घरफिचर्सचेहरे आणि मुखवटे!

चेहरे आणि मुखवटे!

Subscribe

भाजपची मातृसंघटना म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. संघाचे विचार आणि दिशा हा या पक्षाचा पाया आहे. या पायावर उभी राहिलेली भाजपची इमारत त्यांनी कितीही नाही म्हटले तरी ते कडव्या उजव्या विचारसरणीचे आहेत, यात काडीमात्र शंका नाही. भाजपचे वरिष्ठ नेते संघाच्या व्यासपीठावर जातात तेव्हा त्यांना संघ शिस्त ही पाळावीच लागते. अर्धी खाकी पँट, त्यात खोवलेले पांढरे शर्ट, हातात काठी आणि शिस्त…आणि एक सूर संघ दक्ष! मनुस्मृतीची पाठराखण करत पुढे जाणारा संघ काळानुरूप किती बदलला यावर बराच काथ्याकुट होऊ शकतो. संघाने आपला मुखवटा कितीही बदलला असला तरी त्याचा चेहरा कडवट हिंदुत्वाचा आहे. विजयादशमीच्या निमित्ताने नागपुरात रेशीम बागेत झालेल्या वार्षिक कार्यक्रमात पुनः एकदा हे स्पष्ट दिसून आले. संघाचे नाव नेहमीच मॉब लिंचिंगच्या घटनांशी जोडले जाते. मात्र, अशा घटनांशी संघाचा काहीही संबंध नाही. लिंचिंग हा शब्दच भारतातला नसून मॉब लिंचिंगसारखा प्रकार भारतात होतच नाही, असे सांगत सरसंघचालक मोहन भागवत यांनी आपला खरा चेहरा दाखवला. २०१४ पासून देशात भाजपची सत्ता आल्यानंतर आतापर्यंत देशात घडलेल्या मॉब लिंचिंगच्या घटना या झाल्याच नाहीत, हे सांगताना त्यांनी लिंचिंग हा शब्द म्हणे आपल्या देशातला नसून तो बाहेरून आलेला आहे, असा शोध लावला आहे. आपला खरा चेहरा न दाखवण्यासाठी मुखवटे धारण करतात तसाच हा प्रकार आहे किंवा एक आभासी जग तयार करून त्या जगात काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत लोकांना संमोहित करायचे, असा हा प्रकार आहे. विशिष्ट समुदायांपैकी एक दोन लोकांना घेरून मोठ्या समूहाने त्यांना जीव जाईपर्यंत बेदम मारहाण करणे, यासाठी तो शब्द बाहेरून आला काय किंवा या देशातला असला काय? काय फरक पडतो. त्या माणसाचा जीव जातो किंवा त्याचा जीव जाण्याने त्याच्यावर अवलंबून असलेले कुटुंब वार्‍यावर पडते, तेव्हा येशू ख्रिस्त आणि गौतम बुद्धांच्या काळातील उदाहरणे देऊन त्याची भरपाई होऊ शकत नाही. शेवटी श्रीराम असो, येशू असो, बुध्द असो किंवा अल्लाह या सार्‍यात मानवतेला प्रथम प्राधान्य आहे. गाय किंवा बैलाचे मांस बाळगले किंवा त्याची अवैध पद्धतीने वाहतूक केली म्हणून त्यांना अडवून त्यांचा जीव घ्यायचा, असे कुठल्या धर्माने सांगितले आहे. कायदा त्याचे काम करेल, पण आपणच कायदा हाती घेऊन धर्माचे संरक्षक आहोत, असा मुखवटा दाखवला जातो तेव्हा त्याच्या मागचा खरा चेहरा कोण आहे, हे कळायला फार वेळ लागत नाही. पाकिस्तान असो किंवा आणखी कुठले राष्ट्र ज्या देशांनी धर्माच्या नावाने हैदोस घातला ते एक देश म्हणून कधीच जगाच्या समोर भक्कमपणे उभे राहिले नाहीत. आज पाकिस्तानच्या हातात कटोरा आला असून देश जगवण्यासाठी दारोदार फिरण्याची वेळ त्याच्यावर आली आहे. दहशतवादाला खतपाणी घालून भारतात अशांतता पसरवण्याच्या नादात त्यांनी आपला देश संपवला हे आपल्या समोर आहे. धर्म ही अफूची गोळी असून ती दिली की बर आणि वाईट यातला फरक कळत नाही आणि यातून जन्माला येते ती फक्त अराजकता. प्रश्न हा आहे की आपण त्या मार्गावर जायचे की नाही? दुसर्‍याची रेषा पुसताना आपण आपली रेषा कमी करत जातो, हे लक्षात घ्यायला हवे. मॉब लिंचिंग सारखे शब्द वापरून हिंदू समाजाला बदनाम करण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. विशिष्ट समुदायाप्रती सहानुभूती व्यक्त करण्यात येत असताना आपसी संघर्ष वाढवण्यात येत आहे, यापासून सतर्क राहण्याची गरज आहे. अल्पसंख्याकांमध्ये भय निर्माण करण्यात येत असून एकमेकांमध्ये भेद निर्माण करून दुरी निर्माण करण्याचे प्रमाण वाढले आहे. यामागे काही विशिष्ट लोक आहेत. याचा प्रतिकार करण्यासाठी, नियंत्रण मिळविण्यासाठी कायदा आहे, पण त्याचा प्रामाणिकपणे आणि सक्तीने अंमल व्हायला हवा. देशात काही ठिकाणी अत्याचाराच्या घटना घडतात असे नाही. मात्र, त्या एका समुदायाने दुसर्‍या समुदायावर केल्या असे म्हणणे योग्य ठरणार नाही. एखाद्या समुदायातील दहा पाच लोकांनी कुणावर अत्याचार केले म्हणून त्या अत्याचाराला संपूर्ण समुदायाला जबाबदार धरणे चुकीचे आहे. कायदा आपले काम करेल, ज्यांना शिक्षा करायची आहे त्यांना ती केली जाईल, असे निरूपण करत भागवत यांनी मूळ मुद्याला बगल दिली. मॉब लिंचिंग करून हिंदू धर्माला कोणी बदनाम करत असेल तर या घटनांमागचे सूत्रधार शोधून का काढले जात नाहीत. सत्ता भाजपची असून संघाने एक आदेश दिला तरी लगेच गृहविभाग कामाला लागून गुन्हेगारांना अटक करता येऊ शकते, पण तसे होताना दिसत नाही. या घटनांच्या मुळाशी जाण्याचा कधीच ठरवून प्रयत्न झालेला नाही. हे ठरवून झालेले नसेल तर मॉब लिंचिंग हा शब्द बाहेरून आला किंवा आतून आला काहीच फरक पडत नाही. मॉब लिंचिंगमधील आणखी एक भयंकर प्रकार म्हणजे ‘भारतमाता की जय’ किंवा ‘वंदे मातरम’ म्हणा नाही तर बेदम मार खा. ही हुकूमशाही नाही तर काय आहे. असे प्रकार करणारे खुलेआम फिरत असतील आणि त्यांना कायद्याचे भय नसेल तर त्यांना सत्ताधारी पाठीशी घालत आहेत, असेच होते. उलट मोहन भागवत यांनी मॉब लिंचिंग सारखे प्रकार यापुढे खपवून घेतले जाणार नाहीत. त्याना कठोर शिक्षा सुनावली जाईल, असे खडे बोल सुनावले असते तर खर्‍या अर्थाने संघाच्या विचारांचे सीमोल्लंघन झाले असते, पण तसे झाले नाही आणि भविष्यात होणारही नाही. कारण खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे असले की समुदायाला मूळ विषयाला बगल देऊन फिरवून आणले जाते. संघाला ईशान्य भारत, केरळ, पश्चिम बंगालमध्ये आपला विस्तार करताना अनेक अग्निदिव्यातून जावे लागले. त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांना आपले जीव गमवावे लागले. मात्र, असे असूनही त्यांनी आपले लक्ष्य कधी विचलित होऊ दिले नाही. आदिवासी भागांमध्ये काम करताना तेथील समाज मुख्य प्रवाहाशी जोडण्याचे मोठे कामही त्यांनी केले. आज देशभरात भाजप बहुमताने निवडून आली त्याचा पाया संघाच्या या मोठ्या कामात आहे, पण आता सार्‍या भारतीयांना सामावून घेण्याचा विचार संघाने करायला हवा आणि तो फक्त बोलून होणार नाही. कृतीतून दिसला पाहिजे आणि तसे झाले तरच संघ सर्वांचा विश्वास संपादन करू शकेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -