बखाड

Subscribe

‘बखाड’ पडले की कोणत्या बिळात तोंड लपवून बसतात हवामान तज्ज्ञ समजत नाही कधीच शेतकर्‍याला. सुस्तावलेल्या सरकारला तर याचं सोयर सुतक ही नसतं. मंत्रालयाच्या अवतीभवती पाऊस पडला की महाराष्ट्र सुखात असल्याचा भास होतो मंत्र्या-संत्र्यांना. कुत्र्याने ओले अंग झटकल्यावर उडालेल्या शिंतोड्यासारख्या पावसाचाही हिशोब मांडला जातो वर्तमानपत्रात मिलीमीटरमध्ये. काळी ठिक्कर पडतात माणसं तशी रानंही करपू लागतात, गाव कोलमडतो. दावणीच्या जनावरांचा बाजार उठतो. चिंतेचे ढग गावभर पसरतात.

‘मिरुग’ साधला की लगभग सुरु होते. गावं हलायला लागतात. घरादारांना जाडजाडू कुलपं लागून शिवारभर पाखरांसारखी माणसं चमकू लागतात.पहिल्याच पावसाने वाहत्या वार्‍याच्या पाठीवर मातीचा गंध स्वार होतो. मातीलाही गर्भारपणाची चाहूल लागते.ओलावा धरुन फुलून आली माती, की आपल्या आशा, आकांक्षा, इच्छा सगळं काही पेरुन टाकतो बळी तिच्या कुशीत. या बेभरवसाच्या धंद्यात नसतो फार विचार करायचा माहीत असते त्याला. मातीचा पोपडा उलथवून उगवूनही येतात त्याची हिरवी स्वप्न. अन् नेमके रान हिरवं झाले की प्राक्तनाचे फासे उलटे पडतात.

वार्‍याची दिशा बदलते. गावाच्या वरच्या बाजूने ऐन मधोमध कोरडं वार सुटलेकी माणसं कावरी बावरी होतात, कोरडी पडायला लागतात. नक्षत्राचे वाहन पाहून देतात आधार एकमेकांना, पण त्यांनाही नसतो भरवसा पंचांगाचा. कारण आभाळ पांगल्याची चिन्हं दिशा बदलेलं वारं सांगत असते ‘बखाडा’च्याच खाणाखुणा. हिरवं झालेल्या शिवाराचा दिवसेंदिवस तोंडवळा उदास होतो. वांझोटे ‘ढगोजीराव’ पांढरफटक पोट घेवून फिरायला लागले डोक्यावरून की शिवारभर वेदना पसरत जाते, मातीतल्या खोल मूळापर्यंत. तेव्हा डोलणारी पानं समजून घेतात माना टाकल्याशिवाय उरला नाही पर्याय आपल्यासमोर म्हणून.

- Advertisement -

पावसाच्या अगोदर जागोजागी दिसणारी मुग्यांची वारुळ अन् त्याची भुसभूशीत माती पाहून मनाला आधार वाटायचा की आता हंगाम आला आहे. पण पहिल्या पावसानंतर वारुळं ही नसतात भविष्य सांगायला. बिळातून बाहेर पडलेली मुकी जनावरं पुन्हां ऊनही तापू लागले म्हणून जवळ करतात आपापले नागमोडी रस्ते. हिरवी झालेली झाडांची काया निस्तेज होते तापत्या उन्हात. पहिल्या पावसाने ओढ्या-नाल्यात वाहून आलेल्या काळेशार कोवळ्या मातीत पाय खुपसून बसावं वाटत गुराख्याला. कारण तिथेच चारसहा हिरवी देठं चाटायला नादी लागलेली असतात जित्राबं. रानंभर पांगलेलं ‘गाव’ ओट्यावर, झाडाखाली, सुताराच्या पुढ्यात सावल्या कलतील तसं बसायला लागतं. इकडच्या तिकडच्या चारदोन गप्पागोष्टी गणिक असतो पावसाचा विषय. ‘बखाड’ पडलं की आठ, पंधरा दिवस असतो जीवातजीव, पण त्याही पुढे लांबला मामला की मग पंढरीच्या विठ्ठला शिवाय नसतो दुसरा मार्ग. पाठ फिरवलेला पाऊस आषाढीला येईलच याविषयी नसते तिळमात्र शंका. उदासीची अख्खी लक्तरं अंगावर घेवून उभ्या शिवाराचेही असते लक्ष दिंड्या माघारी फिरण्याकडे. पंढरीत भेटेल त्याला विचारत असतो ‘वारकरी’ गावाकडच्या पावसाची खबरबात.

लेकरा-बाळांच्या सुख-दुःखापेक्षा ‘साकडं’ घालत असतो विठ्ठलाला मनोमन ‘बखाड’ हटू दे म्हणून. करपलेली पिके भेगाळलेली भुई त्याच्या नजरेसमोरून हटत नाही चंद्रभागेच्या पाण्यात डबुकी मारतानाही. चंद्रभागेचे बाटलीभर पाणी आणून गावातल्या ‘मारुतीला’ आंघोळ घालायचा बेतही असतो त्याच्या मनात. गावातल्या बाया बापड्या ‘धोंडी धोंडी पाणी दे’ म्हणून आर्त साद घालीत रिचवतात भरलेली भांडी पुण्यवान माणूस पाहून त्याच्या अंगाखांद्यावर.

- Advertisement -

आशातच आकाशात दाटून येतात अधूनमधून पोक्त ढगं पण साली ती असतात नपुसक. डोक्यावरची केसं ओली होतील इतकीपण नसते त्यांच्यात रग. एखादा काळाशार रांगडा ढग येतो भरुन, तेव्हा त्याला मारावा वाटतो ‘दगड’ खालून. पण तो दगड आपल्याच डोक्यात पडणार याचीच वाटते भीती. बखाडात माणसं आकाशाकडे पाहूनच उठतात आणि झोपताना आकाशाकडं पाहूनच झोपतात. टिपूर चांदणे पडलेलं पाहून बदलत राहतात कूस रात्रभर. पण डोळ्याला डोळा लागत नाही. आला दिवस कोरडा चाललाय म्हणून मांडतात पापपुण्याचा हिशोब मनातल्या मनात. आता सकाळी एकमेकांना भेटले तरीही नसतो त्यांच्या ’रामराम’ घालण्यात दम पहिल्यासारखा. मोठा दगड काळजावर ठेवल्यासारखे जड अंतकरणाने चालू असतो सर्व कोरडाठाक व्यवहार. ‘पाऊस पडलाच नाही’ तर हा विचार जरी मनाला शिवला तरी कालवाकालव होते काळजात. भरल्या ताटावरुन ताडकन उठतात माणसं घास मोठा मोठा लागतो म्हणून.

‘बखाडभोगी’ शिवार नजरेसमोर तरळले तरी धडकी भरते उरात. कारण उसनेपासने किंवा कर्ज घेवूनच भरलेली असते चारदोन एकराची पहिल्यांदा ओटी. ‘बखाडा’ने मातीमोल झालेल्या स्वप्नांवर ‘औत’ घालताना कोलमोडतो तो आतून, पण उरत नाही पर्याय त्याच्या पुढ्यात. ‘बखाडा’ने केलेला असतो पुन्हा एकदा त्याचा घात. संध्याकाळी जेवताना टीव्हीवर गुळगुळीत माणसं सांगत असतात फुकाचा सल्ले की अमुक पिकावर तमुक फवारावे. तमूक पिकावर अमूक फवारावे. तेव्हा मारावा वाटतो हातातला तांब्या फेकून त्यांच्या थोबाडावर पण साली टीव्हीची काच आडवी येते. कोकलत असतात उन्हाळा भर की मान्सून असा येणार तसा जाणार. ‘बखाड’ पडले की कोणत्या बिळात तोंड लपवून बसतात हवामान तज्ज्ञ समजत नाही कधीच त्याला. सुस्तावलेल्या सरकारला तर याचं सोयर सुतक ही नसतं.

मंत्रालयाच्या अवतीभवती पाऊस पडला की महाराष्ट्र सुखात असल्याचा भास होतो मंत्र्या-संत्र्यांना. कुत्र्याने ओले अंग झटकल्यावर उडालेल्या शिंतोड्यासारख्या पावसाचाही हिशोब मांडला जातो वर्तमानपत्रात मिलीमीटर मध्ये. काळे ठिक्कर पडतात माणसं तशी रानं ही करपू लागतात, गाव कोलमडतो. दावणीच्या जनावरांचा बाजार उठतो. चिंतेचे ढग गावभर पसरतात. उठल्याबसल्या ‘पाऊस’ हा एकच विषय असतो तनामनात. शहरांसारखी नसते वर्दळ गावात. रंगीबेरंगी दुनियेत पडतो विसर पाऊस असल्या- नसल्याचा.

गावात असे नसते काही. गावात पसरत गेलेली असते स्मशान शांतता. पखवाजाचे ‘बोल’ आणि पेटीचा मंद ‘स्वर’ निनादत असला मंदिरात तरी लक्ष असते गावाचे आभाळाच्या हालचालीकडे. कारण ‘बखाड’ असते जीवनमरणाचा प्रश्न. त्याच्याच पोटात असतात दुष्काळाची बीज. म्हणून उडतो थरकाप ‘बखाड’ जसे जसे मोठे होत जाते तेव्हा. शेवटी….‘बखाडा’ला तरी काय माहीत असते आपण आलोत कुणाच्या मुळावर. जो पिढ्यान पिढ्या भोगतोय मरणयातना. ‘भाळा’वरच्या रेषेत दडलेय आपले ‘दुःखभोग’ म्हणून वाहत असतो हा गाढा इमानेइतबारे आयुष्यभर. गळ्याला फास लावायला पडतील ‘दोरखंड’ कमी इतकी मरतात माणसं अलिकडे तरीही दया माया दाखवत नाही ‘बखाड’. काळीज चिरणारी वेदना घेवून अवतरतेच ते दर हंगामाला. त्याचे वर्तनच असते कोरडे ! म्हणून ‘पावसा’ तूच बदल त्याचे हे ‘वर्तन’ आणि आमचे वर्तमान. डोळ्यात ‘हिरवे स्वप्न’ घेवून इतकेच तुला विनवू शकतो कोरड्या शिवारातून तुर्तास ……!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -