जाणून घ्या; मंगळवारच्या संकष्ट चतुर्थीची कहाणी

संकष्टी जेंव्हा मंगळवारी येते तेंव्हा तिला अंगारकी चतुर्थी म्हणून संबोधिले जाते

Mumbai

मंगळवारी येणाऱ्या संकष्टी चतुर्थी “अंगारकी ” म्हणून का संबोधिले जाते. आपल्या हिंदू धर्मातली सहसा सर्व गणेश भक्त संकष्टी चतुर्थीच्या दिवशी उपवास धरतात. आपापल्या घरी संध्याकाळी देव्हाऱ्यातल्या श्रीगणेशाची पूजा करून बाप्पाला दुर्वा आणि मोदक अर्पण केले जातात आणि चंद्रोदयानंतर गणपती श्लोक वाचून मगच हा उपवास सोडला जातो. परंतु हीच संकष्टी जेंव्हा मंगळवारी येते तेंव्हा तिला अंगारकी चतुर्थी म्हणून संबोधिले जाते. या मागची कथाही तितकीच रंजक आहे.

कथा अंगारक संकष्ट चतुर्थीची

गणेशभक्त आणि वेदवेत्ते अग्निहोत्री ऋषी भरद्वाज अवंती नगरीत राहत होते. क्षिप्रा नदीवर ते एकदा स्नानाला गेले असता एक अप्सरा जलक्रीडा करत होती. तिला पाहून भरद्वाजांचे तेज द्रवीभूत झाले. ते पृथ्वीने धारण केले. त्यानंतर पृथ्वीला जो पुत्र झाला तो जास्वंदीच्या फुलासारखा लाल होता. तो सात वर्षाचा झाल्यावर पृथ्वीने त्याला ऋषींच्या स्वाधीन केले. त्याचे उपनयन केले, वेद शिकविले आणि गणेशमंत्र देऊन उपासना करायला सांगितले. त्यानंतर तो आरण्यात गेला. त्यांने एक सहस्त्र वर्ष तप करून श्रीगणेशाला प्रसन्न केले.

त्रैलोक्यात प्रसिद्ध व्हायचा वर त्यानं प्रसन्न झालेल्या गणेशाकडे मागितला. त्यावर गणेशानं आज जी चतुर्थी आहे ती सर्वाना कल्याणकारी होवो असं वरदान दिलं. ‘तुझं नाव भूमिपुत्र म्हणून भौम, अंगारकासारखा लाल आहे. म्हणून अंगारक आणि शुभ करण्याची शक्ती तसेच मंगल म्हणून प्रसिद्ध होईल, या चतुर्थीला अंगारकी म्हटले जाईल आणि हे व्रत करणाऱ्या ऋणमुक्ती प्राप्ती होईल. तुला आकाशात ग्रहांमध्ये स्थान मिळेल आणि तू अमृत प्राशन करशील’ असा वर त्याला गणेशानं दिला. तोच वार मंगळवार होता आणि गणेशाच्या या वरदानामुळे या अंगारकी चतुर्थीला महत्त्व प्राप्त झालं.

गणेश अंगारकी श्लोक

गणेशाय नमस्तुभ्यं,
सर्व सिद्धि प्रदायक ।
संकष्ट हरमे देवं,
गृहाणार्घ्यम् नमोऽस्तुते ॥
कृष्णपक्षे चतुर्थ्यातु , सम्पूजितं विधूदये। क्षिप्रं प्रसीद देवेश,
अंगारकाय नमोऽस्तुते ॥