सूत्रधार विरुध्द धुतले तांदूळ!

Mumbai
Dokyla shot editorial
डोक्याला शॉट संपादकीय

एक इंग्रजी न्यूज चॅनेल रात्रीच्या जेवणाच्या वेळेस लावलं होतं.

…आणि त्यातला कुणीतरी तो कपाळावर झुलपं पांघरलेला चष्मेधारी सूत्रधार बेंबीच्या देठापासून आरडाओरडा करत होता…सूत्रधार म्हणजे हा अँकर, कर नाही त्याला डर कशाला, अशा थाटात त्याला त्या त्या वेळेस जे काही आठवेल ते विचारत होता.

…यू नो, पॉलिटिक्स इज अ लास्ट डेन ऑफ स्काउंड्रल…आय मीन…राजनिती ये बदमाशों का आखरी अड्डा हैं…इंग्रजी चॅनेलवरून त्याने आपल्या त्या ऐतिहासिक उद्गारांचं तिथल्या तिथे हिंदीत भाषांतर केलं आणि त्याच्या शोमध्ये आलेल्या प्रत्येक स्काउंड्रलला आणि बदमाशाला सुनावलं…

…पण त्याच्या त्या इंग्रजी वचनाला त्याच्यासोबत बसलेल्या एकाही बदमाशाने जुमानलं नाही…आणि भाषांतराला तर एकाही स्काउंड्रलने दाद दिली नाही…

पण तरीही तो सूत्रधार आपला बेंबीचा देठ पणाला लावून इंग्रजीत ओरडत होता आणि अधेमधे हिंदीत खेकसत होता…

…लास्ट डेन ऑफ स्काउंड्रल, बदमाशों का आखरी अड्डा असं इंग्रजी-हिंदीत किमान एक डझन वेळा तरी तो कोकलला…

…पण उपस्थित बदमाशांंपैकी एकानेही त्या सूत्रधाराला हिंग लावून विचारलं नाही…तो सारखं लिसन मी, लिसन मी करत होता, पण अखिल भारतीय स्काउंड्रल असोसिएशनमधल्या एकानेही त्याला इंग्रजीतले एटिकेट्स-मॅनर्स दाखवले नाहीत की हिंदीतला दयाभाव दर्शवला नाही.

…एका बदमाशाने तर इतकी वरची पट्टी लावली की सूत्रधाराच्या आवाजाची डेसिबल पातळी साफ झाकोळली गेली…

…सर्वांसमोर आपण नरम पडलो ह्याची सूत्रधाराला जाणीव झाली…आणि आपला टीआरपी कोसळेल हे लक्षात येऊन पुढच्याच क्षणी तो चिडला, चवताळला आणि चेकाळला…नाऊ माय वर्ड विल बी फायनल…जिस को भी बोलना हैं वो मेरे बाद बोलेगा…त्याने पुन्हा इंग्रजीतल्या बेंबीचा हिंदी देठ दाखवला…

…पण एकही स्काउंड्रल त्याच्या ह्या देठाला बधला नाही…

…विषय सालाबादप्रमाणे भ्रष्टाचाराचा होता, पण सगळेच स्काउंड्रल आपणच ह्या आशिया खंडातले एकमेव धुतले तांदूळ आहोत, असं सूत्रधाराला निक्षून सांगत होते…

…सूत्रधार तसतसा पुन्हा पुन्हा चिडत होता, चवताळत होता, चेकाळत होता…

…स्काउंड्रल तसतसे आपण धुतले तांदूळ आहोत, धुतले तांदूळ आहोत, धुतले तांदूळ आहोत, असं सूत्रधाराच्याच स्टाइलमध्ये तीनतीनदा सांगत होते…

…सूत्रधार आणि धुतले तांदूळ ह्यांच्यातला हा खेळ आता फारच रंगात आला होता…

…प्रत्येक ब्रेकनंतर सूत्रधार त्या खेळात आपले रंग भरत होता…आणि धुतले तांदूळ त्याच खेळात आपले रंग दाखवत होते…

…मानवी बोलण्याची क्रिया शांतपणेही होऊ शकते ह्यावर त्यातल्या एकाचाही विश्वास नव्हता…

…दुसर्‍याकडेही सांगण्यासारखं काही असतं हे त्यातल्या एकालाही मान्य नव्हतं…

…बोलण्याला संवाद साधणं म्हणतात हे त्यातल्या एकाच्याही गावी नव्हतं…

…खरंतर ते बोलणं नव्हतंच…ती बोलाचाली होती…कुणाचा तरी फोन आला म्हणून टीव्ही म्युट केला तेव्हा त्यांनी एकमेकांचे वडील तर काढले नसतील ना, एकमेकांचा शाब्दिक सत्कार तर केला नसेल ना, असा संशयही त्यांचे ते तापलेले चेहरे बघून येऊन गेला…

…पण टीव्हीचा आवाज सुरू केला तेव्हा कळलं की सगळ्या धुतल्या तांदळांनी सूत्रधारालाच भ्रष्टाचारी ठरवलं होतं…

…देन व्हाय डिड यू क्विट युवर अर्लियर ऑनेस्ट चॅनेल?…त्या सगळ्या सज्जनांनी सूत्रधाराच्या स्टाइलचं अनुकरण करत, आपल्या इंग्रजी प्रश्नाचं हिंदीत भाषांतर करत सूत्रधाराला विचारलं. आपने आप का पहला अच्छा चॅनेल छोड कर ये क्यूं पकडा?…

…आता तर सूत्रधार पराकोटीचा चिडला, चवताळला आणि चेकाळला…म्हणाला, प्रश्न विचारण्याचं काम माझं आहे, तुमचं नाही…

…पण धुतले तांदूळ तितकंच चवताळत म्हणाले, पण उपप्रश्न विचारण्याचं काम आमचं आहे…

…सूत्रधार म्हणाला, बिहेव युवरसेल्फ…

…धुतले तांदूळही म्हणाले, बिहेव युवरसेल्फ…

…सूत्रधार म्हणाला, आपण सगळे इथे येंऊन ह्या शोमध्ये भाग घेतल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे…थँक यू…

…धुतले तांदूळही म्हणाले, थँक यू…

…टीव्ही बंद केला होता तेव्हा घरातल्या पोराटोरांनी विचारलं, बाबा, आता हे लोक इतके जोरजोरात का बोलत होते?…

…माझं डोकं तापून साफ कामातून गेलं होतं…मी त्यांना म्हटलं, ते अख्ख्या जगाच्या सुखासाठी भांडत होते…आता सुखाने झोपा…

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here