आता अशाही सभा…

Subscribe

काट्याने काढला काटा असं म्हटलं जातं…आता व्हिडिओला दाखवला व्हिडिओ असं का म्हणून म्हटलं जाणार नाही?

…कारण शेवटी राज ठाकरेंच्या व्हिडिओअस्त्राला उत्तर देण्यासाठी प्रचार संपता संपता भाजपनेही व्हिडिओअस्त्र उतरवलं…काही म्हणा, पण शेवटी ह्या निवडणुकीत राज ठाकरेंचं व्हिडिओअस्त्र अजस्त्र ठरलं.

- Advertisement -

…दुसर्‍याला व्हिडिओअस्त्र निर्माण करायला लावणं हीसुध्दा एका अर्थी व्हिडिओसभेची आता निष्पत्तीच मानायला हवी…आता व्हिडिओसभेचीही लाट येणं ह्यातलीही गंमत समजून घ्यायला हवी…

…पुर्वी वर्तमानपत्रं ही समाजाचा आरसा समजली जायची…2019 नंतर ह्या आरशांची जागा व्हिडिओने घेतली आहे!…

- Advertisement -

…आता ह्यापुढे आरशासमोर आरसा धरायची नवी प्रथा येणार आहे…आणि त्याला अफाट गर्दीची, टाळ्याशिट्ट्यांची लोकमान्यता मिळू लागली आहे…

…पण ह्या व्हिडिओ नावाच्या आरशामुळे एक होणार आहे…आपण जे बोलतोय त्याचा व्हिडिओ तर होणार नाही अशी भाषण करताना माइकसमोरच्या नेत्यांच्या मनात भीती दाटणार आहे…

…व्हिडिओ हा गोळा करायचा असतो, नीट निरखून-पारखून वेचायचा असतो…पण तो उद्या व्यासपीठाला इन-बिल्ट असलेल्या सेव्हन्टी एमएम पडद्यावर दाखवताना त्या झणझणीत व्हिडिओबद्दल बोलायला नेताही तसाच दणदणीत असावा लागतो…

…व्हिडिओ झणझणीत असेल आणि त्यावर बोलायला नेता दणदणीत नसेल तर चित्र काय दिसेल?…पंचपात्रात पळी दिसेल किंवा पहाडी आवाजाच्या पोवाड्याच्या कार्यक्रमात खर्जात गाणार्‍या गझलनवाजाचं नुसतीच कुजबुज करणारं गाणं दिसेल…

…लग्नघटिकांना साक्षीदार ठरणारे व्हिडिओज् आता पोलखोल करू लागलेत हा काळाचा महिमा ठरला आहे…की राजकारण्यांवर काळाने उगवलेला सूड आहे, ह्याचा निकाल आता पुढच्या निवडणुकांमध्ये लागणार आहे…

…यथावकाश ह्या निमित्ताने व्हिडिओसंग्राहकांची नवी जमात राजकारणाच्या परीघाबाहेर निर्माण होणार आहे…आणि कुणाची रोजगाराबद्दलची आश्वासनं कितीही खोटी ठरलेली असोत, पण काही लोकांना भिंग लावून व्हिडिओ शोधण्याचा नवा रोजगार उपलब्ध होणार आहे!…

…आजपर्यंत आपण शोकसभा, विजयसभा, चिंतनसभा ऐकून होतो…ह्यापुढे भव्य व्हिडिओसभा असा बॅनर वाचनात आला तर आश्चर्य वाटून घेऊ नये!…

– अँकर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -