribe

आप्पांच्या गळ्यातून कैवल्याच्या चांदण्याला....... निघालं, आता कळलं मैफिल संपणार होती. गेले तीन तास अनेक पदं, नाट्यगीतं, टप्पा, खयाल ऐकल्यावरदेखील वाटलं समुद्राची हवा वाईट का! काय अर्थ असेल? आप्पा उठले, तोल सावरत खुश्श झालात ना! मी फक्त हसलो, मी आप्पांचा हात हातात घेत दाबला. लगेच आप्पा म्हणाले, आमचे सूर या समुद्रात हरवले. पुन्हा असं कोड्यात बोलत आप्पा निघाले, मला आप्पांच्या शेवटच्या वाक्याचा अर्थ कळत नव्हता.

वार्‍यात अडकलेल्या बटा

सोडवून घेतल्या मी.

- Advertisement -

पण केसात भरलेलं ते उधाण

वार…..

- Advertisement -

नाही सोडवता आली ती गुंतवळ अद्याप मला!

पावलांना चिकटलेली वाळू

तीही तशीच आहे अजून….

समुद्रावर जाणं टाळायला हवं

आता

न जाणो पुढल्या वेळी

पावलांना लगडून

अख्खा समुद्रच घरात यायचा

कवयित्री संगीता अरबुने यांची ही कविता, समुद्राशी असलेलं स्त्रीचं नातं विशद करणारी, तारुण्यात समुद्राची ओढ लागतेच…….समुद्र हवाहवासा वाटतो, कॉलेजमध्ये असताना कधी गावी गेलो की काकी किंवा आजी तिन्हीसांजेला बाहेर कुठे निघालो की बाबू, नदीकडे जावं नको हा, नदी बाधात. नदी बाधते म्हणजे नक्की काय? नदी वेड लावते……? कसला…..? काकीच्या किंवा आजीच्या बोलण्यातला अर्थ कळत नसे. एक गोष्ट मात्र नक्की समुद्र, नदी, पाऊस, पाणी या गोष्टी मनाला सुखावून जातात. संगीताताईंनी कवितेत म्हटल्याप्रमाणे समुद्रावर जाणं टाळलं पाहिजे याचा गर्भितार्थ लक्षात घेतला तर एक गोष्ट लक्षात येते की, या ठिकाणी गतआठवणींची सुई सापडत असते, त्या आठवणी कधी दुःखद असतात, मनाला अस्वस्थ करणार्‍या असतात, तर कधी मनाला उभारी देणार्‍या, प्रेरणा देणार्‍या असतात, भरतीच्या वेळी उंच उडणार्‍या लाटा मनाला गती देतात, एक प्रेरकता देतात. अशा समुद्रावर घडलेल्या गोष्टी आपल्या आयुष्याचा एक कप्पा भरून ठेवतात. त्या आठवणी हव्याहव्या वाटतात.

2006 च्या सप्टेंबर महिन्यात काही कामानिमित्त गणपतीपुळ्याला गेलो होतो. श्रावण महिन्याचे दिवस होते, समुद्र किनारा शांत होता. मी गणरायाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतलं, आणि सीशोअर कॉलिंग मनात ठेवत, पायात चप्पल चढवून समुद्राच्या दिशेला निघालो, नुकताच पाऊस शिडकून गेला होता, वातावरण थंड होत, बराच वेळ किनार्‍यावर बसून राहिलो, गणपतीपुळ्याचा हा किनारा कमालीचा स्वच्छ आहे, पांढर्‍या वाळूत बसून आजूबाजूचा परिसर निहाळत राहिलो, आजूबाजूची नारळाची झाड त्याकिनार्‍याच्या सौंदर्यात भर घालत होते, किनार्‍यावर खाऊ विकणारे, नारळपाणी, भेळपुरी असं विकणारे नव्हतेच. फक्त किनार्‍यावर एक झावळाच हॉटेल होत. संध्याकाळी भरती आणि ओहोटीचा खेळ सुरू झाला, पटकन वि. स. खांडेकरांचं ‘ययाती’ मधलं समुद्राख्यान आठवलं हे उन्मत्त सागरा, उगाच गर्जना करू नकोस, आता काळ तुला अनुकूल आहे म्हणून तू गर्जना करत सुटला आहेस, पण थोडावेळ थांब म्हणजे दैवाचा प्रताप तुला कळेल,भरतीच्या वेळी पृथ्वीचा भाग जो तू जिंकलास तो ओहोटीच्या वेळी तुला परत करावा लागेल, आणि पराभूत होऊन तुला मागे फिरावं लागेल, सूर्यास्ताच्यावेळी मी स्वतः समुद्राचा तो पराभव बघत होतो. भावनिक पातळीवर हा विचार करताना कधी तरी आपण हसतो.

पण ती विफलता ज्यांच्या लक्षात येते त्यांना ती आठवण कोरावी वाटते. किनार्‍यावर आता हळूहळू काळोख पसरत चालला होता. जे पन्नासेक लोक किनार्‍यावर होते तेदेखील घरी परतत होते, मीदेखील हॉटेलवर जायचं म्हणून निघालो, पण हॉटेलवर जाण्याअगोदर झावळाच्या हॉटेलात जाऊन चहा घ्यावा असं मनात आलं. म्हणून मी त्या हॉटेलमध्ये शिरलो. चहा तयार नव्हता, हॉटेलचे मालक म्हणाले, आता आम्ही जेवणाची तयारी करणार, आता तुम्ही मुंबईवरून एवढ्या लांब आलात तर बसा, करूया चहा. असं म्हणत आत चहा बनवायला सांगितला, हल्ली पावसाळा असल्याने लोक तसे किनार्‍यावर कमी येतात. पण संध्याकाळी काळोख पडायला सुरुवात झाली की लोक जेवणासाठी येतात. इथे जवळच कुठेतरी कामं चालू असतात, ते लोक बहुतेक त्या हॉटेलात जेवायला येतात. एवढी माहिती मला हॉटेलच्या मालकांनी दिली.

किनारा जवळजवळ निर्मनुष्य झाला, समुद्राची गाज कानावर येत होती, थोड्यावेळाने चहा आला, नुसता चहा कसा घ्यायचा म्हणून एक बिस्किटचा पुडा घेतला आणि चहा बिस्किटचा आंनद घेत होतो. चहा संपतो तोच हॉटेलच्या आतल्या बाजूने खमंग जेवणाचा वास आला, मी मालकांना विचारलं, आज जेवायला काय ?

मालक म्हणाले, काही नाही पोळी-भाजी, भात-आमटी, पण आज शाकाहारी. मलादेखील मांसाहाराचा सोस नव्हता. जेवण तयार व्हायला अजून वीसएक मिनिटांचा अवधी होता. आता बाहेर जाऊन जेवायचेच आहे तर अजून तासभर इथेच बसू आणि जेवून जाऊ असा विचार करून मी तिथेच हॉटेलच्या बाहेर घुटमळत राहिलो. आता पुन्हा समुद्र बघू लागलो. समुद्राची ती निराळी रूपं आठवत राहिलो.

सर्वत्र नीरव शांतता पसरली होती,तेवढ्यात जेवण आलं.गरमागरम आमटी भात भुरके मारत जेवलो आणि हात धुवायला बाहेर आलो तर किनार्‍यावरून कोणीतरी बंदिश गात असल्याचा भास झाला …..भास ?…..कोणीतरी बंदिश गात होतं, मी तसाच पुढे गेलो. कोणी वेडा पीर गाणं बरळत नव्हता, तर कोणी कलावंत बेधुंद होऊन गात होता. एव्हाना मी त्या गाणार्‍या माणसाच्या अगदी जवळ गेलो, त्या माणसाच्या बंदिशीचे सूर मला आता स्पष्ट ऐकू येत होते. मी सुराचा ठाव घेण्यासाठी अजून जवळ गेलो. पटकन मद्याचा दर्प नाकात गेला, त्या माणसाने मद्य प्राशन केले होते, पण त्याच्या गळ्यातून निघणारे सूर म्हणजे मद्याची नशा नक्कीच नव्हती, खर्‍या कलावंताचा तो सूर होता. मी खाली बसलो, बंदिश ऐकू लागलो. दहा एक मिनिटात बंदिश संपली. त्या माणसाने माझ्याकडे बघितलं, हसला आणि एका नजरेत, तू कोण ? , इथे काय करताय? या प्रश्नाचा रोख दिसला, मी माझी ओळख करून दिली. आणि आपण कोण हा प्रश्न विचारणार तेवढ्यात त्यांनीच, मी दिनार आप्पा. दिनार आप्पा हे नाव थोडं विचित्र वाटलं.

पण त्यावेळी या नावावर चर्चा करण्यापेक्षा हा माणूस पुढे काय गातो याकडे माझं लक्ष लागलं. अजून काय ऐकणार? या आप्पांच्या प्रश्नावर मी काय म्हणणं अपेक्षित होतं, त्याक्षणी मला सूर हवा होता,बाकी शब्दाची आस नव्हतीच. मीदेखील काही म्हणा असं सांगताच, आप्पा ठाईत बसून अजून कसला टप्पा ऐकवत होते, पुन्हा त्या सुरात तीच व्याकुळता, सूर काळजाला भिडत होता. किनार्‍यावर बाकी कोणीच नव्हतं. शंभर पावलावर हॉटेलात थोडी जाग होती, इकडे मी आणि आप्पा मैफिल जागवत होतो.

टप्पा गाताना आपाच्या गळ्यातून अशी एक ताण निघून गेली की, माझ्या तोंडातून वाह निघून गेली. माझ्या त्या स्तुतीपर प्रतिसादावर आप्पा खुलले आणि खूश होऊन आता भास्करबुवा बखले ऐकवतो, असं म्हणत धीरवर पुरुष पदा…….सुरू केलं, गाणं संपलं आणि भास्करबुवांना कृष्णराव आणि नारायण राव राजहंस या दोन्ही शिष्यांची जातकुळी माहीत होती. गुरू असावा तर असावा, कोणत्या शिष्याला काय द्यावं हे गुरूला कळलं तर तो मोठा गुरू, थोडा वेळ भास्करबुवा बखले यांची तारीफ झाली. आणि गाडी पुढच्या गाण्याकडे वळली, त्या दरम्यान दीनानाथ मंगेशकर, बालगंधर्व यांच्या रचना झाल्या आम्ही दोघेही मैफिलीत अक्षरशः शहीद झालो, आप्पांचा गाण्याला मी बाजूला पडलेला मडक्याचा तुकडा घेऊन तालाची साथ देऊ लागलो.

गीतामागून गीतं चालू होती, जितेंद्र अभिषेकीच्या संगीत रचनांची तारीफ करताना, आप्पा भरभरून बोलत राहिले, बोलताबोलता आप्पा गंभीर झाले नी, समुद्रावर रात्रीच फिरणं बर नाही, समुद्राचं वारं बरं नाही, केसांत शिरलं की आयुष्य बेफाम होतं. आप्पा काय बोलत होते कळत नव्हतं, पण गतआयुष्यातल्या कोणत्यातरी दुखर्‍या फांदीला चुकून हात गेला असावा. जमलेली मैफल भैरवीशिवाय पूर्ण होणार नव्हती. आप्पांच्या गळ्यातून कैवल्याच्या चांदण्याला……. निघालं, आता कळलं मैफिल संपणार होती. गेले तीन तास अनेक पदं, नाट्यगीतं, टप्पा, खयाल ऐकल्यावरदेखील वाटलं समुद्राची हवा वाईट का! काय अर्थ असेल? आप्पा उठले, तोल सावरत खुश्श झालात ना! मी फक्त हसलो, मी आप्पांचा हात हातात घेत दाबला. लगेच आप्पा म्हणाले, आमचे सूर या समुद्रात हरवले. पुन्हा असं कोड्यात बोलत आप्पा निघाले, मला आप्पांच्या शेवटच्या वाक्याचा अर्थ कळत नव्हता. मैफिलीचं वार माझ्या मनात खोलवर शिरलं होतं, पण आप्पा म्हणतात ते कुठलं वारं? खरंच समुद्राचं वारं बाधतं का?

संगीताताई म्हणतात तसं, खरंच समुद्र पावलांना लगडून घरात येईल का? की आजी म्हणते तसं नदी, समुद्र बाधतो का…?
उत्तरं मिळत नसली तरी ती समुद्राकाठची मैफिल आणि आप्पा पुन्हा कधीच भेटले नाहीत, कदाचित भेटणार पण नाहीत……

-वैभव साटम

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -