युतीत २५ जागांची अदलाबदल

मुंबई, ठाणे आणि रायगडमधील 9 जागांचा समावेश

Mumbai
bjp will face shivsena in kdmc of standing committee chair election
केडीएमसीत शिवसेना आणि भाजपमध्ये चुरशीची निवडणूक

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता या आठवड्यात लागणार असल्याने सर्वच राजकीय पक्षांच्या जोर बैठकांना वेग आला आहे.शिवसेना आणि भाजपच्या युतीत 2019 च्या नव्या फॉर्म्युल्यानुसार मागील निवडणुका लढवलेल्या किमान 25 मतदारसंघाची अदलाबदल होण्याची दाट शक्यता आहे. अदलाबदल होणार्‍या 25 जागांमध्ये मुंबई, ठाणे आणि रायगडमधील 9 जागा असून मराठवाडा, कोकण , विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रासह इतर भागातील 16 जागांचा समावेश असल्याचे खात्रीलायकरित्या समजत

युतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरविण्यासाठी भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये आतापर्यंत दोन बैठका झाल्या आहेत. अंतिम चर्चेसाठी शिवसेनेकडून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, सुभाष देसाई तर भाजपकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि गिरीश महाजन उपस्थित असतील. दोन्ही पक्षात काँग्रेस आणि राष्ट्रवादीतून झालेले इनकमिंग आणि 2014 च्या निवडणुकीत उमेदवाराला मिळालेल्या मतांच्या टक्केवारीनुसार जागा बदलण्यात येणार आहेत.

विधानसभा निवडणुकीत युतीमध्ये भाजपला 160 जागा मिळतील, तर शिवसेनेच्या वाट्याला 110 जागा सोडल्या जातील. तसेच महायुतीतील चार मित्रपक्षांना 18 जागा सोडल्या जाण्यावर जवळपास एकमत झाल्याचे भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले. काँग्रेस आणि राष्ट्रवादीतून भाजप-शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू आहे. हे पाहता विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाचे सूत्र बदलणार हे निश्चित आहे. त्यातच भाजपने केलेल्या अंतर्गत सर्व्हेनुसार काही ठिकाणी शिवसेनेची ताकद कमी झाली आहे. या जागा घेण्यासाठी भाजप उत्सूक असल्याने जागा वाटपाचा फार्म्युला ठरवताना युतीतील काही पारंपरिक जागांचीही अदलाबदल होणार आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना स्वतंत्रपणे लढल्याने दोघांच्याही काही ज्येष्ठ नेत्यांचा पराभव झाला होता. त्यामुळे अदलाबदल होणार्या जागांमध्ये मुंबईतील चार, ठाण्यातील तीन तर रायगडमधील दोन जागांचा समावेश असल्याचे कळते.

भाजपमध्ये आतापर्यंत आणि बुधवारीहोऊघातलेल्या प्रवेशाचा विचार करता सुमारे 18 ते 22 आजी माजी आमदारांनीप्रवेश केला आहे, तर शिवसेनेतही आतापर्यंत 12 आजी माजी आमदारांनी प्रवेश केला आहे. त्यामुळे शिवसेनेलाही नव्याने पक्षात आलेल्यांना उमेदवारी द्यायची असल्याने जागांची अदलाबदल करावीच लागेल, असे सांगण्यात येत आहे.

दोन्ही पक्षातील विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्षातील इनकमिंग व्यतिरिक्त विद्यमान आमदारांच्या कामगिरीचा निकषही उमेदवारी देताना लावला जाणार आहे. वडाळा मतदारसंघात 2014 ला भाजपच्या उमेदवाराचाफक्त 700 मतांनी पराभव झालाहोता. युतीत ही जागा शिवसेनोकडे आहे. विद्यमान आमदार कालिदास कोळंबकर यांच्या भाजप प्रवेशामुळे ही जागा शिवसेना सोडून त्या बदल्यात गोरेगावची जागा आपल्याकडे घेऊशकते.

2014 मध्ये गोरेगावमध्ये भाजपच्या विद्या ठाकूर यांनी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांंचा पराभव केला होता. त्यामुळे नायगावच्या बदल्यात शिवसेना गोरेगाव मतदार संघ आपल्याकडे घेईल. औरंगाबादमधील सिल्लोडची जागा भाजपकडे असून विद्यमान आमदार अब्दुल सत्तार यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने यावेळी या जागेवर शिवसेना आग्रही आहे. याप्रमाणे वैभव पिचड यांचा अकोले, संदीप नाईक यांचा ऐरोली, राणा जगजीतसिंह यांचा उस्मानाबाद मतदारसंघात अदलाबदल करण्याशिवाय पर्यायच नसल्याची कबुली एका ज्येष्ठ मंत्र्याने ’आपलं महानगर’ला दिली.

ज्याच्या जागा जास्त त्यांचा मुख्यमंत्री-रामदास आठवले
येत्या विधानसभेत ज्याच्या जागा जास्त त्या पक्षाचा मुख्यमंत्री होणार असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे. भाजपलाच विधानसभा निवडणुकीत जास्त जागा मिळतील . जागावाटपात अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युला यशस्वी होणार नाही. शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपदच मिळू शकते, असेही आठवले यांनी सांगितले.

युतीत शिवसेना पहिल्यांदाच लहान भाऊ
मागील तीन दशकांमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये कायम शिवसेना मोठा भाऊ तर भाजप धाकटा भाऊराहिला आहे. मात्र 2019 मध्ये भाजपला लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या अभूतपूर्व यशामुळे भाजप नेतृत्वाने महाराष्ट्रात युती करताना जास्त तडजोड न करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे अपरिहार्यपणे शिवसेनेला लहान भावाच्या भूमिका स्वीकारावी लागणार आहे.

युतीला 238 जागा मिळण्याचा अंदाज
शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांमध्ये सोमवारी जागावाटपाच्या चर्चेची दुसरी फेरी पार पडली. विधानसभा निवडणुकीची घोषणा गणेशोत्सव संपल्यानंतर कोणत्याही क्षणी होऊ शकते. भाजपकडून नुकत्याच करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात स्वबळावर लढल्यास पक्षाला 160 जागांवर विजय मिळेल, असा अनुमान आहे तर महायुतीला 288 पैकी 238 जागांवर विजय मिळण्याचा अंदाज आहे.

शिवसेनेला 105 ते 110 जागा
भाजपचे सध्या 122 आमदार तर शिवसेनेचे 63 आमदार आणि मित्रपक्षांच्या 18 जागा याची बेरीज केली तर ती होते 203. त्यामुळे उरलेल्या 85 जागांची निम्मी निम्मी वाटणी केली तर शिवसेना आणि भाजपला प्रत्येकी 43 जागा येतात. त्यामुळे भाजप 165, शिवसेना 105 आणि चार मित्रपक्षांना मिळून 18 जागा असा फॉर्म्युला आकारात आहे. मात्र शिवसेनेने 110 पेक्षा कमी जागा स्वीकारायला नकार दिल्याने आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एक पाऊल मागे येत शिवसेनेला 110, भाजपला 160 आणि मित्रपक्षाला 18 जागा सोडतील असा अंदाज आहे.