घरफिचर्सपॅरिस की भिवंडी/ मालेगाव?

पॅरिस की भिवंडी/ मालेगाव?

Subscribe

लक्षात घेण्यासाठी बाब म्हणजे याच पॅरिसच्या रहिवाशांनी दुसर्‍या महायुद्धादरम्यान जेव्हा जर्मन फौजांनी फ्रान्स जिंकला होता तेव्हा पॅरिस शहरातील ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी हे शहर पॅरिसच्या नागरिकांनी न लढता नाझींच्या हवाली केले होते. एवढा पॅरिसच्या नागरिकांना त्यांच्या शहरातील़ ऐतिहासिक वारशाचा अभिमान होता. आज त्याच पॅरिस शहरातील काही इतिहासप्रसिद्ध इमारतींचे विद्रुपीकरण करण्यात आले आहे. यातून आजच्या फ्रान्समधील गरीब वर्ग किती चिडलेल्या अवस्थेत आहे हे लक्षात येर्इल.

आपल्या देशात काही शहरे अशी आहेत की जी दंग्यांसाठी कुप्रसिद्ध आहेत. उदाहरणार्थ भिवंडी, मालेगाव, मोरादबाद, मुज्जफरपूर वगैरे गावात अनेकदा भीषण दंगली झालेल्या आहेत. मात्र, आज अशाच दंगली फ्रान्सची राजधानी पॅरिस व फ्रान्समधील इतर महत्वाच्या शहरांमध्ये होत आहेत. आपल्याकडे होत असलेल्या दंगली व आता फ्रान्समध्ये सुरू असलेल्या दंगलीतील एकच महत्वाचा फरक आहे व तो म्हणजे आपल्याकडील दंगली धार्मिक मुद्दावरून होत आहेत पॅरिसमध्ये सुरू असलेल्या दंगली बेरोजगारी, भाववाढ वगैरेसारख्या आर्थिक मुद्दांवरून होत आहेत.

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मेक्रॉन यांनी अलिकडेच जाहीर केले की ते डिझेलच्या किंमतीत 25 टक्के वाढ करणार आहेत. फ्रान्ससाठी डिझेल म्हणजे प्राणवायूएवढीच गरजेची वस्तू. त्यामुळे जनसामान्यांच्या रागाचा भडका उडाला व 17 नोव्हेंबरपासून फ्रान्समधील अनेक शहरात ‘रास्तो रोको’ वगैरे प्रकारची आंदोलने सुरू झाली जी आजही कमीअधिक प्रमाणात सुरू आहेत. ही आंदोलने पाश्चात्य पद्धतीप्रमाणे जर शांततेच्या मार्गाने झाली असती तर त्याची अशी दखल घेतली गेली नसती. पण या आंदोलनात मोठया प्रमाणात हिंसाचार झाला, लुटालूट झाली व सार्वजनिक/ खासगी मालकीची हानी झाली. सर्वात धक्कादायक म्हणजे या आंदोलनकर्त्यांनी पॅरिसमधल्या उच्चवर्गीय वस्तीत जाऊन तेथे असलेल्या अनेक महागडया गाडया जाळून टाकल्या.

- Advertisement -

याहीपेक्षा जास्त धक्कादायक बाब म्हणजे त्यांनी पॅरिसमधील काही इतिहासप्रसिद्ध इमारतींना हानी पोहोचवली आहे. या संदर्भात लक्षात घेण्यासाठी बाब म्हणजे याच पॅरिसच्या रहिवाशांनी दुसर्‍या महायुद्धादरम्यान जेव्हा जर्मन फौजांनी फ्रान्स जिंकला होता तेव्हा पॅरिस शहरातील ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी हे शहर पॅरिसच्या नागरिकांनी न लढता नाझींच्या हवाली केले होते. एवढा पॅरिसच्या नागरिकांना त्यांच्या शहरातील़ ऐतिहासिक वारशाचा अभिमान होता. आज त्याच पॅरीस शहरातील काही इतिहासप्रसिद्ध इमारतींचे विद्रुपीकरण करण्यात आले आहे. यातून आजच्या फ्रान्समधील गरीब वर्ग किती चिडलेल्या अवस्थेत आहे हे लक्षात येर्इल. आंदोलन आटोक्यात यावे म्हणून पोलिसांनी अमानुष लाठीमार केला, अश्रुधूर सोडला, रबरी गोळयांचा मारा केला. नंतर पोलिसांनी गोळीबार केला. यात आजपर्यंत सुमारे दोन डझन लोक मारले गेले तर चारशे जबर जखमी झालेले आहेत.

ताज्या बातमीनुसार फ्रान्सने जाहीर केले आहे की डिझेलवरची दरवाढ सहा महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात आली आहे. या घोषणेमुळे दंगे जरा कमी होतील. पण पूर्णपणे संपतील असे मानण्याचे कारण नाही. याचे कारण आज बाहेर येत असलेला असंतोष फक्त डिझेलच्या दरवाढीच्या विरोधात होता असे नसून गेले दशकभर फ्रान्समधील गरीब अधिकाधिक गरीब होत आहे. या प्रक्रियेची सुरूवात 2008 साली झाली. ही भावना फक्त फ्रेंच नागरिकांची नसून जवळजवळ सर्व युरोप असाच अस्वस्थ आहे. आज फ्रान्स जात्यात आहे तर इतर देश सुपात आहे. इतर देशांतही फ्रान्ससारखेच काही तरी घडले तर आश्चर्य वाटून घ्यायला नको.

- Advertisement -

आज अमेरिका व युरोपमधील कनिष्ठ मध्यमवर्गीयांना वाटत आहे की सरकार त्यांच्या कल्याणाचा काहीही विचार करत नसून सरकार फक्त श्रीमंत व अतीश्रीमंतांच्या हितसंबंधांचाच विचार करते. हा राग साचत गेला व त्याचा आता भडका उडाला. असाच भडका 2011 साली अमेरिकेतही उडाला होता, जेव्हा देशभरचे गरीब न्युयॉर्क शहरातील वॉल स्ट्रीटवर असलेल्या स्टॉक एक्सचेंजच्या दिशेने चालत गेले. न्युयॉर्क शहरातील स्टॉक एक्सचेंज म्हणजे आजच्या जागतिक भांडवलशाहीचे प्रतिक समजले जाते. या चळवळीचे नाव होते ‘ऑक्युपाय वॉल स्ट्रीट’ म्हणजे वॉल स्टी्रट ताब्यात घ्या. आज फ्रान्समधील लोकचळवळीला ‘यलो वेस्ट’ म्हणत आहेत. फ्रान्समधील कारचालक नेहमी पिवळया रंगाचे जॅकीट घालतात. डिझेलच्या दरवाढीचा सर्वप्रथम फटका वाहनचालकांना बसला असता. म्हणून त्यांनी आंदोलन सुरू केले व नंतर इतर घटक त्यात सहभागी झाले. त्या सर्वांनी पिवळी जॅकीटे घालून कारचालकांच्या आंदोलनाला प्रतिकात्मक पाठिंबा दिला. म्हणून या चळवळीला आता ‘यलो वेस्ट चळवळ’ म्हणतात.

आपल्या भारतातही फार वेगळी स्थिती आहे असे नाही. आपल्याकडेसुद्धा शेतकरी मोर्चे निघत असतात. विद्यमान सरकारने 2014 च्या लोकसभा निवडणुकांत स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करू असे आश्वासन दिले होते. त्याला तब्बल साडेचार वर्षं झाली आहेत. आणखी सहा महिन्यांनी पुढची लोकसभा निवडणूक येर्इल. तेव्हा नव्या उत्साहाने जुनीच आश्वासने दिली जातील. शेतकर्‍यांचा गरीबांची ही एक प्रकारची थट्टा आहे. असे झाल्यानंतर जर तिकडच्या फ्रान्समधील गरीबांसारखे आपल्याकडील शेतकर्‍यांनी जाळपोळ सुरू केली, ‘रास्ता रोको’ केले, तर त्याचा दोष कोणाचा?

फ्रान्समधील गरीबांचा आरोप आहे की आज फ्रान्समध्ये दोन फ्रान्स आहेत. एक श्रीमंतांचा फ्रान्स तर दुसरा गरीबांचा, ग्रामीण भागात राहणार्‍यांचा फ्रान्स. या ‘अदर फ्रान्स’ ची दखल घ्या अशी मागणी करणारा हा आक्रोश आहे. आपल्याकडे शेतकरी संघटनेचे संस्थापक कै.शरद जोशींच्या मतेसुद्धा दोन भारत आहे. एक म्हणजे श्रीमंत, शहरी लोकांचा ‘इंडिया’ तर दुसरा म्हणजे गरीबांचा, ग्रामीण भागात राहणार्‍या ‘भारत’. आता या दोन भारतात संघर्ष होणार आहे. आज फ्रान्समधील दोन फ्रान्समध्ये संघर्ष पेटला आहे. हा संघर्ष फक्त डिझेलची दरवाढ मागे घेऊन थांबणारा नाही. यासाठी फार खोल जाऊन दीर्घकालिन उपाययोजना कराव्या लागतील.

‘यलो वेस्ट’ चळवळीचे सर्वांत मोठे वैशिष्टय म्हणजे ही चळवळ समाज माध्यमांच्या वापरातून उभी राहिली. या चळवळीच्या मागे तसा कोणी प्रस्थापित पक्ष नाही, कोणी प्रस्थापित नेता नाही. ‘यलो वेस्ट’ खर्‍या अर्थाने लोकचळवळ आहे जी लोकांच्या समस्या घेऊन शासनाशी टक्कर देत आहे. या चळवळीने एक विजय संपादन केला आहे. मेक्रॉन सरकारने डिझेलची दरवाढ तात्पुरती का होर्इना मागे घेतली आहे. पण या चळवळीने एवढयावर तृप्त होऊ नये. यातून काही तरी मोठे मिळवण्यासाठी झगडावे. मेक्रॉन सरकान कामगार कायद्यांत बदल करून ते मालकांच्या सोयीचे होतील असे प्रयत्न करत आहेत. हे प्रयत्न ‘यलो वेस्ट’ ने हाणून पाडावे. आजच्या गुंतागुंतीच्या काळात यलो वेस्टसारख्या पक्षातीत चळवळींकडूनच असे मूलभूत परिवर्तन अपेक्षीत आहे व असे परिवर्तन घडवून आणणे अशाच चळवळींना शक्य आहे.

प्रा. अविनाश कोल्हे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -