घरफिचर्सहा महाराष्ट्र माझा नव्हे... !

हा महाराष्ट्र माझा नव्हे… !

Subscribe

गेले महिनाभर विधानसभा निवडणुकीचा उडालेला धुरळा अखेर सोमवारी थांबला आणि आता उत्सुकता लागली आहे ती गुरुवारच्या निकालाची. निकाल अपेक्षेप्रमाणे महायुतीच्या बाजूने लागणार आहे, असे एक्झिट पोल सांगत असल्याने पुन्हा एकदा फडणवीस सरकार येणार, हे सांगायला आता कुठल्या कुडमुड्या ज्योतिषाची गरज नाही. वर केंद्रात नरेंद्र आणि खाली राज्यात देवेंद्र! निकाल ठरलेले असताना पुरोगामी आणि प्रगत महाराष्ट्रात निवडणुकीच्या दिवशी आणि त्याच्या काही दिवस अगोदर हिंसाचार, पैसे वाटप, राजकारण्यांची एकमेकांवर चिखलफेक, भाऊबंदकी आणि अश्रूंचा जो काही खेळ झाला त्यामुळे हा शाहू, फुले आणि आंबेडकर यांचा महाराष्ट्र आहे की उत्तर प्रदेश बिहार आहे हे कळायला मार्ग उरला नव्हता.

एनडीएमध्ये राहूनही आपले स्वतंत्र अस्तित्व जपणार्‍या जनता दल संयुक्तच्या नितीशकुमार यांनी बिहारमध्ये गुंडगिरी आटोक्यात आणण्यासाठी जीवाचे रान करताना दिसत आहेत. त्याचवेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नागपुरात कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत. भिवंडीत तर कायद्याचा धाक कोणाला उरलेला नाही. दररोज गुन्हे घडत आहेत आणि फडणवीसांचे गृहखाते हातावर हात ठेवून बसले आहे. कायदा वाकवता येतो असे दिसत असल्याने त्याचे दृश्य आणि अदृश्य परिणाम निवडणुकीत दिसून आले.

- Advertisement -

नांदेड जिल्ह्यातील देगलूर विधानसभा मतदारसंघात अंतापूर, चैनपूर येथे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रा. रामचंद्र भरांडे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. हे कमी म्हणून की काय अमरावतीच्या वरुड मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार देवेंद्र भोयर यांच्यावर गोळीबार झाला. यामधून ते थोडक्यात बचावले; पण त्यांची गाडी जाळण्यात आली. या प्रकारानंतर भोयर धाय मोकलून रडताना दिसले. जालना जिल्ह्यात बदनापूर मतदारसंघातील अंबड तालुक्यात जामखेड गावात भाजप आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. तसाच प्रकार औरंगाबादला झाला. फक्त भाजपऐवजी एमआयएमचे कार्यकर्ते राष्ट्रवादीला भिडले.

जोरदार हाणामारीत एमआयएमचे खासदार इम्तियाज जलिल यांनाही धक्काबुकी झाली आणि त्यांचे शर्टही फाटले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत लाठीमार केला, अन्यथा रक्तपात होण्यापर्यंत दोन्ही बाजूचे कार्यकर्ते बेभान झाले होते. शिवसेनेचे राज्यमंत्री गुलाबराव पाटील तसेच संजय राठोड यांच्या कार्यकर्त्यांची समोरच्या उमेदवारांच्या समर्थकांशी वाद झाल्याने तणावाची स्थिती होती. राज्याचे लक्ष लागलेल्या नगरमधील कर्जत जामखेडला भाजप आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या मारहाणीत भाजपचा एक कार्यकर्ता जखमी झाला. सोलापूरला माढा तालुक्यातील दहिवली येथे संजय शिंदे आणि अपक्ष उमेदवार नारायण पाटील यांच्या पाठीराख्यांमध्ये हाणामारी झाली.

- Advertisement -

या सर्व घटनांनी निवडणुकीला गालबोट लागले असताना बीडमधील अश्रूंचा झाला खेळचा प्रयोग अजूनही थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. पंकजा आणि धनंजय या मुंडे भाऊबहिणीमधील कलह पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला आहे. पूर्वी बाळ कोल्हटकर यांच्या ‘वाहतो ही दुर्वांची जुडी,’ ‘लहानपण देगा देवा,’ ‘वेगळं व्हायचंय मला’ अशा प्रकारच्या दादा-ताई, माई-अक्का छाप नाटकांमध्ये अशीच रडारड असायची. तीन तास अश्रूंचा पूर वाहायचा. मुंडे भावंडांमधील निवडणुकीच्या आधीचा वाद पाहून हा सुद्धा एका नाटकाचा भाग होता काय, असेच वाटत होते. रडारड, भोवळ येऊन पडणे, जीव नकोसा वाटणे, राजकारण सोडून द्यावेसे होणे, नंतर गडावर जाऊन नतमस्तक होणे हे सारे प्रकार एका दोन अंकी नाटकाला शोभेसे असे होते. हा सारा प्रकार पाहून लोकांना धनंजय आणि पंकजा यांच्याबद्दल सहानुभूती न वाटता राज्यातील जनतेला किळस वाटला.

अरे, तुमच्या घरातील भांडण रस्त्यावर आणून त्याचा तमाशा कशाला करता, असा लोकांचा सवाल आहे. निवडणूक जिंकण्यासाठी इतक्या खालच्या थरावर जाण्याचा प्रकार आपले राज्य कुठल्या दिशेला चालले आहे, हे लक्षात येते. हिंसाचाराच्या घटना, वैयक्तिक चिखलफेक, भयानक आरोप-प्रत्यारोप यात नेतेमंडळी सहभागी असतील तर लोकशाहीचा उत्सव ‘उत्सव’ राहत नाही, त्याचे भारूड होते आणि लोकांवर गारुड होऊन त्यांची डोकी जाग्यावर राहत नाही. राजा कसा आहे, तशी तेथील प्रजा असते, हाच अनुभव आज महाराष्ट्र घेत आहे. असे लोकप्रतिनिधी मग विधीमंडळात पोहोचले की ते काय जनतेचे प्रश्न सोडवणार? ह्या सवालाचे आपल्याकडे उत्तर नसते.

ईव्हीएमचा संशयकल्लोळ अजूनही थांबायचे नाव घेत नाही. माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या पत्नीने ईव्हीएमची पूजा करून या संशयकल्लोळ नाटकाला पुष्टी दिली. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे उभ्या असलेल्या वरळी मतदारसंघात एका बुथवर मशीन चालत नसल्याने मतदारांची खूपच अडचण झाली. शेवटी तो बूथ बंद करावा लागला. औरंगाबाद जिल्ह्यात १०० पेशा जास्त ठिकाणी ईव्हीएममध्ये गडबड दिसून आली. तर कोरेगाव विधानसभा मतदारसंघात नवलेवाडी येथे कोणतेही बटन दाबले की कमळाला मतदान होत असताना दिसत होते. याविषयी तक्रार केल्यानंतर मशीन बदलण्यात आले; पण, तोपर्यंत २९१ मतदार मतदान करून गेले होते. ठाण्यात ईव्हीएमवर शाईफेक करून एका कार्यकर्त्याने आपला निषेध दाखवून दिला.

हिंसाचार, अश्रूंचा झाला खेळ आणि ईव्हीएमचा संशयकल्लोळ यामुळे निवडणुकीला गालबोट लागले असताना गडचिरोलीत नक्षलवाद्यांचा बहिष्कार झुगारून आदिवासींनी मतदान केले आणि विपरीत परिस्थितीत लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी पुढाकार घेतला. नेहमीप्रमाणे नक्षलवाद्यांनी फतवा काढत मतदान करू नका, अन्यथा… अशी भीती घालूनही आदिवासी घाबरले नाही. अनेक किलोमीटर चालत, कमरेपेक्षा जास्त पाण्यातून वाट काढत त्यांनी मतदानाचा हक्क बजावला. मौजा वेंगणूर येथील मतदान केंद्र सुरक्षेच्या कारणास्तव मौजा रेंगडी येथे हलवण्यात आले. त्यामुळे नागरिकांना १३ किमी अंतर पार करून पायी तसेच नाल्यातून डोंग्याने (लांबट होडी) प्रवास करून मतदान केले. महाराष्ट्राने देशासमोर नेहमीच आदेश उभे केले आहेत. सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक, क्रीडा आणि राजकारणात असा कुठला प्रांत नाही की तेथे महाराष्ट्राचा झेंडा फडकला नाही. पण आज इतर राज्य एक पाऊल पुढे जात असताना मार्गदर्शक महाराष्ट्र राज्य निवडणुकीच्या निमिताने मागे जावे हे आपल्यासाठी भूषणावह नाही. आधी नेत्यांनी याचे भान ठेवायला हवे. संत परंपरेचा वारसा लाभलेली चांद्यापासून बांद्यापर्यंतची राज्यातील जनता शहाणी आहे. ती कधीच वाकडे पाऊल टाकणार नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -