घरफिचर्सनिसर्ग निरीक्षण आणि सहभागी लोकविज्ञान

निसर्ग निरीक्षण आणि सहभागी लोकविज्ञान

Subscribe

निसर्गातील अनेक संवेदनशील घटकांचे निरीक्षण करून त्याबद्दल वैज्ञानिक ज्ञाननिर्मिती होऊ शकते. 

वसंत हा रंगाचा उत्सव. निसर्गातील वेगवेगळ्या फुलांचा उत्सव. या दिवसातच रंगपंचमीचा सन येतो. अलीकडील घातक रसायनमिश्रित रंग प्रचलनात येण्याआधीची रंगपंचमी ही निसर्गातील वेगवेगळ्या फुलांच्या रंगानी खेळला जायचा. पळसफुलांचा रंग आजही खेड्या खेड्यात बनवला जातो. असो, आजचा विषय रंग किंवा रंगपंचमी हा नाही. वसंत ऋतूत निसर्ग कमालीचे बदलतो. निसर्ग, निसर्गातील बदल यांचे निरक्षणातून वैज्ञानिक ज्ञाननिर्मिती होऊ शकते. आणि हे सहभागी पद्धतीने करता येऊ शकते. त्यात उच्च शिक्षणाची अट नाही, वयाची अट नाही. जसे जगजीत सिंग म्हणतात ना, ना उम्र कि सीमा हो, ना जन्म का हो बंधन’ तसे इच्छा असेल, उत्साह असेल तर सर्वजन या ज्ञान निर्मिती प्रक्रियेत सहभागी होऊ शकतात.

डिसेंबर ते मार्च महिन्यात परिसरातील झाडांमध्ये कमालीचे बदल होत असतात. पहिल्या टप्प्यात झाडांची पानगळ होऊन झाडांचा निव्वळ सांगाडा उभा असतो. त्यातही एक सौंदर्य असते. सूर्योदय आणि सूर्यास्तावेळी ही निष्पर्ण झाडे खूपच मोहक दिसतात. दुसर्‍या टप्प्यात काही झाडे नवीन कोवळ्या पालवीने सजून जातात. ही नवीन पालवी रंगीबेरंगी असते. काहींची पालवी निळसर, काहींची शेंदरी, गुलाबी. काही झाडांना पानांच्या आधी थेट फुलं येतात. काटेसावर, पळस, पांगारा ह्याच्या लालभडक रंगाने जंगल पेटल्यासारखे वाटते. मार्च अखेरपर्यंत ह्या लाल रंगाचा थोडासा बहर कमी होत जातो न जातो बहावा बहरायला लागतो. बहाव्याचे बहरणे हे खूपच बेधुंद असतं. झुपकेदार पिवळ्या फुलांनी बहावा अगदी बरसत असतो. म्हणूनच तर बहाव्याला गोल्डन शॉवर ट्री म्हटले जाते.

- Advertisement -

निसर्गातील अनेक संवेदनशील घटकांचे निरीक्षण करून त्याबद्दल वैज्ञानिक ज्ञाननिर्मिती होऊ शकते. मुंग्याच्या वारुळाची रचना, पक्षी घरटे कोणत्या फांदीवर बांधतो. साप किती अंडी घालतो. ह्या गोष्टींचा आणि निसर्गात भविष्यात होणार्‍या बदलांचा सहसंबंध ताडून पाहू शकतो. बहाव्याबद्दल अशी काही भाकिते केली जातात. बहावा फुलाला म्हणजे पुढील काही दिवसांत पाऊस येतो. बहावा खूप फुलाला तर जास्तीचे पाऊस व कमी फुलाला तर कमी पाऊस, असेही अंदाज सांगितले जातात. मात्र याची पडताळणी कुणी केलेलं नाही. बहाव्याच्या झाडाचे निरीक्षण करून आपण सहभागी पद्धतीने वैज्ञानिक ज्ञाननिर्मिती करू शकतो.

बहावा हे दक्षिण पूर्व आशियाई देशांमध्ये आढळणारे एक सुंदर झाड आहे. जेव्हा बहावा फुललेला नसतो, तेव्हा सहसा कुणाच्या लक्षात येत नाही. अगदीच अडगळीत पडलेले हे झाड असते. नेहमीच्या रस्त्यावरील, वर्दळीच्या ठिकाणावरील बहरल्यानंतरच आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देतो. एकदा का बहावा पूर्ण बहरला मग त्या रस्त्यावरून जाणारे, थोडावेळ वाह वाह करीत थांबणार. ज्यांना झाडाबद्दल माहिती असते व नसते असे दोघेही या बहाव्याच्या बहरण्याला भरभरून दाद देतात. मार्च अखेर पासून ते एप्रिल-मे ह्या दोन महिन्यात थोड्या थोड्या दिवसाच्या अंतराने बहावा भारतभर बहरत असतो. आपलं निसर्गाला दाद देणं हे खूपच मर्यादित असते. फुलोर्‍याचा कालखंड ओसरला की निसर्ग, त्याचे सौंदर्य याची चर्चा मंदावते. निसर्गाबद्दल इतकं उपयुक्ततावादी असणं बरं नाही.

- Advertisement -

बहाव्याला केरळने आपल्या राज्यफुलाचा दर्जा दिला आहे. केरळमध्ये बहावा एप्रिलच्या मध्यावधीत बहरलेला असतो. तिकडे एप्रिलच्या 14-15 तारखेला विशू उत्सव असतो. ह्या सणाला बहाव्याच्या फुलांना विशेष महत्व असते. कृष्णाच्या पूजेसाठीच्या साहित्यात बहावा हा महत्वाचा असतो. अलीकडे केरळमधील नागरिकांच्या असे लक्षात आले की, नेहमी विशू उत्सवात पूर्ण बहरलेला असणारा हा बाहवा लवकरच फुलून जातो आहे. सणाच्या वेळी झाडाला फुलं असली तरी, त्याचा बहर ओसरलेला असतो. झाडं निसर्गातील बदल ओळखतात. वातावरणातील उष्णता, आद्रता ह्यानुसार, पावसाचे प्रमाण यांचे संकेत देतात. बहावा तर पावसाचा दूत मानला जातो. एकीकडे बहावा बहरतो तर दुसरीकडे सोशिल मीडियावरून त्याच्या बहरण्याचे कौतुक आणि फोटो यांचा पाऊस सुरु होतो.

ह्या कौतुकाबरोबरच आता तीस दिवसात पाऊस येणार, पन्नास दिवसात पाउस येणार, साठ दिवसात पाऊस येणार असे वेगवेगळे अंदाज मांडले जातात. हे अंदाज मोघम असतात. दर वर्षीच्या या अंदाजांना घेऊन अनेक प्रश्न असतात. बहावा फुलल्यावर 30 ते 60 दिवसांनी पाऊस येणार, म्हणजे नक्की केव्हा येणार? तीस दिवस ते साठ दिवसच्या मध्ये केव्हाही येणार असेल तर मग अशा अंदाजाचे काय उपयोग? दुसरा प्रश्न असा पडतो की बहावा हा काही एका दिवसात फुलत नाही. त्याच्या फुलण्याला सुरुवात होऊन पूर्ण बहरण्याला साधारण वीस दिवस ते एक महिना लागतो. कधी पासूनचे दिवस मोजायचे? याबद्दलचे कोणतेच वस्तुनिष्ठ निरीक्षणावर आधारित अभ्यास नाहीत. मात्र असे अभ्यास होऊ शकत नाहीत का? होऊ शकतात. केरळमधील दहावीत शिकणार्‍या सायना बानू ह्या मुलीने गेल्या वर्षी सिझन वाच प्रकल्पाअंतर्गत बहाव्याचे असे निरीक्षण नोंदविण्याचे काम केले होते. मात्र हे काही एकट्यादुकट्याने करावयाचे काम नाही. विद्यार्थी, शिक्षक, निसर्गअभ्यासक, शेतकरी, उत्साही लोक यांच्या सहभागातून असे निरीक्षण आधारित अभ्यास पुढे येऊ शकतात. तुम्ही ह्या अभ्यास प्रकल्पात सहभागी होऊ इच्छित असाल तर खालीलप्रमाणे निरीक्षण करू शकता. अधिक माहितीसाठी 9422205929 ह्या नंबरवर व्हॉटस्अ‍ॅप किंवा फोन करू शकता.

निरीक्षण नेमके काय आणि कसे करायचे?
ज्या झाडाचे निरीक्षण करावयाचे ठरवले आहे त्या झाडाची निश्चित ओळख. (१) जसे एखाद्याच्या घरात असेल तर त्यांच्या नावाने, बागेत असेल अन बागेत एकापेक्षा अधिक बहाव्याच्या झाडांपैकी नेमके कोणते? त्या झाडाच्या जवळील एखादी खूण निश्चित करून त्या झाडाचे ओळख पक्की करावी. शक्य असेल तर झाडाच्या ठिकाणाचे जीपीएस लोकेशन घ्यावे. हे आता आपल्या अ‍ॅन्ड्रॉईड मोबाईलमध्ये सहज शक्य आहे. जीपीएस नावाच्या अ‍ॅपद्वारे, झाडाचे अक्षांश, रेखांश व समुद्रसपाटीपासूनची उंची घेता येते. ज्यांना हे घेणे शक्य आहे त्यांनी जरूर घ्यावी. मात्र ही इतकी माहिती घेणे शक्य नाही म्हणून झाडाचे निरीक्षण करणे थांबवू नये. (2) झाडाचे अंदाजे वय. झाड बघून वयाचा अंदाज बांधता येतो. मात्र जमीन, पाऊसपाणी इत्यादी बदलातून एखादे झाड चांगले वाढलेले असू शकते व एखादे झाड खुरटे, छोटे राहू शकते. त्यामुळे त्या झाडाच्या जवळपास राहणार्‍यांना विचारून त्याचे वय निश्चित करावे.

(3) झाडाचा घेर. झाडाचा घेर हे मीटर पट्टीने काढू शकता किंवा एखाद्या दोरीच्या सहाय्याने झाडाचे घेर मोजून घेऊन नंतर फूटपट्टी किंवा इंच पट्टीच्या सहायाने त्या दोरीचे मोजमाप करून घेर निश्चित करू शकतो. झाडाचे घेर साधारणपणे जमिनीपासून चार ते पाच फूट उंचीवरून करावे. (4) झाडाची पूर्ण पानगळ कधी झाली तो दिवस किंवा आठवडा. (5) झाडाला पहिल्यांदा फुलं दिसली तो दिवस किंवा आठवडा. (6) संपूर्ण झाड फुलांनी बहरले असा दिवस किंवा आठवडा. (7) बहाव्याला पहिल्यांदा शेंगा लागण्यास कधी सुरुवात झाले, तो दिवस किंवा आठवडा. (8) तुमच्या भागात पहिला पाऊस कधी पडला. पहिला पाऊस म्हणजे मान्सूनचा पाऊस बरं का. उन्हाळ्यातील वळीवाचा पाऊस पडला असेल तर त्याची नोंद करून ठेवावी, मात्र तो काही पहिला पाऊस नाही. ह्या निरीक्षणाबरोबरच झाडाला कुणी कुणी भेट दिली, ह्यांच्या ही नोंदी खूप महत्वाचे असतात. फुलपाखरू, पक्षी, मधमाशी, खारुताई यापैकी कोण कधी, झाडावर आल्याचे तुमच्या निरीक्षणात आले, याचे तारीख व वेळ नोंवून ठेवावे. ह्या सर्व नोंदी किमान पुढील दोन तीन वर्षे करणे अपेक्षित आहेत. त्यामुळे आपण राहतो त्या ठिकाणच्या जवळपासचे बहाव्याचे झाड निवडावे.

शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना हे प्रकल्प म्हणूनही देऊ शकतात. शाळेत आता वार्षिक परीक्षेऐवजी प्रकल्प आधारित मूल्यांकन करण्याची सुविधा आहे. मात्र त्यामध्ये निव्वळ स्टीकर चिटकवून त्याबद्दलची पुस्तकी माहिती लिहिली जाते. अशा बाजारू शैक्षणिक साहित्याने शिक्षणातील निरीक्षण व प्रयोगाला मारक व्यापार सुरू केला आहे. अशा वेळी बहाव्याच्या झाडाचे निरीक्षण, नोंदी ही एक ज्ञानरचनावादी शिक्षण पद्धत म्हणून खूप उपयुक्त ठरू शकेल. एका पेक्षा जास्तीच्या लोकाकडून आलेल्या निरीक्षणाच्या आधारे आपण काहीएक अंदाज बांधू शकतो. प्रयोगशाळेत रसायने एकमेकांत मिसळून त्यांचे निरीक्षण करणे फक्त हेच काय ते विज्ञान नव्हे. वरीलप्रमाणे आपण आपल्या भागातील झाडाचे निरीक्षण करूनही वैज्ञानिक म्हणजेच सायंटिस्ट होऊ शकता.

-बसवंत विठाबाई बाबाराव, पुणे
-(लेखक ‘पर्यावरण शिक्षण’ विषयाचे अभ्यासक आहेत.)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -