घरफिचर्सआदिवासी - हिरवा की पिवळा

आदिवासी – हिरवा की पिवळा

Subscribe

सध्या आमच्याकडे भात, नागली, वरईच्या पेरण्या सुरू आहेत. प्रत्येक माणूस मातीत मळलेला, हातात घोंगड, डोक्यावर नांगर घेऊन शेतात जाताना नाही तर येताना दिसेल. साधारण फेब्रुवारी, मार्चमध्ये इथली माणसं ही पिवळी दिसायला लागतात. ते म्हणजे त्यांच्या कुपोषणामुळे. आता तुम्ही म्हणालं की, आताच तर मी म्हटले की हा भाग खूप सुपीक आहे, हिरवा आहे आणि मग लगेच पिवळा, अशक्त कसा काय झाला. तेच आपल्याला आज बोलायचे आहे, समजून घ्यायचे आहे.

जून २०१८ ला मी आदिवासी समूहाबरोबर काम करण्याची माझी अनेक दिवसांची इच्छा पूर्ण करण्यासाठी जव्हार मोखाडा भागात आले. मी १३ जूनला आले तेव्हा खूप पाऊस होता. मला वाटलं शहरातल्या पावसासारखा हा दोन तीन दिवस राहील आणि दमला की जाईल परत पण कसला? इथला पाऊस ही इथल्या माणसांसारखा दमतच नाही. एकदा का जून सुरु झाला की चांगला सप्टेंबरपर्यंत टिकून राहतो. तुम्ही या काळात आलात तर कुठेही पहा फक्त पाणी दिसेल आणि जिथे जमीन दिसेल तिथे वेगवेगळ्या प्रकारचे हिरवे रंग दिसतील.

सध्या आमच्याकडे भात, नागली, वरईच्या पेरण्या सुरू आहेत. प्रत्येक माणूस मातीत मळलेला, हातात घोंगड, डोक्यावर नांगर घेऊन शेतात जाताना नाही तर येताना दिसेल. आता तुम्ही त्यांच्याशी कोणत्याही महत्वाच्या विषयावर बोलायला गेलात तर त्यांना तुमचे ऐकायलाही वेळ नाही. प्रत्येकजण आपापल्या लावणीमध्ये बिझी आहे. ती लावणी नाही बरं का! ही शेतातली, चिखलातली लावणी आहे. नाही, सांगितलेलं बरं नाहीतर तुमच्या डोक्यात वेगळेच आवाज यायला लागतील. असा हा फक्त आणि फक्त हिरवा रंग असलेला प्रदेश नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये पूर्ण पिवळा पडतो. एक कारण आहे ते म्हणजे तोपर्यंत लावलेली पीक पिकतात, त्यांचा रंग पिवळा होता. जे पूर्ण पिकलेले शेत असते ते कापून घेतले जाते आणि खाली राहते ते गवत आणि हे गवत पिवळे असते म्हणून हा संपूर्ण भाग पिवळा दिसायला लागतो. त्यानंतर म्हणजे साधारण फेब्रुवारी, मार्चमध्ये इथली माणसं ही पिवळी दिसायला लागतात. ते म्हणजे त्यांच्या कुपोषणामुळे. आता तुम्ही म्हणाल की आताच तर मी म्हटले की हा भाग खूप सुपीक आहे, हिरवा आहे आणि मग लगेच पिवळा, अशक्त कसा काय झाला. तेच आपल्याला आज बोलायचे आहे, समजून घ्यायचे आहे.

- Advertisement -

जव्हार आणि मोखाडा हा भाग पूर्णतः डोंगराळ भाग आहे. इथे सलग अशी जमीन फारच थोडी आहे. कुठल्याही गावाला जायचे असेल तर तुम्हाला कुठला तरी डोंगर आधी चढावा लागतो किंवा कुठला तरी डोंगर उतरावा तरी लागतो. त्यामुळे तुम्हाला इथे यायचे असेल तर गाडीतून गोल गोल फिरण्याची आधी प्रॅक्टिस करायला हवी नाहीतर तुम्ही इथल्या रस्त्यांचा, इथल्या गोल गोल प्रवासाचा आनंद घेऊ शकत नाही. या भागातला डोंगर हा बसाल्ट नावाच्या दगडाचा बनलेला आहे आणि या दगडाचे वैशिष्ठ्य म्हणजे हा पाणी शोषित नाही. त्यामुळे जून ते सप्टेंबर याकाळात रोज मुसळधार पडणारा पाऊस पूर्णतः वाहून गुजरातला सुजलाम सुफलाम करतो आणि ऑक्टोबरनंतर इथल्या लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर ढकलतो. काही भागात जिथे जिथे जागरूक नागरिक आहेत, किंवा सामाजिक संस्था आणि लोकांचा ताळमेळ चांगला बसला आहे आणि त्या संस्थाना आदिवासी समूहाचा खरच विकास साधायचा आहे अशा ठिकाणी तुम्हाला असलेले पाणी त्या गावापुरते का होईना पण अडवलेले दिसून येईल.

या अडवलेल्या पाण्यामुळे तिथे पिण्याच्या पाण्याची उपलब्धता तर वाढतेच ज्यामुळे पाण्यासाठी स्त्रियांची होणारी तारांबळ, कुंचबणा, कष्ट वाचतात. त्यांना होणारे आजार होत नाही, त्यांचे श्रम वाचतात. त्याबरोबर बर्‍याच ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या शिवाय भाजी लागवड, मोगरा लागवड, औषधी वनस्पती लागवड किंवा फळबाग लागवड होताना दिसते, ज्यामुळे रोजीरोटीसाठी शहराकडे येणारे स्थलांतर थोडे कमी होताना दिसते आहे.

- Advertisement -

तुम्हाला दुसरा प्रश्न पडेल मग हे फक्त काही भागात का? सगळीकडे का नाही? मलाही हा प्रश्न पडला होता जेव्हा मी इथे नवीन आले होते. मला याची जी कारणे सापडली ती फारच त्रासदायक आहेत. माणसांच्या नीतिमत्तेचे काय करावे तेच समजत नाही. माणस भ्रष्टाचारी असतात म्हणजे किती याचा जितका विचार करु तेवढे शोध लागतात आणि तेवढा माणसावरचा विश्वास उडायला लागतो. या भागात लोकवस्ती खूपच विरळ असते. मी जेव्हा पहिल्यांदा इथली गाव जवळून पहिली, माणस जवळून पहिली तेव्हा मला ‘मानवाच्या विकास टप्प्यातील गुहेतून नुकताच बाहेर येऊन घर करुन राहणारा मानव’ हा जो टप्पा होता तो टप्पा आज इथे सुरू आहे असे जाणवले. ज्या ज्या समूहांमध्ये बदल झाला त्याला विकास म्हणायचे का नाही हा वादाचा प्रश्न होईल म्हणून मी बदल झाला असे म्हणेन, तो बदल व्हायला शिक्षण या गोष्टीचा मोठा वाटा होता असे माझे मत आहे.

त्यामुळे कुठल्याही बदलासाठी शिक्षणाने सुरुवात करावी असे मला वाटते. ज्यांनी ज्यांनी इथे बदल करायचा विचार केला, कृती केली किंवा त्याचे नियोजन केले त्यांनीही शिक्षणाकडे एक साधन म्हणून पहिले आणि त्याचा आधार घेण्याचा प्रयत्न केला. आता इथल्या विरळ लोकवस्तीला सामावून घ्यायचे असेल तर चौथीपर्यंत गावात शाळा आणि त्यानंतर आश्रमशाळा हा पॅटर्न इथे निश्चित केला गेला. त्याशिवाय दुसरा काय प्रकार इथे चालू शकतो याचा आज तरी शोध लागलेला नाही. आज हे चौथीपर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषदेच्या मार्फत आणि आश्रमशाळा चालवण्यासाठी आदिवासी विकास विभाग असा स्वतंत्र विभाग आणि त्यातही एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नावाचे अजून विशेष असा विभाग स्थापण्यात आला. ज्यामार्फत आजच्या आश्रमशाळा चालवल्या जात आहेत. एका एका आश्रम शाळेत नऊशे ते पंधराशे असे विध्यार्थी असतात. आज जो काही शिकलेला आदिवासी आपल्याला कुठल्या न कुठल्या पदावर दिसतो आहे तो या आश्रमशाळा मधूनच शिकून बाहेर पडला आहे.

आपल्या देशात एकूणच दोन देश असतात, राहतात असे मला कायम वाटते. एक म्हणजे आधुनिक, सतत नवनवीन मशिनरी बनवणारा/घेणारा/वापरणारा आणि अमेरीकेकडे डोळे लावून बसलेला इंडिया आणि रोजच आयुष्य इथेच कसाही का होईना काढणारा, एखादी गोष्ट नाही मिळाली की ती मला नकोच होती याचे स्पष्टीकरण देऊन जगणारा भारत. या दोन देशात मला इथे आल्यानंतर एक तिसराच देश सापडला आहे तो म्हणजे दुर्गम भारत. किती दुर्गम तर इथे स्वातंत्र्याच्या बहात्तर वर्षानंतरही अनेक गावात पक्का रस्ता नाही, त्यामुळे बसेस नाही, त्यामुळे कुठल्याही सोयीसुविधा नाहीत. आमच्या देशाने राष्ट्रप्रमुखपदावर बाईला बसवलं आता तर संरक्षण खात्याची धुराही चांगली सांभाळता येऊ शकते असे सांगू शकू इथंपर्यंत आम्ही पोहोचलो आहे, पण या सर्व दुर्मीळ उदाहरणांमध्ये आजही आमच्या भागात गरोदरपणात टीटनेसचे इंजेक्शन न मिळाल्यामुळे, बाळंतपणाच्या मूलभूत सुविधा न मिळाल्यामुळे, पोटात कळा सुरू झाल्या म्हणून १०८ ला फोन लावला तर बर्‍याच वेळा फोन लागतच नाही, पण लागलाच आणि गाडी गावाच्या जवळ आली की आमची बाई त्या कळा देत देत त्या गाडीपर्यंत कशीतरी पोहोचते आणि ड्रायव्हर सांगतो की आधी पेट्रोलचे पैसे द्या नाहीतर मी नेऊ शकणार नाही.

पहिल्यांदा आम्ही त्याला खूप शिव्या दिल्या, शिव्याशाप दिल्या, पण त्याचे सहा सहा महिन्याचे बिल शासनाकडून आलेले नाही हे वास्तव ही आम्हाला टाळता येत नाही. कारण तो काही कोणी श्रीमंत व्यक्ती नसतो. तोही आमच्या मधलाच कोणीतरी गरीब रोजीरोटीसाठी गाडी चालवत असतो. मग आम्हाला चार घरुन पैसे उसने घेऊन ते बाळंतपण करावं लागत. नाहीतर आहेच बातमी बाळंतपणात स्त्रीचा मृत्यू. कोणालाच या बातमीचं दुःख होईनासे झाले आहे. प्रशासन याकडे ताबडतोब धाव घेत ते यासाठी की बातमी बातमीदारापर्यंत कशी काय पोहोचली.

अशा सर्व सर्कशीतून वाचलेलं मुल जेव्हा आश्रमशाळेत येत तेव्हा त्याला ज्या ज्या परिस्थितीना तोंड द्यावं लागतं ते डोळ्याने पहिल्यानंतर वाटतं हे तेव्हाच गेलं असतं तर बरं झालं असतं. पूर्वी अनुदान आश्रमशाळेत यायचं त्यात खूप भ्रष्टाचार होतो याचे शेकडो पुरावे गोळा झाले, खूपच नामुष्की झाल्यावर आता पालकांच्या खात्यावर त्या त्या बालकाचे अनुदान जमा होऊ लागले तर इकडे आड तर तिकडे विहिर अशी परिस्थिती दिसू लागली आहे. घरातलं एक खाणार तोंड कमी होईल या प्रेरणेने शाळेत मूलं गेलं पाहिजे असं मानणारे पालक त्या अनुदानाकडे वेगळ्याच नजरेने पहात आहेत आणि त्याचा दुष्परिणाम पुन्हा एकदा विद्यार्थ्यांनाच भोगावा लागतो आहे. शाळेत जेवण तर येते पण सर्वांना ताटा सारख्या नाही त्यामुळे डाळभात, भाजी आणि चपाती वेगळी वेगळी दाखवा आणि बक्षीस घ्या अशी ताट तुम्हांला दिसतील. कारण आता ताटा घरुन येतात. चवीबद्दल बोलायचे नाही. चपाती कच्ची असते कारण ती मशीनवर बनवतात.

शाळेत येईपर्यंत ती एकदम चामट बनते इ.इ. पण बोलायचे नाही. कारण घरी खायला मिळत नव्हते, पण इथे मिळते ना हा देणार्‍यांचा आणि घेणार्‍यांचाही भाव असतो. सकाळी आठ वाजता छान नाश्ता, दुपारी १२.३० वाजता जेवण, दुपारी ३ वाजता टेट्रा पॅकमध्ये दूध, ताक, कोकम असे काहीतरी आणि ६.३० वाजता रात्रीचे जेवण असे मिळते. रात्रीचे जेवण शाळा ६.३० ऐवजी ७ पर्यंत देतात. मुलं साधारण दहा वाजता झोपतात. तेव्हा त्यांना भूक लागते तेव्हा काय द्यायचे याचा कुठलाही विचार प्रशासनाकडे नाही, मग मुलांनी स्वतःचा मार्ग अवलंबला तो म्हणजे चपाती भाजी ताटात जास्त घ्यायची आणि ती रात्री चोरुन खायची. यावर मुलांना शिक्षा झाली म्हणून कोणीतरी चौकशी केली की जेवण असे ६.३० वाजता का तर कोणीतरी एका माजी सनदी अधिकारी यांनी तसे परिपत्रक काढले होते त्याचा नियम झाला आणि तो कोणी बदलायचा प्रयत्न केला तर त्याला मेमो मिळतो.

स्वच्छतागृह स्वच्छ नाही, वर्गात बसायला नीट बेंचेस किंवा सतरंज्या नाहीत, पावसाळ्यात कपडे वळवायची व्यवस्था नाही, मुलीना पाळीच्या काळातले कपडे विसर्जित करायला व्यवस्था नाही, देण्यात आलेले पॅड इतके वाईट आहेत की त्यात भ्रष्टाचार करणार्‍यांच्या नीचपणाची कीव येते. झोपायला छान कोरडी जागा, पुरेसे पांघरुन नाही. शिक्षणाचा दर्जा यावर अनेक प्रयोग सुरू आहेत, पण हाती काही लागलंय असं दिसत नाही. त्यात आदिवासी समूह अतिशय अबोल, अडचणीने जीव जातो तरी तोंडातून चकार शब्द काढणारा हा समूह कसा तगेल तेच समजत नाही. मिनिटा मिनिटाला संगणक लागणार असं सारखं विकासाच्या नावाने बोलल जात आहे त्यात हा समूह कसा टिकेल याची आजच्या नेतृत्वाकडे उत्तर आहेत असे दिसत नाही. आदिवासी शिक्षक आले, आदिवासी लोकप्रतिनिधी आले की सगळे प्रश्न मिटतील असे वाटले होते, पण तशी परिस्थिती दिसत नाही. आजचे नेतृत्व शहरातल्या किंवा नागरी भागातले नेतृत्व भ्रष्टाचार कसा करत होते, ते कसे लवकर श्रीमंत झाले याचेच गणित लवकर शिकले आणि तेच आजमावण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे वरील सर्व तक्रारींमध्ये ज्यांच्याकडून या सुविधा घेतल्या जात आहेत ते सर्व निर्णय घेणार्‍यांमध्ये आदिवासी आहेत मग ते कारकून म्हणून असतील. लोकप्रतिनिधी म्हणून असतील तरी परिस्थिती जैसे थे वैसे ही है हे दुःख आहे.

एवढं सगळं दुःख एकत्र वाचून तुम्ही दमला असाल, निश्चितच. पण या सर्वांवर उपाय आहेत. दलित शिकला कारण त्याच्याकडे ‘शिका, संघटित व्हा आणि तुमचा संघर्ष तुम्हीच करा’ ही प्रेरणा होती. दलित आरक्षणामुळे नाही, काही करुन शिकलंच पाहिजे त्याशिवाय गत्यंतर नाही हे समजल्यामुळे विकसित झाला. त्यामुळे उपाशी राहिला पण शिकला ती प्रेरणा आदिवासी समुहात निर्माण केली पाहिजे. सीएसआरच्या कोटींच्या प्रकल्पामुळे स्टाफ श्रीमंत होतो, आदिवासी नाही. जे आदिवासी शिकले आणि शहरात गेले त्यांनी आपल्या या गावातल्या भावाबहिणीशी नाते जोडले पाहिजे. संबंधित प्रशासनामध्ये जे लोक बसले आहेत त्यांनी कामाची, सोयीसुविधांची गुणवत्ता जपली जाईल याकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि जे कोणी ही गुणवत्ता टिकवणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई करण्याला हयगय करता कामा नये. आदिवासी अबोल आहे म्हणून त्यांना तसंच अबोल ठेवू पाहणार्‍या शिक्षकांना थोड अधिक काम करावं लागेल. कितीही शिकवा यांना कळतच नाही या शिक्क्यातून शिक्षकांना स्वतःला बाहेर काढावं लागेल.

काय केले तर विध्यार्थी बोलेले याचे मार्ग शोधावे लागतील त्यासाठी न दमता शेकडो प्रयोग करायला लागतील. त्याच अबोल आदिवासी विद्यार्थ्यांजवळ बसून त्याला शिकवावं लागेल त्यासाठी आपली ड्युटी आश्रमशाळेत असेल तर तिथेच मुक्काम करावा लागेल. आपण सध्या राहतो शहरात, शाळेत येतो अकरा वाजता आणि जातो चार वाजता हा दिनक्रम बदलावा लागेल. गांधीजी म्हणायचे ‘करके देखो’. आज या भागात असे करके देखो मानणारे लोक आहेत आणि त्यांनी त्यांच्या त्यांच्या कुवतीनुसार असे छोटी छोटी हिरवी बेटे मनोभावे तयार केली आहेत. त्यांच्या मनोभावे काम करण्याच्या वृत्तीमुळेच काही ठिकाणी भर उन्हाळ्यात हिरवळ सापडते तीच वृत्ती सर्वांनी ठेवली तर आज आठ महिने कुपोषित/ पिवळा दिसणारा आदिवासी नक्कीच हिरवा दिसेल. चला आपण सर्व मिळून या हिरव्याच्या प्रवासात सामील होऊ या……

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -