घरफिचर्सआपण ठरवू तेव्हा बदल घडू शकतो

आपण ठरवू तेव्हा बदल घडू शकतो

Subscribe

एक स्त्री म्हणून नक्की कोणाकोणाच्या फुटपट्टीवरून मोजलं जाणार आहे तिला ? नवर्‍याचा, प्रियकराच्या, मुलांच्या, आई वडिलांच्या, नातलगांच्या, शेजार्‍या - पाजार्‍यांच्या, प्रियकराच्या घरच्या लोकांच्या.. खूप मोठी यादी होईल.. आणि यात मोजणारे चूक आहेत असं अजिबात नाहीये. हा अधिकार बाई देते ह्या सर्व लोकांना.. ह्या लिस्टमध्ये नावं कदाचित कमी जास्त होतील सुद्धा.. पण तरीही हा अधिकार आपण नकळतपणे दिलेला असतो ह्या लोकांना. अगदी स्वतःच बोलायचं झालं तर मी माझ्या आयुष्यात असलेल्या निवडक लोकांना दिलाच आहे हा अधिकार. ते माझं प्रेम आहे त्यांच्यावर म्हणून. पण आज हे लिहिताना असं वाटलं की का बरं असं कोणी मला जोखावं? जर मी कोणाला असं जोखत नसेल तर कोणी मला का जोखावं?

‘लस्ट स्टोरीज’ ह्या नावाने अनुराग कश्यप,दिबाकर बॅनर्जी, झोया अख्तर आणि करण जोहर ह्यांची दोन तासांची, चार कथांची एक फिल्म नेटफ्लिक्सवर रिलीज करण्यात आली. ‘लस्ट स्टोरीज’मधल्या चारही कथा स्त्रीला केंद्रस्थानी ठेवून लिहिल्या आणि दाखवल्या गेल्या आहेत. त्यामुळे त्या मला अधिक प्रभावी वाटल्या. हा बदल नक्कीच रिफ्रेशिंग आहे.
अनुराग कश्यपची गोष्ट आहे कॉलेजमध्ये शिकवणार्‍या एका लग्न झालेल्या प्रोफेसरची ( राधिका आपटे). तिची तिच्याच वर्गात शिकणार्‍या विद्यार्थ्यांबरोबर ( आकाश ठोसर – आपला परश्या ) जवळीक होते आणि तिला नात्यात गिल्ट,प्रेम आणि मोकळेपणा ह्या गोष्टी अनुभवायच्या असतात. त्यात तिचा प्रवास कसा होतो ह्याची ही गोष्ट!

दुसरी गोष्ट आहे दिबाकर बॅनर्जीची. मनीषा कोईराला( वय लपवायचा प्रयत्न न केल्यामुळे मनीषा आवडली) तिचा नवरा संजय कपूर आणि तिचा प्रियकर जयदीप अहलावत यांची. मला वाटतं दिबाकर बॅनर्जीने फार सेन्सिबली हा विषय हॅन्डल केला आहे. नातं विशेषतः नवरा बायको ह्या महाजटिल विषयावर फार सटल भाष्य ह्या कथेमध्ये केलं आहे.

- Advertisement -

तिसरी कथा आहे झोया अख्तरची. एका मोलकरणीचं भावविश्व हा कथेचा गाभा. सॅडीझम म्हणजे रिऍलिटी हा साधारण नॉन कमर्शियल फिल्म बनवणार्‍या दिग्दर्शकाचा दृष्टिकोन असला की मला स्वतःला ते फार मिडिऑकर वाटतं आणि केवळ ह्या कारणासाठी भूमी पेडणेकर आणि नील भोपालन यांची ही फिल्म मला विशेष आवडली नाही. एक दिग्दर्शक म्हणून कमीत कमी संवादातून झोयाने जो इम्पॅक्ट आणला आहे तो मात्र लाजवाब !

शेवटची गोष्ट आहे करण जोहरची. खरं बघायला गेलं तर ह्या गोष्टीची थीम चांगली होती, पण तद्दन कमर्शियल मसाला भरण्याचा करणने मोह इथे टाळला असता तर बरं झालं असतं. प्रणयामधलं सुख हे स्त्री आणि पुरुष ह्या दोघांनीही अनुभवायचं असतं, ती फक्त पुरुषाचीच निकड नसते ही थीम. माझा आवडता विकी कौशल, त्याची बायको कियारा अडवाणी आणि मसाला अ‍ॅड करायला नेहा धुपिया ही स्टार कास्ट. स्त्रीला सुद्धा फक्त संसार, मुलं यांच्यापलीकडे शारीरिक सुख अनुभवावसं वाटतं हा बेस असला तरीही करणने नेहेमीचा मेलोड्रामा अ‍ॅड करून बोअरं केलं आहे.

- Advertisement -

ह्यातल्या मला आवडल्या अनुराग आणि दिबाकरच्या कथा. अनुराग कश्यप हा खरंतर फार सेन्सिबल दिग्दर्शक आहे. त्याच्यामधला व्हिमझिकल फॅक्टर त्याच्या गोष्टी जबरदस्त बनवतात. (गँग्स ऑफ वासेपूरची मी गेम ऑफ थ्रोन्स इतकीच मोठी फॅन आहे). राधिका आपटेच पात्र ‘मॅड वूमन’ असं आपण जिला म्हणू.. असं आहे. मी सेल्फिश आहे, मला नवराही हवा आहे आणि प्रियकरही हवा आहे, सेक्स फक्त सेक्स आहे, मला गिल्टसुद्धा अनुभवायची आहे असा विचार करणारी राधिका. पोराच्या मागे जाणारी, नवर्‍यासाठी रडणारी, आयुष्यातलं थ्रिल अनुभवू पाहणारी अशी बाई आपल्या डोक्यात ‘एक चांगली स्त्री’ म्हणून असलेल्या सगळ्या संकल्पनांचा चुराडा करते. इतकं की एका क्षणी आपल्याला वाटतं अरे काय बाई आहे ही? वेडी आहे का?

जनरली बाई म्हणजे ऑल सोर्टेड असं आपण बघत आलो आहोत. स्वतःला नक्की काय हवं आहे हे माहित नसणारी अनइनहिबिटेड आणि अनअबॅश्ड स्त्री जी अनुरागने दाखवली आहे ती मला खूप आवडून गेली. शॉर्ट फिल्म संपल्यानंतरही जर काही काळ परिणाम करणारी असेल तर खरी आणि अनुरागची गोष्ट तो परिणाम साधते. शेवटी तर आश्चर्याने तोंडात बोटं घालायला लावते की काय ही बया आणि म्हणून ही गोष्टं बेस्ट!

दुसरी मला आवडलेली गोष्ट दिबाकर बॅनर्जीची. नवरा, बायको आणि प्रियकर. तिघेही मित्र आणि त्यांच्यातलं नातं. थीम नवीन नाही पण एका बाईच्या अँगलने दाखवलेली ही गोष्ट आणि त्यातून कोणत्याही गिल्टशिवाय बाहेर पडणारी नायिका हे केवळ अप्रतिम. नवरा काय किंवा प्रियकर काय दोघेही शेवटी पुरुषच. दोघांनाही पुरुषी इगो आहेतच फक्त प्रकार वेगळे आहेत इतकंच. बायको फक्त आपली आहे हे जगाला दाखवण्यासाठी, आपण पुरुष म्हणून कमी पडतो आहे हे जगाला कळू नये म्हणून, आपलं आपापसात जमत नाही हे बायकोने चार चौघात बोलू नये , दाखवू नये म्हणून धडपडणारा नवरा आणि माझं कोणतंच अनैतिक नातं नाही, मी धुतल्या तांदळासारखा स्वच्छ आहे हे भासवू पाहणारा, बाई हवी तर आहे पण कोणत्याही जबाबदारी शिवाय, तिने दुसर्‍याची बायको म्हणूनच राहावं पण ती आपल्यालाही थोडी थोडी मिळत राहावी अशी माफक (?) अपेक्षा असणारा प्रियकर! आणि बाईचं काय? तिच्या मनाचं काय? तिला वाटणार्‍या अपराधीपणाचं काय? मग ती सुद्धा आपल्यापरीने आपला मार्ग शोधते आणि जिथे स्त्री स्वतःला अगदी दुसर्‍या कोणाच्याही नजरेने जोखणं बंद करते तिथेच ती जिंकलेली असते आणि हीच थीम दिबाकरने फार छान पद्धतीने पोहोचवली आहे.

ह्या निमित्ताने अजून बर्‍याच गोष्टी जाणवल्या. एकूणच स्त्रीला आपण फार गृहीत धरत आलो आहोत. अ+ब+क+ड+ उरेलेली बाराखडी+ सगळी a,b ,c ,d + एक हजार एकशे चौसष्ट गोष्टी = आदर्श स्त्री/माता/पत्नी.

पुरुषांना सुद्धा असे मापदंड आहेतच. पण अल्जेब्रा शिकताना नाही का ..समीकरण सोडवताना एखाद्या अंकाची किंमत माहित नसेल तर x समजा.. हे असं समजावून घेणं, मानणं हे स्त्रियांना जास्त करावं लागतं. संवेदनशील स्त्रीचं मन किती वेळेला कुस्करलं जातं ह्याची गिनती होऊ शकत नाही. नवरा असो, प्रियकर असो शेवटी तो आपला पुरुषी इगो सोडून तिच्यावर प्रेम करू शकतो का हा फार मोठा प्रश्न आहेच. हे जे चालवून घेणं आहे ना.. ते कुठेतरी खटकतं मला. समजावून घेणं आणि चालवून घेणं ह्यात सूक्ष्म अशी रेष आहे ह्याचं भान स्त्रीला असतं का ह्याबाबत मी साशंक आहे.

ह्या चार गोष्टी पाहताना, त्यावर लोकांच्या रिऍक्शन ऐकताना, मी हे लिहायला घेतलं. ते लिहिताना कित्येक विषयांवर आपण अजूनही मोकळं बोलू शकत नाही किंवा एखादी गोष्ट पाहताना आपण कसं एकाच चष्म्यातून बघतो.. हे जाणवलं. एक स्त्री म्हणून नक्की कोणाकोणाच्या फुटपट्टीवरुन मोजलं जाणार आहे तिला? नवर्‍याचा, प्रियकराच्या, मुलांच्या, आई वडिलांच्या, नातलगांच्या, शेजार्‍या – पाजार्‍यांच्या, प्रियकराच्या घरच्या लोकांच्या.. खूप मोठी यादी होईल.. आणि ह्यात मोजणारे चूक आहेत असं अजिबात नाहीये. हा अधिकार बाई देते ह्या सर्व लोकांना.. ह्या लिस्टमध्ये नावं कदाचित कमी जास्त होतील सुद्धा.. पण तरीही हा अधिकार आपण नकळतपणे दिलेला असतो ह्या लोकांना. अगदी स्वतःच बोलायचं झालं तर मी माझ्या आयुष्यात असलेल्या निवडक लोकांना दिलाच आहे हा अधिकार. ते माझं प्रेम आहे त्यांच्यावर म्हणून. पण आज हे लिहिताना असं वाटलं की का बरं असं कोणी मला जोखावं? जर मी कोणाला असं जोखत नसेल तर कोणी मला का जोखावं?

म्हणूनच अगदी कोणत्याही फुटपट्टीवर असं मोजलं जाणं नकोय मला. तिला तिच्या इच्छा आहेत, स्वप्न आहेत, जाणिवा आहेत, मन आहे, वासना आहेत, वेदना आहेत आणि ह्या कशावरूनही तिला जोखायचा अधिकार कोणालाही नाहीये आणि स्त्रीने सुद्धा तो देऊ नये. कारण आपण एकदा का हा अधिकार दुसर्‍याला दिला की त्या व्यक्तीने आपल्याला कसं वागवायचं हे आपल्या हातात राहत नाही आणि मग त्या व्यक्तीला, तिच्या मानसिकतेला दूषण देण्यावाचून आपल्याकडे काहीही उरत नाही. हे स्वतः बायकांना जमणार आहे का नाही माहित नाही, कारण बायकांची कंडिशनिंग फार नकळत होत असते. अगदी लहानपणापासूनच. पण प्रयत्न करायला काय हरकत आहे. आपण ठरवू तेव्हा बदल घडू शकतो!

सानिया भालेराव

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -