औट घटकेचा राजा!

Subscribe

एरव्ही ज्यांच्या काळ्या काचांमधूनही ज्याच्याकडे साधा एक कटाक्ष टाकला जात नाही त्यांच्याकडून निवडणुकीत मतदारराजा म्हटलं जातं…पण ह्या मतदारराजालाही हे माहीत असतं की आपल्याला राजा म्हटलं जात असतं, राजे म्हटलं जात नसतं.

…त्याला हे माहीत असतं की शेतकर्‍याला जिथे बळीराजा म्हणायची पध्दत असते…तिथे मतं मागताना आपल्यालासुध्दा औट घटकेचा राजा म्हणण्याचा एक प्रोटोकॉल किंवा शिष्टाचार काही बारमाही शिष्ट लोकांकडून पाळला जात असतो…

- Advertisement -

…मतदाराला राजा म्हणणं हे वास्तविक साफ चुकीचं आहे…ते ऐन लोकशाहीत राजेशाही मान्य करण्यासारखं आहे…

…पण तरीही ह्या एका दिवसाच्या राजेशाहीबद्दल कुणाची काहीच हरकत नसते…आणि कोट्यवधी रूपयांची संपत्ती आपल्या निवडणूकपत्रात दाखवणार्‍यांनी मतदारराजा म्हटलं म्हणून मतदारराजाच्या नावे काही तितकी मिळकत होत नसते…

- Advertisement -

…अखेर ज्याला कुणाला मतदारराजा म्हटलं जातं त्याच्यात कुठली हो राजेपणाची लक्षणं असतात?…त्याच्यात कसला हो राजेपणाचा आब-रुबाब असतो!…

…तो ’वेडात मराठे वीर दौडले सात’ तसं बसता-उठता ऐकत असतो…पण आठ तासांची चाकरी केल्यावर दौडत जाऊन बस पकडायचं त्राण त्याच्यात दर संध्याकाळी नसतं…

…त्याच्या लग्नसमारंभात त्याला जे मखमली सिंहासन मिळतं तेवढंच…एरव्ही कसलं बोडक्याचं सिंहासन त्याच्या नशिबी असतं?…

…मेवाड हिंदू हॉटेलचा वडापाव खाताना तो ज्या फळकुटावर बसतो त्याच्यासारखं त्याच्या लेखी दुसरं सिंहासन नसतं…आणि ह्या सिंहासनावरुन उलथवायला त्याच्या अवतीभोवती कुणी टपलेलं नसतं…

…तसा तो कुठल्याशा हपिसात कुणाचा तरी गुलाम असतो…पण लोकशाहीत कधीतरी त्याला असा सलाम मिळतो की त्याच्यासाठी तो भर दुपारी मतदानाच्या रांगेत उभा राहतो…

…त्याच्या एका मताने कुणाचा दारूण पराभव, कुणाचा दणदणीत विजय, कुणाचा निसटता विजय होणार असतो…पण त्याच्या वैयक्तिक आयुष्यावर कोणता सुखाचा ओरखडा उठणार, हे त्याला कधीच सांगता येत नसतं…

…पण अखेर हा मतदारराजा आपल्या शंभर टक्के मतदानाचा नजराणा कधीच पेश करत नाही…कारण सब घोडे बारा टक्के हे त्याच्या डोक्यात शंभर टक्के फिट बसलेलं असतं…

– अँकर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -