घरफिचर्स‘निबंधकारा’स शतशः प्रणाम

‘निबंधकारा’स शतशः प्रणाम

Subscribe

‘निबंधकार’ विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचा आज जन्मदिवस. मराठी निबंधकार, लेखक, पत्रकार, देशभक्त म्हणून विष्णुशास्त्री चिपळूणकर ओळखले जातात. विष्णुशास्त्री चिपळूणकरांचा जन्म २० मे १८५० रोजी महाराष्ट्रातील पुणे शहरात झाला. थोर अनुवादकार कृष्णशास्त्री चिपळूणकर यांचे ते सुपुत्र. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पुण्यातील पूना कॉलेज व डेक्कन कॉलेज या महाविद्यालयांमध्ये झाले. १८७१ साली चिपळूणकरांनी पदवीचा अभ्यासक्रम पूर्ण केला. या अभ्यासादरम्यान विष्णुशास्त्री यांनी इतिहास, अर्थशास्त्र, तर्कशास्त्र व नीतिशास्त्र या विषयांचा तसेच इंग्रजी, संस्कृत व मराठी या भाषांतील उत्तमोत्तम ग्रंथांचा सखोल अभ्यास केला होता.

वडील कृष्णशास्त्री चिपळूणकरांप्रमाणेच विष्णूशास्त्रींना महाविद्यालयीन काळातच लिखाणाची आवड निर्माण झाली. म्हणूनच की काय बी.ए. होण्यापूर्वी विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी आपल्या वडिलांच्या ‘शालापत्रक’ या मासिकाचे कामकाज पाहण्यास सुरुवात केली. शालापत्रकातून विष्णुशास्त्री चिपळूणकर ब्रिटिश सरकारचे धोरण व ख्रिश्चन मिशनरी यांवर टीका करत असत. परिणामी इ.स.१८७५ मध्ये इंग्रजांनी ‘शालापत्रक’ मासिक बंद पाडले, पण त्यापूर्वीच विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी एकहाती मजकूर असलेले ‘निबंधमाला’ हे मासिक सुरू केले होते. २५ जानेवारी १८७४ रोजी निबंधमालाचा पहिला अंक प्रसिद्ध झाला. पुढील सात वर्षे हे मासिक सुरूच होते. महाविद्यालयीन शिक्षणानंतर चिपळूणकरांनी शिक्षकी पेशा निवडला. त्यांनी १८७२ ते १८७७ सालांदरम्यान पुण्यातील, तर १८७८ ते १८७९ सालांदरम्यान रत्नागिरीतील शाळांमधून अध्यापनाचे काम केले. १८७४ साली चिपळूणकरांनी निबंधमाला हे मासिक प्रकाशन आरंभले.

- Advertisement -

१८७४ सालापासून हयात असेपर्यंत, म्हणजे सुमारे आठ वर्षे, त्यांनी निबंधमाला चालवली. निबंधमालेतील निबंधांतून त्यांनी तत्कालीन ब्रिटिश सत्तेच्या अन्यायकारक धोरणांविरुद्ध टीकात्मक लिखाण, तसेच साहित्यिक लिखाणही लिहिले. त्यांनी १८७८ साली महाराष्ट्राच्या इतिहासाविषयी लोकांची जाणीव वाढवण्याच्या व सामान्यजनांची काव्याभिरुची घडवण्याच्या हेतूने ‘काव्येतिहास संग्रह’ हे मासिक सुरू केले. त्याच वर्षी त्यांनी पुण्यात आर्यभूषण छापखाना व चित्रशाळा स्थापण्यात पुढाकार घेतला. १८७५ साली मराठी समाजाला प्रेरित करणारे साहित्य उपलब्ध करण्याच्या हेतूने ‘किताबखाना’ नावाचे पुस्तकांचे दुकान उघडले. उमलत्या पिढीला ‘राष्ट्रीय शिक्षण’ देण्याच्या उद्दिष्टातून, १८८० साली त्यांनी बाळ गंगाधर टिळक व गोपाळ गणेश आगरकर यांच्या सहकार्याने पुण्यात न्यू इंग्लिश स्कूल शाळा स्थापली. १८८१ सालाच्या जानेवारीत त्यांनी ‘केसरी’ हे मराठी व ‘मराठा’ हे इंग्रजी वृत्तपत्र सुरू केले.

चिपळूणकरांच्या मृत्यूनंतर बाळ गंगाधर टिळकांनी ही दोन्ही वृत्तपत्रे पुढे चालवली. त्यांनी, आपल्या वडिलांच्या ‘शालापत्रक’ या मासिकात कालिदास, भवभूती, बाण, सुबंधु व दंडी या पाच संस्कृत कवींवर स्वतंत्र लेख लिहिले होते. त्या लेखामध्ये कवींची उपलब्ध माहिती आणि त्यांच्या काव्यांचे, जरूर तेथे उतार्‍यांसहित, रसपूर्ण विवरण असे. सन १८९१ संस्कृत कविपंचक हे विष्णुशास्त्री चिपळूणकर लिखित साहित्य प्रकाशित झाले. त्यानंतर सन १९०१ मध्ये विनोद आणि महदाख्यायिका साहित्याचेही प्रकाशन पार पडले.

- Advertisement -

विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी वडील कृष्णशास्त्री चिपळूणकरांच्या मदतीने अनुवादाचे कामही लीलया पेलले. यामध्ये सॅम्युएल जॉन्सन यांच्या द हिस्टरी ऑफ रासेलस (इंग्लिश: The History of Rasselas) या पुस्तकाचा मराठी अनुवाद (सह-अनुवादक : कृष्णशास्त्री चिपळूणकर), आणि बाणभट्टाच्या कादंबरी या संस्कृत पुस्तकाचा मराठी अनुवाद (सह-अनुवादक : कृष्णशास्त्री चिपळूणकर) आदी साहित्याचा समावेश होतो. त्यांनी लिहिलेले निबंध ‘निबंधमाला’ या नावाखाली पुस्तकरूपाने, दोन खंडांत प्रकाशित झाले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -