घरफिचर्सफेसबुक फ्रेंड- फसवी मैत्री

फेसबुक फ्रेंड- फसवी मैत्री

Subscribe

मैत्रीची व्याख्या तशी मोठीच. तिला शब्दांच्या मर्यादेत मोजणे तसं अवघडच. म्हणूनच की काय प्रत्येकाच्या आयुष्यात मित्र मैत्रिणींना वेगळेच स्थान असते. सुख-दु:ख शेअर करण्यासाठी प्रसंगी चुकलेल्या वाटेवरून योग्य दिशेवर व भानावर आणण्यासाठी हाच मित्रपरिवार मार्गदर्शकाची भूमिकाही बजावतो. म्हणूनच मैत्री ही हृदयाच्या जवळ असते. यामुळे त्यात भावनिक गुंतागुंतही असते. हे मित्र कधी शाळा-कॉलेजमधील असतात तर कधी तुमच्याबरोबर एकाच कार्यालयात काम करणारे सहकर्मी, तर कधी शेजारी किंवा रोजच्या प्रवासात तोंडओळख असलेले सहप्रवासीही असतात. कारण ओळख असल्याशिवाय आपण सहसा कोणाबरोबर मैत्री करत नाही; पण काळाप्रमाणे सगळंच बदलत चाललं आहे. इन्स्टंटच्या या जमान्यात आता अनेकांना मैत्रीही इन्स्टंट लागते. यामुळे आपल्या जमान्यातील मैत्रीच्या व्याख्येला फाटा देत आता फेसबुक फ्रेंडने तुमच्या आमच्या आयुष्यात एन्ट्री केली आहे. हा फ्रेंड तुमच्या परिचयातीलच असायला हवा असे नाही तर तुमचा लूक, तुमचा सोसायटीतील स्टेट्स, तुमची लाईफस्टाईल बघून येथे अनेकजण तुमचे मित्र-मैत्रिण बनू इच्छित असतात.

यामुळे फेसबुकवर येणार्‍या अनोळखी फ्रेंड रिक्वेस्ट समोरील व्यक्तीबद्दलची कुतुहलता तर वाढवतातच शिवाय नवीन मित्र-मैत्रिणही तुमच्या अकाऊंटमध्ये अ‍ॅड करतात. जेणे करून तुमच्या लाईक्समध्येही वाढ होते; पण खरंच कुठलीही शहानिशा न करता केवळ प्रोफाईलवर दिसणारा आकर्षक फोटो व त्या व्यक्तीची लाईफस्टाईल बघून फ्रेंड रिक्वेस्ट स्विकारणे योग्य आहे का याचा प्रत्येकाने विचार करायला हवा.

- Advertisement -

कारण फेसबुकवर झालेल्या या अनोळखी व्यक्तीबरोबरच्या मैत्रीने अनेकजणांचा घातच केल्याचे नेटवर सर्च केल्यावर समोर येते. अगदी ताजी काल परवाची घटना बघितली तर मनातल्या उरल्या सुरल्या शंकांचेही निरसन होईल. अलिबागमधील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजमध्ये बीएचएमएसच्या शेवटच्या वर्गात शिकणार्‍या एका तरुणीला फेसबुकवर एकाने फेसबुक फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. आपण नामांकित कंपनीत सीए असल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर दोघांमध्ये मैत्रीही झाली. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. लग्नाचे आमिष दाखवत त्याने तिच्याशी शारीरिक संबंधही प्रस्थापित केले; पण नंतर तरुण विवाहीत असून कपड्याच्या दुकानात काम करत असल्याचे तिला समजले आणि तिच्या पायाखालची जमिनच सरकली.

अशीच घटना सात महिन्यांपूर्वी दिल्लीत राहणार्‍या एका तरुणीबरोबर घडली होती. दिल्लीत राहणार्‍या या तरुणीची फेसबुकवर एका जयपूरमधील तरुणाबरोबर ओळख झाली. सुरुवातीलाच त्याने तिच्या सौंदर्याची अशी काही तारीफ करण्यास सुरुवात केली की ती त्याच्यावर भाळली आणि त्याच्या प्रेमातच पडली. त्यानंतर त्याने तिला भेटण्याची इच्छा व्यक्त केली व तरुणीला जयपूरला येण्यास सांगितले. तरुणाच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या तरुणीने लगेचच त्यास होकार दिला. कॉलेजला जात असल्याचे तिने घरच्यांना सांगितले व थेट विमानतळ गाठले. जयपूरला गेल्यावर त्याने तिला एका हॉटेलमध्ये नेले. नंतर तिला आराम करण्याचे सांगत बाहेर जाऊन खाण्यास काही घेऊन येतो असे सांगितले. तरुणावर विश्वास असल्याने तरुणी निश्चिंत होती. जवळ जवळ तीन चार तासांनंतर तरुण दोन व्यक्तींना घेऊन हॉटेलवर आला.

- Advertisement -

त्या तिघांनी तरुणीवर सामूहिक बलात्कार केला व या घटनेचा व्हिडिओही काढला. त्यानंतर तिला बाथरुममध्ये डांबून तिघे बाहेर निघून गेले. रात्री तिघेही परत आले. पुन्हा तिच्यावर बलात्कार करण्यात आला. यात तरुणी बेशुद्ध झाल्याचे बघून तिघांनीही तिला तिथेच सोडून पळ काढला. शुद्धीत आल्यानंतर तरुणीने घरच्यांना कळवले. या घटनेमुळे तरुणीला प्रचंड मानसिक धक्का बसला असून तिच्यावर अजूनही उपचार सुरू आहेत. फेसबुक फ्रेंडने तिचे आयुष्यच बदलले आहे. अशा घटना सातत्याने घडत असून याबद्दल वर्तमानपत्र व सोशल मीडियावर बातम्याही येत असतात. अशा फेसबुक मित्रांपासून सावध राहण्याच्या सूचनाही पोलिसांकडून करण्यात येतात;पण त्या आपल्यापैकी कितीजण गंभीरतेने घेतात हा देखील विचार करण्यासारखा मुद्दा आहे.

या फेसबुक फ्रेंडपासून फक्त महिलांनीच नाही तर पुरुषांनीही सावध राहणे गरजेचे आहे. हे नोएडात घडलेल्या घटनेवरून स्पष्ट झाले आहे. एकाने मित्राच्या लांबच्या महेश नावाच्या नातेवाईकाच्या नावाने नकली फेसबुक अकाऊंट सुरू केले. प्रोफाईलमध्ये फोटोही खर्‍या महेशचाच ठेवला. त्यानंतर त्याने महेशच्या मित्रांना फेसबुकवरून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. मेसेंजरवर त्यांच्याशी चॅटींग सुरू केले व त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर एका महत्त्वाच्या कामासाठी त्याने महेशच्या अंकीत नावाच्या मित्राकडे पंधरा हजार रुपये मागितले व ऑनलाईन पैसे देण्याची विनंती केली. त्यासाठी त्याला डेबिट कार्डची माहिती देण्यास सांगितले; पण अंकीतने यास नकार दिला व प्रत्यक्षात भेटून पैसे देतो असे सांगितले. पण महेशचे फेक अकाऊंट चालवणार्‍याने त्यास नकार दिला. यामुळे अंकीतला संशय आला. तो तडक महेशच्या घरी गेला. तेथे गेल्यावर त्याने थेट महेशला याबद्दल विचारले असता सगळा प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यानंतर दोघांनी त्या नकली महेशची पोलिसात तक्रार केली.

हे एकीकडे सुरूअसतानाच गेल्या काही दिवसांपासून बर्‍याच जणांच्या फ्रेंडलिस्टमध्ये गोरे गोमटे फॉरेनरही दिसू लागल्याने आश्चर्य वाटले. सहज म्हणून एकाला विचारलं तर त्याने स्टेट्स सिंबल म्हणून फेसबुकवर आलेली गोर्‍याची रिक्वेस्ट स्वीकारल्याचे सांगितले. हाच प्रश्न त्याच्या फ्रेंडलिस्टमधील मैत्रिणीला विचारला. कारण तो फॉरेनर तिच्या लिस्टमध्येही दिसला. तर तिनेही जवळजवळ सारखंच उत्तर दिलं. दोघेही उच्चशिक्षित. म्हणजे फेसबुक फ्रेंड या प्रकारातून फसवणूक होऊ शकते हे त्यांना सांगायची तशी गरजही नाही. त्यांना त्यामागचे धोकेही माहीत आहेत.

पण तरीही ज्यांचा आगापिछा माहीत नाही त्यांचा फक्त देखणा प्रोफाईल फोटो आणि त्यांनी स्वत:बद्दल दिलेली माहिती खरी समजून जर त्यांना मित्र बनवले जात असेल तर अशा बातम्या लिहायला आणि वाचायला तयार राहावे लागेल. कारण समोरच्याला प्रभावित करण्यासाठी फेसबुकवर अनेकजण खोटे प्रोफाईल पोस्ट करत असतात हे जर माहीत असूनही आपण चुका करून स्वत:ची फसवणूक करवून घेण्यास तयार असाल तर काहीही न बोलणे बरे.

हल्लीच्या धकाधकीच्या आयुष्यात ज्याच्यासमोर मनमोकळं करता येईल अशी एकतरी व्यक्ती जवळ असावी अशी अनेकांची इच्छा असते. यासाठी अपेक्षित मित्र किंवा मैत्रिणीचा शोध सुरू असतो. नेमकं हेच घेरून एकजण तुम्हाला फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतो. त्याचा किंवा तिचा प्रोफाईलमधला सुंदर, देखणा फोटो बघून तुम्ही हुरळून जाता. त्याचा स्टेट्स तुम्हाला आकर्षित करतो. पण अशा फ्रेंडच्या जाळ्यात न अडकता सारासार विचार करूनच रिक्वेस्ट स्विकारलेली बरी.

Kavita Joshi - Lakhehttps://www.mymahanagar.com/author/lkavita/
गेली १३ वर्ष पत्रकारितेत. सामाजिक विषयांवर लिखाण. ब्लॉग्जवरही लेखन. प्रिंट, डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -