‘खारफुटी वाचवा, नवी मुंबई वाचवा’

Mumbai

गणेशोत्सवात जेवढे महत्व गणेश मुर्तींना असते तेवढे किंवा त्यापेक्षा अधिक महत्व त्या भोवताली असणाऱ्या विविध सजावटीलाही असते. प्रत्येकजण आपापल्या परीने सजावट करण्याचा प्रयत्न करतो. काही लोक आपल्या सजावटीच्या माध्यमातुन सामाजिक संदेश देऊन सामाजिक भान जपतात. असाच एक छोटासा प्रयत्न नेरुळ येथील शिवआधार चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने करण्यात आला आहे. सध्या पीओपीच्या गणेश मुर्त्यांची स्थापना जागोजाग पहायला मिळते. या गोष्टीला शह देत शिवआधार संस्थेच्या अभ्यास केंद्रातील मुलांनी झाडाचा गणपती तयार केला आणि पीओपीपासुन होणारी निसर्गाची हेळसांड टाळण्याचा प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हे यंदाचे तिसरे वर्ष आहे. याही वर्षी २ सप्टेंबर गणेश चतुर्थीला नेरूळ एल.पी या ठिकाणी झाडाला गणेशाच रूप देऊन त्यासोबतच खारफुटीचे महत्व पटवून देणारा एक सुंदर देखावा तयार करण्यात आला आहे.

 

खारफुटीबाबत जनजागृती करणे जरुरी

नवी मुंबईच्या ठिकठिकाणी खाडीच्या बाजूला मोठ्या प्रमाणात खारफुटी आहे. परंतु, ही खारफुटी जर नष्ट केली गेली तर नवी मुंबईवर महापुराचे संकट सुद्धा येऊ शकते. किनारपट्टीची रक्षक म्हणुन खारफुटीला ओळखले जाते. खारफुटीमुळे प्रदुषणावर मात करता येऊ शकते. उदरनिर्वाहास सुद्धा खारफुटी मदत करतात. त्याचबरोबर खाडीमध्ये असणारी जैवविविधता ही खारफुटीवर आधारित आहे आणि अशी खारफुटी सारखी लाखमोलाची जीवनदायीनी नष्ट करणे म्हणजे आपण ज्या फांदीवर बसलो आहोत ती फांदी तोडण्यासारखा हा प्रकार असल्याने याबाबत जनजागृती आणि संवर्धन करणे आवश्यक झाले आहे. अति महत्वाच्या पण तितक्याच दुर्लक्षित गोष्टीकडे लोकांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न शिवआधार चॅरिटेबल ट्रस्टला मार्फत करण्यात आला आहे. यामध्ये संस्थेच्या अभ्यास केंद्रातील मुलांनी झाडाचा गणपती बाप्पाची सजावट करुन इकोफ्रेंडली गणेशोत्सव साजरा केला.