PMC Bank प्रमाणे सिटी को-ऑप बँकेच्या संचालकांना अटक करा; मातोश्रीबाहेर बॅनर

Mumbai
citi co operative bank scam
मातोश्री, सेनाभवनाच्या बाहेर लागलेले बॅनर

पीएमसी बँक घोटाळ्यात आक्रमक भूमिका घेणाऱ्या शिवसेनेला आता सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेच्या खातेदारांनी कोंडीत पकडले आहे. पीएमसी बँक घोटाळा करणाऱ्या बँकेच्या अध्यक्ष, संचालकांना तुरुंगात टाकल्यानंतर आता सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेच्या अध्यक्ष, संचालकांवर कारवाई करावी, असे बॅनर बँकेच्या खातेदारांनी मातोश्री, सेनाभवन, मंत्रालय, प्रेस क्लब याठिकाणी लावले आहेत. विशेष म्हणजे सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष आणि शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचा फोटो या बॅनरवर लावलेला आहे. त्यामुळे पीएमसी बँकेत कठोर भूमिका घेतलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

१८ एप्रिल २०१८ पासून रिझर्व्ह बँकेने दि सिटी को-ऑप. बँकेवर निर्बंध घातले आहेत. अद्याप ते निर्बंध कायम आहेत. या धक्क्यामुळे आतापर्यंत ११ खातेदारांचा मृत्यू झाला असल्याची माहिती खातेदारांनी दिली आहे. त्यामुळे या मृत खातेदारांना न्याय मिळणार का? असा प्रश्न खातेदारांकडून व्यक्त विचारण्यात येत आहे. तसेच पीएमसी बँकेच्या संचालकांना त्वरित अटक झाली. परंतु दि सिटी बँकेचे अध्यक्ष आणि शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ यांच्यावर कधी कारवाई करणार, असा सवालही खातेदारांनी विचारला आहे.

दि सिटी को-ऑप. बँकेत कर्ज वाटपामध्ये अनियमितता झाल्यामुळे बँक डबघाईला आली होती. त्यामुळे रिझर्व्ह बँकेने हस्तक्षेप करत एप्रिल २०१८ मध्ये ‘३५ अ’ कलमातंर्गत बँकेवर निर्बंध लादले. या निर्बंधानंतर बँकेचे सुमारे ९१ हजार खातेदारांना आपल्या हक्काचे पैसे काढण्यावर मर्यादा आल्या आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here