खोतकरांचा सेनेला घरचा आहेर, म्हणे ‘आरोग्य क्षेत्र बदनाम क्षेत्र’!

शिवसेना-भाजप युती झाल्यामुळे अर्जुन खोतकरांना आता रावसाहेब दानवेंविरोधात निवडणूक लढवता येणार नाही. त्यामुळे ते नाराज झाले असून त्यांनी एका जाहीर भाषणामध्ये शिवसेनेकडेच असणाऱ्या आरोग्य खात्याच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत.

Mumbai
Arjun Khotkar
अर्जुन खोतकर

आगामी लोकसभा निवडणुकीत युती झाल्यामुळे अर्जुन खोतकर यांचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या विरोधात लढण्याचे स्वप्न भंगणार आहे. यामुळे पशुसंर्वधन मंत्री अर्जुन खोतकर यांची आता नाराजी त्यांच्या भाषणातून दिसू लागली आहे. आज तर एका जाहीर कार्यक्रमात अर्जुन खोतकर यांनी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘ग्रामीण भागातले बदनाम क्षेत्र म्हणजे आरोग्य क्षेत्र’ असे म्हणत शिवसेनेच्या मंत्र्यांना घरचा आहेर दिला आहे. विशेष म्हणजे हे क्षेत्र इतकं बदनाम झालं आहे की यात आणखी लक्ष देण्याची गरज असल्याचे देखील त्यांनी एकनाथ शिंदे यांना आवर्जून सांगितले. आरोग्यवर्धिनी केंद्र लोकार्पण कार्यक्रमात खोतकर यांनी आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या समोर ही खंत व्यक्त केल्याने आपल्याच मंत्र्यांच्या खात्यावर खोतकरांनी शंका उपस्थित केली अशी कुजबुज आता राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

नेमकं काय म्हणाले खोतकर?

‘ग्रामीण भागात आपण आरोग्य योजना पोहोचवू शकलेलो नाही. त्यामुळे ग्रामीण भागातलं बदनाम क्षेत्र म्हणजे आरोग्य क्षेत्र असं म्हणता येईल. तसेच आरोग्य क्षेत्रात बरेच घोळ आहेत. त्याचे कारण म्हणजे अजूनही आपण खोलवर जाऊ शकलेलो नाही’, अशी खंत खोतकरांनी यावेळी उपस्थित केली.


हेही वाचा – तर या सरकारला थोबाडही दाखवता येणार नाही – शरद पवार

म्हणून खोतकर नाराज…

आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना ‘आस्मान’ दाखवण्याची भाषा राज्यमंत्री अर्जुन खोतकर केली होती. मात्र युती झाल्याने अर्जुन खोतकर यांचे हे स्वप्न भंगणार आहे. पण ‘युती झाली असली तरी आपण दानवे यांच्या विरोधात मैत्रीपूर्ण निवडणूक लढवणार’ असल्याचे वक्तव्य खोतकर यांनी केले आहे. तसेच ‘मी अजूनही मैदान सोडलेले नाही आणि सोडणारही नाही’, असे सांगत खोतकर यांनी ‘मी उद्धव ठाकरे यांची लवकरच भेट घेईन’, असे सांगितले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here