कोरोनापासून वाचण्यासाठी चांगला आणि सुयोग्य आहार घ्या

Mumbai
Eat a good and proper diet to avoid corona
कोरोनापासून वाचण्यासाठी चांगला आणि सुयोग्य आहार घ्या

कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्याचे आव्हान आपल्या सर्वांसमोर आहे. त्यामुळे अनेक प्रकारच्या अफवासुद्धा पसरवल्या जात आहेत. कोरोनाची लागण होऊ नये म्हणून ‘हे खा’ किंवा ‘हे खाऊ नका’ अशा अफवासुद्धा पसरत आहेत. पण एक गोष्ट आपण सर्वांनी लक्षात घ्यायला हवी, ती म्हणजे, कोणताही एक खाद्यपदार्थ तुम्हाला कोरोनापासून वाचवू शकत नाही. पण, चांगला आणि सुयोग्य आहार (डाएट) तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवू शकतो आणि त्यामुळे कोरोनाशी लढण्यासाठी तुमचे शरीर अधिक बलशाली होऊ शकते. त्यामुळे नेहमीपेक्षा सध्याच्या काळात आपण अधिकाधिक आरोग्यदायी आहार घेण्याची गरज निर्माण झाली आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे, तुमच्या जेवणात विविधता असू द्या. तुमच्या जेवणात वेगवेगळी ताजी फळे आणि हिरव्या भाज्या यांचा समावेश असू द्या.

फळे

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी व्हिटॅमिन सी अत्यंत महत्वाचे आहे. संत्री, मोसंबी, किवी, पपई, गाजर आणि लिंबू ह्यांमधून तुम्हाला सहज सी विटॅमिन मिळू शकते.

अंडी आणि डाळी

झिंकची कमतरता असेल तर तुम्ही रोगाला किंवा आजाराला सहज बळी पडू शकता. अंडी आणि लाल मांस यांद्वारे आपल्याला झिंक मिळू शकते. पूर्ण धान्ये, बीन्स, वाटाणा, डाळी यांमधूनही आपल्या शरीराला आवश्यक ते झिंक मिळू शकते.

आले

सर्दी किंवा खोकला झाला असेल तर आले तुमच्या आहारात असायलाच हवे. आल्यामध्ये लोह, झिंक, कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअम भरपूर प्रमाणात असल्यामुळे सर्दी-खोकला किंवा फ्ल्यूसारख्या आजारांविरोधात लढण्यासाठी तुम्हाला अधिक बळ मिळेल.

व्हिटॅमिन ए

तुमचे आरोग्य आणि रोगप्रतिकारक शक्ती सुदृढ राखण्यासाठी ए जीवनसत्व अत्यंत महत्वाचे आहे. मासे, अंड्यातला पिवळा बलक, चीज, पूर्ण धान्ये, डाळी आणि हिरव्या पालेभाज्या यामधून तुम्हाला योग्य त्या प्रमाणात ए जीवनसत्व मिळू शकते.

व्हिटॅमिन डी

सूर्यप्रकाशाद्वारे आपल्याला नैसर्गिकपणे व्हिटॅमिन डी मिळत असते. सुरमई, ट्यूना यांसारख्या माशांमधून तर अंडी, चीज, मशरुममधूनही व्हिटॅमिन डी मिळते.

कोमट पाणी प्या

भरपूर पाणी प्या. शक्यतो कोमट पाणी पिणे महत्त्वाचे आहे.

धूम्रपान करणे थांबवा

तुमच्या फुफ्फुसांना कोणताही संसर्ग होऊ नये, म्हणून धूम्रपान करणे थांबवा. त्यासोबतच मद्यसेवन देखील टाळा.

पुरेशी झोप घ्या

ताणमुक्त राहाण्यासाठी पुरेशी झोप घ्या.