घरमहाराष्ट्रभाविकांची पिकअप गाडी उलटली; पेणमधील 12 जखमी

भाविकांची पिकअप गाडी उलटली; पेणमधील 12 जखमी

Subscribe

काळ आला होता पण वेळ आली नव्हती, याचा प्रत्यय खोपोलीकर आणि श्री एकवीरा देवीचे दर्शन घेऊन परतणार्‍या भाविकांना रविवारी आला. ब्रेक फेल झालेली पिकअप रहदारीच्या ठिकाणी उलटून यात पेणमधील 12 भाविक जखमी झाले आहेत. रोडे काश्मीर (ता. पेण) गावातील भाविक कार्ला गडावरील श्री एकवीरा देवीचे दर्शन घेऊन जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गाने खोपोलीच्या दिशेने येत होते. पिकअप (एमएच 06 बीजी 4678) मध्ये स्त्री, पुरूष आणि लहान मूल असे 18 जण होते. घाट उतरल्यानंतर बस थांब्याजवळ पिकअपचे ब्रेक फेल असल्याचे चालकाच्या लक्षात आल्यानंतर चालक गोंधळला. त्यामुळे अनियंत्रित पिकअप रहदारीच्या ठिकाणी नियंत्रित करणे अवघड असल्यामुळे पोलीस ठाण्यानजीक वळण घेण्याच्या प्रयत्नात पिकअप विरूद्ध बाजूला जाऊन पलटी झाली.

या अपघातात मानसी दिनकर म्हात्रे, सानिया जगदीश म्हात्रे (रा. मुंबई), मनीषा सदाशिव पाटील (52), साक्षी पांडुरंग पाटील, सूरज गणू पाटील, संजना हरिश्चंद्र पाटील, जयेश मधुकर म्हात्रे, प्रशाली मच्छिंद्र जांभळे, अक्षय हरिश्चंद्र पाटील, नम्रता सोमा म्हात्रे, नितीन जांभळे, यश पाटील, अर्णव नितीन जांभळे (7 महिने) व आलिशा नितीन जांभळे (11) हे बारा जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलीस निरीक्षक के. एस. हेगाजे यांच्यासह पोलीस कर्मचारी व इतरांनी मदत केली. उपचारानंतर जखमींना सोडण्यात आले

- Advertisement -

सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता पिकअप चालक खरे सांगत असल्याचे दिसून येत आहे. ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात घडला आहे. – के. एस. हेगाजे, पोलीस निरीक्षक

सुट्टीचा दिवस असल्याने नेहमीची वर्दळ नव्हती, त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. पिकअप उलटली त्या ठिकाणी बससाठी वाट पाहणारे विद्यार्थी, प्रवासी मोठ्या संख्येने असतात. – शेखर जांभळे, सामाजिक कार्यकर्ते, खोपोली

- Advertisement -

घाटात जर ब्रेकफेल झाले असते तर मोठी दुर्घटना घडली असती. एकवीरेच्या कृपेने वाचलो. – मनिषा पाटील, भाविक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -