हंसदा सोवेंद्र शेखर : भूमिकेचे भान असलेला लेखक!

संथाळ या आदिवासी जमातीत जन्मलेल्या आणि व्यवसायाने डॉक्टर (वैद्यकीय अधिकारी) असलेल्या हंसदाला 2017 मध्ये ‘संथाळी समाजाच्या विशेषतः स्त्रियांच्या विकृत चित्रणाच्या’ आरोपाखाली एकीकडे हजारो लोकांच्या मोर्चाला सामोरे जावे लागले, समाजमाध्यमांवर सतत ट्रोल व्हावे लागले, छत्तीसगढमधील चौकाचौकात त्याचे पुतळे जाळले गेले, विधानसभेत निषेधाचे ठराव झाले....एकीकडे त्याच्या पुस्तकाची होळी केली गेली तर दुसरीकडे त्याला नोकरीवरून निलंबित केले गेले.

Mumbai

‘अशी असावी कविता,फिरून
तशी नसावी कविता,म्हणून
सांगावया कोण तुम्ही कवीला
अहांत मोठे?-पुसतो तुम्हांला’

लेखक-कलावंताचे प्रतिनिधित्व करत वाङ्यबाह्य सेन्सॉरशीपला ठामपणे नाकारणारी ही कवी केशवसुतांची रोखठोक भूमिका.आजपासून साधारणतः सव्वाशे वर्षांपूर्वी मांडलेली. काळ जसा बदलेल तसा हा सेन्सॉरशीपचा वेताळ समाजाच्या मानगुटीवरून उतरेल, लोक कलाकृतीकडे अधिक मोकळेपणाने पाहू लागतील अशी त्यांचीही अपेक्षा असेल; पण प्रत्यक्षात मात्र हा ‘सोशल सेन्सॉरशीप’चा वेताळ दिवसेंदिवस अधिकाधिक अक्राळविक्राळ होताना दिसतोय.

मराठी भाषा-प्रदेशात राहत असल्याने आपणाला असं वाटतं की, आपला समाज अधिक ‘संवेदनशील’ असल्याने त्याच्या भावना सतत दुखावत असतील. अन्य भाषा-प्रदेश याबाबत अधिक मोकळे असतील. पण वास्तव यापेक्षा नेमकं विपरीत आहे. ‘भावना दुखावण्याच्या’ या विषाणूचा संसर्ग ‘अखिल भारतीय’ आहे. भारतातला बहुदा एकही भाषा-प्रदेश यातून सुटलेला नाही.

दिनकर मनवर या अतिशय गंभीर आणि आशयघन कविता लिहिणार्‍या कवीला ‘पाणी कसं असतं?’ या कवितेतील ‘आदिवासी स्त्री’शी निगडित एका प्रतिमेमुळे अक्षरशः आरोपीच्या पिंजर्‍यात उभं केलं गेलं. शिव्या-शाप-अपमान हे तर सोसावेच लागले, पण अखेर भारतातल्या पहिल्या आणि आधुनिक मानल्या जाणार्‍या मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून त्यांची ही कविता वगळण्यात आली. खरेतर मनवर यांच्यासारख्या संवेदनशील कवीला जे सोसावे लागले, ते भयंकर त्रासदायक होतेच; परंतु इंग्रजी या पुढारलेल्या भाषेतून लेखन करणार्‍या आणि वयाच्या पस्तिशीत युवा साहित्य अकादमी पुरस्कार मिळविलेल्या हंसदा सोवेंद्र शेखरला ‘आदिवासी विल नॉट डान्स’ या कथासंग्रहासाठी जे भोगावे लागले, ते अधिक भयंकर होते.

संथाळ या आदिवासी जमातीत जन्मलेल्या आणि व्यवसायाने डॉक्टर (वैद्यकीय अधिकारी) असलेल्या हंसदाला 2017 मध्ये ‘संथाळी समाजाच्या विशेषतः स्त्रियांच्या विकृत चित्रणाच्या’ आरोपाखाली एकीकडे हजारो लोकांच्या मोर्चाला सामोरे जावे लागले, समाजमाध्यमांवर सतत ट्रोल व्हावे लागले, छत्तीसगढमधील चौकाचौकात त्याचे पुतळे जाळले गेले, विधानसभेत निषेधाचे ठराव झाले….एकीकडे त्याच्या पुस्तकाची होळी केली गेली तर दुसरीकडे त्याला नोकरीवरून निलंबित केले गेले.

त्याचा अपराध काय? तर ‘आदिवासी विल नॉट डान्स’ या कथासंग्रहातील ‘नोव्हेंबर इज फॉर मायग्रेशन’ या कथेत परिस्थितीच्या रेट्यामुळे शरीरविक्रयाचा निर्णय घ्यावा लागणार्‍या तालामाई या संथाळ मुलीचे पात्रचित्रण. दोन ब्रेड पकोडे आणि पन्नास रुपयांसाठी आपली अब्रू लुटू देणारी तालामाई संथाळ महिलांच्या शोषणाचे प्रतीक म्हणून लेखकाने या कथेत उभी केली आहे. अर्थात युवा पिढीचा प्रतिनिधी असलेल्या हंसदाची भाषा कसलाही आडपडदा न ठेवता या लैंगिक शोषणाचे ‘थेट चित्रण’ करणारी आहे. पण त्याच्या या चित्रणामुळे म्हणे तथाकथित संथाळांच्या भावना दुखावल्या. संथाळ आदिवासी स्त्रीचे प्रतिमाहनन झाले. म्हणजे आदिवासी स्त्रीला अशा शोषणाला बळी पडावे लागते, यात तिच्या प्रतिमेचे नुकसान होत नाही; पण त्यामध्ये ‘विधायक हस्तक्षेप’ करण्यासाठी तिला, तिच्या शोषणाला कलाकृतीचा विषय बनविले की प्रतिमाहननाचे आरोप जोर पकडतात. हंसदाच्या बाबतीत असेच झाले.

तो कसा स्त्रीद्वेष्टा आहे इथपासून ते त्याचे लेखन म्हणजे ‘प्रतिष्ठाप्राप्त पोर्नोग्राफी’ आहे इथपर्यंत आणि तो कसा आदिवासी विरोधी आहे, इथपासून ते त्याने आपल्या लेखनासाठी आदिवासींचा कसा गैरवापर केला आहे इथपर्यंतच्या आरोपांची राळ उडविण्यात आली.

खरेतर एकविसाव्या शतकाच्या पहिल्या-दुसर्‍या दशकांत एकंदर भारतीय साहित्यात ‘पटेल ते लिहिणार आणि रुचेल ते रंगविणार’ हा रोखठोक बाणा बाळगणारे जे ‘यंग टॅलेंट’ जोरकसपणे पुढे आले, त्याचा प्रतिनिधी म्हणजे हंसदा सोवेंद्र शेखर.
वयाच्या पंधराव्या वर्षी ‘द एशियन एज’च्या पुरवणीत हंसदाची पहिली कथा प्रकाशित झाली. ही घटना 1998 ची. पण त्याचे पहिले पुस्तक प्रकाशित व्हायला 2015 हे साल उजाडावे लागले. यावरून लेखक म्हणून त्याच्याकडे असलेला संयम लक्षात यावा. त्याचे पहिले पुस्तक म्हणजे ‘द मिस्टेरिअस एल्मेंट ऑफ रुपी बास्की’. साहित्यप्रकार कादंबरी. ज्याच्यासाठी त्याला त्या वर्षीचा प्रतिष्ठेचा ‘युवा साहित्य अकादमी’ पुरस्कार मिळाला.

ही गोष्ट जशी रुपी बास्की या संथाळ स्त्रीची आहे, तशी बास्की कुटुंबाच्या तीन पिढ्यांचीही आहे, तिच्यावर केल्या जाणार्‍या जादूटोण्याची आहे तशीच ती कादमदीही या खेड्याची आणि एकंदर संथाळ संस्कृतीचीही आहे. जे लोक हंसदावर स्त्रीद्वेष्टा असल्याचा आरोप करतात त्यांनी आवर्जून या कादंबरीत त्याने चित्रित केलेल्या कष्टाळू, कणखर आणि स्वाभिमानी स्त्री पात्रांवर नजर टाकायला हवी. त्यात कादंबरीची नायिका रुपी बास्की तर आहेच, पण त्याशिवाय पुटकी, डेला, सोमई बुधी आणि रुपीवर जादूटोण्याचा प्रयोग करणारी गुरबारी-दुलारी या सगळ्याच स्त्रियांची जी पात्रे लेखकाने उभी केली आहेत,त्यावरून त्याचा स्त्रीविषयक दृष्टीकोन ठळकपणे लक्षात यायला हवा.

कादंबरीच्या पहिल्या पृष्ठावरचा पहिलाच प्रसंग हा भातशेती करताना भर शेतात बाळाला जन्म देणार्‍या काटक रुपीचा आहे. तिचा नवरा सिडो हा शिक्षक आहे, सासरा सगळ्या गावचा मुखिया आहे, सासूही आहे; पण संपूर्ण कादंबरीत केंद्रवर्ती आहे ती काटक आणि कष्टाळू रुपी. पण तिचा हा काटकपण सिडोवर प्रेम करणारी गुरबारी-दुलारी दाहिनी-बिद्याच्या (जादूटोण्याच्या) प्रयोगाने प्रभावहीन करू पाहते; यातून ती रुपीचे शरीर खिळखिळे करते, मात्र तिच्या जिद्दीला नामशेष करू शकत नाही.

पहिल्या कादंबरीत रुपीची जिद्द रेखाटणार्‍या हंसदाने ‘माय फादर्स गार्डन’ या दुसर्‍या कादंबरीत समलैंगिकता, प्रेम आणि आस्था या विषयांना हात घातला आहे. ‘लव्हर’, ‘फ्रेंड’ आणि ‘फादर’ अशा तीन भागांत विभागलेल्या या कादंबरीने निनावी निवेदकाच्या माध्यमांतून समीर, बडा बाबू आणि आदिवासींच्या हक्कासाठी आयुष्यभर झगडून उतारवयात एकाकी झालेले वडील यांचे भावस्पर्शी चित्र रेखाटले आहे. इच्छा, पुरुषत्व आणि परात्मता हे या कादंबरीचे मध्यवर्ती सूत्र आहे. सहसा ज्या विषयांवर साहित्यप्रांती कमालीचे मौन असते, त्या विषयांना वाचा फोडणे हे जणू हंसदाच्या लेखनप्रवासाचे ब्रीद राहिलेले आहे. म्हणून तर पहिल्या कादंबरीत छत्तीसगड राज्यात आदिवासींच्या हिताच्या नावाखाली केल्या जाणार्‍या भ्रष्ट राजकारणावर बोचरी टीका आहे, कथासंग्रहातील अगदी पहिल्याच कथेत कुणी काय खावे आणि खाऊ नये यांत नाक खुपसणे म्हणजे राजकारण नव्हे असे प्रचलित राजकारणावर रोखठोक भाष्य आहे तर ‘माय फादर्स गार्डन’ या कादंबरीत आपल्या पूर्वजांच्या ‘आदिवासी कल्याणाच्या स्वप्नांचे’ कसे खंडहर झाले आहे, याबद्दलची खंत आहे.

एकीकडे धारदार राजकीय भाष्य करणारा हा युवा लेखक किती हळूवारपणे बालमनांवर जादूचे मोरपीस फिरवू शकतो, याचे प्रत्यंतर त्याच्या ‘ज्वाला कुमार अँड द गिफ्ट ऑफ फायर’ या बालकादंबरीतून येते. मोहन चंदर, त्याची पत्नी रूपा आणि बिरेन, नरेन व नमिता या साध्याभोळ्या कुटुंबाच्या जीवनात ‘प्रकाश पेरणारा एक अद्भुत प्राणी’ येतो तेव्हा या कुटुंबाचे जीवन कसे बदलून जाते, याची उत्कंठावर्धक सफर या बालकादंबरीत आहे.

व्यवसायाने डॉक्टर (वैद्यकीय अधिकारी) असलेल्या हंसदा सोवेंद्र शेखर याचा हा आजपर्यंतचा लेखनप्रवास. वय एकोणचाळीसच्या घरात. म्हणजे अद्याप तरुणच; पण यातली लक्षवेधी गोष्ट म्हणजे कोणत्याच साच्यात अडकून न पडण्याची सातत्यपूर्ण धडपड. कथा, कादंबरी, बालकादंबरी या साहित्यप्रकारांबरोबर ‘इरॉटिक स्टोरीज’चीही (उद्दीपीत करणार्‍या कथांची) दोन पुस्तके त्याच्या नावावर आहेत. यापैकी काहीही त्याने ना लपवले आहे ना कधी नाकारलेले आहे.

आपण ना आदिवासींचे प्रवक्ते आहोत, ना त्यांचे विरोधक; उलट संथाळ संस्कृतीचे सत्त्व शोधण्याचा प्रयत्न आपल्या साहित्यकृतींमधून करत असतो, ही स्पष्ट भूमिका.यातूनच तो इंग्रजीतून लिहीत असला तरी कित्येक संथाळी शब्द, म्हणी जशाच्या तशा इंग्रजीत वापरतो. लोकविरोधाची तमा न बाळगता संथाळी भाषेसाठी ‘नव्या लिपीचा’ आग्रह धरतो. या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणून तो राजकीय नेत्यांपासून ते सामाजिक संघटनांपर्यंत अनेकांच्या डोळ्यांत खुपतो.

रोखठोक आणि टोकदार असली तरी त्याची भूमिका न्याय्य असल्याने ती नाकारायची कशी? अशा दुविधेत अडकलेल्या गटांकडून मग ‘भावना दुखावण्या’चा सोपा खेळ खेळून साहित्यकृतीला धोपटण्याचे आणि लेखकाला हिणवण्याचे हिडीस प्रकार सुरू होतात.

हंसदाच्या बाबतीतही हे खेळ खेळले गेले, त्याची पुस्तके फाडली, पुतळे जाळले, नोकरीवरून निलंबित केले गेले….पण यापैकी कशानेही त्याचा आवाज बंद होत नाही हे लक्षात आल्यावर पोलिटिकल पार्टीज अन् सोशल सेन्सॉरशीप दोहोंनीही आपले गुडघे टेकले आणि एकीकडे नोकरीवरचे निलंबन मागे घेतले तर दुसरीकडे ज्या पुस्तकावर बंदी आणली,तेच पुस्तक बेस्टसेलरच्या यादीत विराजमान झाले.

आपल्या भूमिकेवर पक्का भरवसा असला की ‘भावना दुखावण्याच्या’ विषाणूंशी दोन हात करण्याच्या तयारीत राहता येते…अशा कलावंतांचा कॉन्फिडन्स प्रकट करण्यासाठीच केशवसुतांनी लिहून ठेवले आहे:

‘आम्हांला वगळा गतप्रभ झणी होतील तारांगणे
आम्हांला वगळा विकेल कवडीमोलावरी हे जिणे!’