भिडे गुरूजींची बंगाली जादू ! संततीप्राप्तीसाठी आंबा खाण्याचा सल्ला

नाशिक
SAMBHAJI BHIDE
संभाजी भिडे

भीमा-कोरेगाव दंगल प्रकरणावरून वादाच्या आणि आरोपाच्या भोवऱ्यात सापडलेले श्री शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी आणखीन एका नव्या वादाला तोंड फोडले आहे. आधुनिक विज्ञानाला आव्हान देणारे आणि अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे विधान त्यांनी केले आहे. माझ्या बागेतील आंब्याची फळे खाऊन अनेक निपुत्रिक जोडप्यांना मुले झाली, असा दावा भिडे यांनी रविवारी नाशिक येथील सभेत केला. पुरोगामी महाराष्ट्रात छत्रपती शिवरायांच्या गडकिल्ल्यांविषयी जागृती करत असल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीने असे भंपक विधान केल्यामुळे त्यांच्यावर चारही बाजूने टीका होऊ लागली आहे. त्यामुळे पुढील काळात भिडेंचा हा ‘आम्रदावा’ त्यांना महागात पडेल असेच दिसते.

‘आंबे खा चटाचटा, पोरं होतील पटापटा’ 

लग्न होऊन १५ वर्षे झाली तरी काही जोडप्यांना मुले होत नाहीत. अशा जोडप्यांनी माझ्या शेतातील आंबे खाल्यास त्यांना निश्चित मुले होतील. मी आतापर्यंत १८० हून जास्त जोडप्यांना हे फळ खायला दिले. त्यातील १५० पेक्षा जास्त जणांना मुले झाली आहेत. इतकेच नव्हे तर ज्यांना मुलगा हवा असेल, त्यांना मुलगाच होईल, असा ठाम दावा भिडे यांनी केला आहे. या विधानामुळे बरीच खळबळ उडाली आहे. भिडे आपल्या विधानातून अंधश्रद्धा पसरवत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे.

भीमा कोरेगाव हिंसाचार (प्रातिनिधीक चित्र)

भीमा-कोरेगाव प्रकरणी कारवाईत टाळाटाळ

संभाजी भिडे हे एम. एस्सी गोल्ड मेडलिस्ट आहेत, अशी माहिती आहे. तसेच ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुरू मानले जातात. त्यामुळेच त्यांच्यावर भीमा-कोरेगाव प्रकरणात कारवाईसाठी टाळाटाळ केली जात आहे, असा आरोप सेक्युलर संघटनांकडून केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह त्यांच्या मंत्रिमंडळातील बऱ्याच मंत्र्यांनी तसेच राज्य पातळीवरील काही भाजप नेत्यांनी पुराणांचे दाखले देऊन अनेक वादग्रस्त विधान केली. त्यातून यांनी स्वत:चे हसे करून घेतले.

एकीकडे तंत्रज्ञानाचा विकास होताना आपल्याला दिसतो आणि दुसरीकडे संभाजी भिडेंसारखी माणसे असे वक्तव्य करतात,हे अत्यंत दुर्दैवी आहे. मातृत्व ही अत्यंत खासगी बाब असते. माता होणे याचा प्रत्येक स्त्रीला अभिमान असतो. मलाही तो आहे, मात्र संभाजी भिडेंच्या वक्तव्यामुळे महिला वर्गाचा अपमानच झाला आहे
– सुप्रिया सुळे, खासदार, राष्ट्रवादी काँग्रेस

सीता ही टेस्टट्यूब बेबी होती. महाभारत काळात इंटरनेट होते, त्यामुळे संजय धु्रतराष्ट्राला दूरवर होत असलेल्या युद्धाची माहिती पाहून सांगू शकत होता. भाजपचे खासदार सत्यपाल सिंग यांनी तर डॉर्विनलाच आव्हान दिले होते. अशा सगळ्या पार्श्वभूमीवर हिंदुत्त्ववादी विचारसरणीच्या संभाजी भिडे यांनी आपल्या शेतातील आंबे खाल्याने निपुत्रिकांना मुले होतात, असा दावा केल्यामुळे ही मंडळी हिंदुत्त्वाला कुठल्या दिशेने घेऊन जात आहेत, असा प्रश्न विचारशील लोक उपस्थित करत आहेत.

सभेआधीही वाद

भिडेंच्या सभेसाठी रविवारी नाशकातील अनेक रस्ते बंद करण्यात आले होते. तर भिडे यांचा निषेध करीत रिपब्लिकन पक्षाने रस्ता रोको केला आणि बस पेटविण्याचाही प्रयत्न केला. प्रचंड बंदोबस्त बघितल्यावर भिडे यांनी पोलिसांना चालते व्हा, अन्यथा मी सभा सुरू करणार नाही, अशी तंबीच दिली. त्यानंतर पोलीस सभेच्या ठिकाणाहून काही अंतरावर थांबले.

संभाजी भिडेंनी वक्तव्य केल्याप्रमाणे त्यांच्याकडील आंबे खाल्ल्याने दीडशे लोकांना अपत्य झाले, हा दावा त्यांनी सिद्ध करावा, असे आव्हान महाराष्ट्र अंनिसकडून देण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने याबाबत तातडीने चौकशी करणे आवश्यक आहे. भिडेंनी केलेल्या दाव्यामुळे पुन्हा एकदा वैचारिक दिवाळखोरी व्यक्त करण्याचा अनुभव संत तुकाराम यांच्या महाराष्ट्राला घ्यावा लागत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने भिडे महाराष्ट्रातील तरुणाईची डोकी भडकवतात. भावनिक उन्माद निर्माण करतात. तरुणाईच्या शक्तीला हिंसक वळण देतात. भिडेंसारख्या मंडळींचा समाजाची दिशाभूल करण्याचा कुटिल डाव सूज्ञ लोकांनी ओळखावा
– अविनाश पाटील, राज्य कार्याध्यक्ष, महाराष्ट्र अंनिस

सोशल मीडियावर भिडेंचा मँगो बाईट

संभाजी भिडे यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर सोशल मीडियावर सडकून टीका होत आहे. भिडेंचे वक्तव्य अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे असल्याचे अनेकांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here