ग्लॅमरवाले येतात राजकारणात…

Mumbai
dokyala shot article
डोक्याला शॉट लेख

काल सनी देवल भाजपमध्ये गेला…तर आज दलेर मेहंदी भाजपमध्ये आला.

…अमोल कोल्हे आधीच आधीच्या शिवसेनेतून राष्ट्रवादीत गेले…आणि शिरूरमधून झंझावाती प्रचाराचा धुरळाही उडवू लागले…

…परेश रावल वगैरे लोक कधीच प्रस्थापितांच्या रांगेत आसनस्थ झाले…आणि तरबेज राजकारणी झाले…

…क्रिकेटपटू गौतम गंभीर अरूण जेटलींच्या वगैरे छायेत येऊन ताजे ताजे राजकारणाच्या क्रिजवर आले…आणि गार्ड घेतो न घेतो तोच भाजपचं तिकिट मिळवून निवडणुकीला उभेही राहिले…

…पण नवज्योत सिध्दू वगैरे लोक त्याच्या आधीच गौतम गंभीरच्या पक्षात गेले…आणि त्यांना फुटाची गोळी देऊन कधीच काँगेसमध्ये येऊन मंत्रीपदावर विराजमानसुध्दा झाले…

…त्याच्या कित्येक योजने आधी प्रतिस्पर्धी संघाच्या धावांना वेसण घालणारे किर्ती आझाद नावाचे खेळाडू भाजपला खो देऊन काँगेसमध्ये आले…आणि राजकारणाला एक मोठा वळसा घालून इतके पारंगत राजकारणी झाले की ते विश्वचषक स्पर्धेत खेळले होते हेसुध्दा लोक विसरले…

…मध्यंतरी अमित शहा आपल्या रोजच्या धकाधकीच्या राजकारणातून वेळ काढून माधुरी दिक्षीत नावाच्या धक धक गर्लला भेटायला गेले…आणि त्याचे फोटोही रितीरिवाजाप्रमाणे छापले गेले…

…काही द्वाड लोकांनी तेव्हा माधुरीही भाजपमधून उभी राहणार अशी लफ्फेदार पुडी सोडली…पण सेना-भाजप युती होणार ह्याची ज्यांना खात्री होती त्यांनी माधुरी भाजपमध्येच काय, राजकारणातच येणार नाही ह्यावर आरामात पैज लावली…

…नजफगडचा विरेंद्र सेहवाग एखाद्या राजकीय घटनेवर ट्विट वगैरे करत बसला…पण राजकारणापासून एक अंतर ठेवून राहिला…

…गोविंदा राजकारणात आला आणि राम नाईकांसारख्यांचा पाडाव करून खासदार झाला…पण नंतर गड्या आपुला गाव बरा म्हणत गावकरी झाला…

…उर्मिला मातोंडकर अचानक राजकारणात अवतरली, काँग्रेसमध्ये आली…आणि तिला रंगिला गर्ल म्हटलं तरी तिने ग्लॅमरचा एकही रंग न दाखवता आपली विचारांची पार्श्वभूमी दाखवली…

…ग्लॅमरमधल्या माणसांचं राजकारणात येताना ग्लॅमर हेच भांडवल राहतं असा एक सर्वदूर समज आहे…चला, त्या समजाला एक धक्का देणारं निदान कुणीतरी निपजलं आहे…

…एरव्ही राजकारणात मर मर मरून काही कायम सतरंज्या उचलत राहतात…आणि ग्लॅमरवाले मागून येऊन राजकारणाचा जाड थराचा मेकअप करतात…

– अँकर