गणपती स्पेशल : लाडक्या बाप्पासाठी खास गोड नैवेद्य

बाप्पा जसा कलांचा आणि विद्यांचा अधिपती, तसा खाण्याचाही नक्कीच शौकीन असावा यासाठीच बाप्पाला विविध प्रकारचे नैवेद्यांचा प्रसाद दिला जातो. गणपती बाप्पाला मोदक, पुरणपोळी, अनारसे असा खास गोड पदार्थांच्या नैवेद्यांची रेसिपी तुमच्यासाठी घेवून आलो आहोत.

Mumbai
ganesh chaturthi special Sweet recipes
लाडक्या बाप्पासाठी खास गोड नैवेद्य

सोमवारी सर्वांचे लाडके दैवत श्री गणरायाचे आगमन मोठ्या थाटामाटात झाले आहे. मात्र, बाप्पाला दररोज गोडाचा नैवद्य काय द्यावा, असा प्रश्न नेहमी पडतो. त्यात उकडीचे मोदक हे सर्रास बनवले जातात. म्हणून आपण त्यात वेगळेपण आणणार आहोत. आज आपण आपल्या लाडक्या गणपती बाप्पाकरता खास गोडाचा नैवेद्य पाहणार आहोत.

‘खव्याचे मोदक’


साहित्य:

१/२ कप खवा
१/२ कप साखर
२ ते ३ टेस्पून मिल्क पावडर
२ चिमटी वेलची पूड

कृती:

साखर मिक्सरमध्ये बारीक करून पिठी साखर बनवा. त्यानंतर खवा मायक्रोवेव्हसेफ भांड्यात ठेवून १ मिनिट हाय पॉवरवर गरम करा. भांडे बाहेर काढून ४० ते ४५ सेकंद ढवळा. यामुळे आत कोंडली गेलेली वाफ बाहेर पडेल. परत ४५ ते ५० सेकंद मायक्रोवेव्ह करा. त्यानंतर भांडे बाहेर काढून ढवळा. खवा कोमटसर झाला कि पिठीसाखर आणि वेलचीपूड घालून मिक्स करुन घ्या. मिश्रण व्यवस्थित आळले तर मोदकाच्या साच्यात भरून मोदक बनवावेत. मिश्रणाला जर मोदक होण्याइतपत घट्टपणा आला नसेल तर मिल्क पावडर घालून मिश्रण हाताने मळून घ्यावे.
[खूप जास्त मळू नये, फक्त नीट मिक्स होईस्तोवर मळावे. नाहीतर गोळा तुपकट आणि चिकट होईल].

‘पुरणपोळी’


साहित्य

३ वाट्या हरभरा डाळ
३ वाट्या चिरलेला गूळ
१ वाटी साखर
अर्धे जायफळ
५ – ६ वेलदोडे
३ वाट्या कणीक,
३ टेपस्पून मैदा
मीठ
तेल
तांदळाची पिठी

कृती 

चणा डाळ सुमारे २ तास भिजत घालावी. त्यानंतर ती कुकरमध्ये शिजवून घ्यावी. डाळ शिजल्यानंतर चाळणीत ओतून त्यातील पाणी काढावे. उरलेले पाणी निघून जाईपर्यंत ती चांगली परतावी. डाळ पातेल्यात घालून घोटावी. त्यात गूळ आणि साखर घालून शिजवायला ठेवा. शिजलेले पुरण गॅसवरून उतरवून त्यात जायफळ, वेलदोडे पूड घालून गरम असतानाच पुरणयंत्रातून वाटून घ्या. कणीक व मैदा चाळणीने चाळून त्यात चीमूटभर मीठ, पाव वाटी तेल टाकून कणीक २ तास भिजत ठेवा. कणीक भिजवून झाल्यावर त्यात थोडे तेल घालून मळावी.

पुरणपोळी करायला पुरण आदल्या दिवशी शिजवून वाटून ठेवावे. पातेले पाण्यात घालून ठेवले तरी चालते, फ़्रिजमध्ये ठेवायची जरूर नाही. लिंबाच्या आकाराचा गोळा घेऊन वाटीसारखा करून त्यात वाटलेल्या पुरणाचा गोळा घालून तांदळाच्या पिठावर लाटावी. पोळी तव्यावर टाकल्यावर वारंवार उलटू नये. एका बाजूने टाकून फुगून आली म्हणजेच उलटवून दुस-या बाजूने भाजावी.

‘अनारसे’


साहित्य

तांदूळ, गूळ, तूप, खसखस, तळण्यासाठी तेल किंवा तूप

कृती

तांदूळ ३ दिवस पाण्यात भिजवावेत, प्रत्येक दिवशी पाणी बदलावे. चौथ्या दिवशी चाळणीत पाघळत ठेवावे मग कोरडे करून घ्यावे. यानंतर मिक्सरमध्ये एकदम बारीक करुन घ्या आणि चाळणीमधून चाळून घ्यावे.
किसलेला गूळ आणि १ चमचा तूप चाळलेल्या बारीक तांदूळात मळावे. घट्ट मळलेला गोळा ५-६ दिवस डब्यात भरून ठेवा. ५-६ दिवसांनी पिठ बाहेर काढावे. तळण्यासाठी मध्यम स्वरुपात तेल गरम करावे. २-३ सुपारीएवढे गोळे करुन पुरीसारखे लाटावे. लाटताना खसखशीवर लाटावी. हि पुरी तळताना खसखस असलेला भाग वरती ठेवावा आणि तळताना पुरीची बाजू पलटू नये. काहीवेळा अनारसे तळताना फसफसतात तेव्हा विशेष काळजी घ्यावी. मध्यम आचेवर सोनेरी रंग येईपर्यत अनारसे तळावेत.