४० हजार कोटी वाचवण्यासाठी फडणवीस ८० तासांचे मुख्यमंत्री

भाजप खासदार हेगडेंचा दावा, फडणवीसांचा इन्कार

Mumbai

8 केंद्र सरकारचे ४० हजार कोटी रुपये वाचवण्यासाठी बहुमत नसतानाही देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री बनवण्यात आले, असा दावा कर्नाटकातील भाजप खासदार अनंतकुमार हेगडे यांनी केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा एकदा गरम झाले असून हेगडे यांच्या दाव्यात तथ्य नाही. व्हॉटस्अ‍ॅपवरील मेसेजवर विश्वास ठेऊ नका, असे स्पष्टीकरण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. कर्नाटकमधील एका कार्यक्रमात बोलताना हेगडे म्हणाले की, महाराष्ट्रात आमचा माणूस फक्त 80 तासांसाठी मुख्यमंत्री झाला होता, हे सर्वांनाच माहीत आहे. नंतर त्यांनी राजीनामाही दिला.

हे सगळे नाटक त्यांनी का केले? आपल्याकडे बहुमत नाही हे आम्हाला माहीत होते. तरीही फडणवीस मुख्यमंत्री का झाले, असा प्रश्न सगळे करताहेत. तर त्याचे उत्तर आहे, 40 हजार कोटी रुपये वाचवण्यासाठी. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या हातात त्यावेळी केंद्र सरकारचे 40 हजार कोटी रुपये होते. शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीचे सरकार तिथे आल्यास त्या पैशांचा दुरुपयोग केला जाईल. विकासासाठी ती रक्कम वापरली जाणार नाही, हे त्यांना माहीत होते. त्यासाठीच हे सगळे नाट्य घडवून आणले गेले. हा प्लान खूप आधीच ठरला होता. त्यानुसारच फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि अवघ्या 15 तासांत केंद्राचे 40 हजार कोटी परत केले गेले, असेही हेगडे म्हणाले.

बुलेट ट्रेनसाठी पैसे आलेच नाहीत -फडणवीस
हेगडे यांचा दावा मात्र राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी साफ फेटाळून लावला आहे. हेगडे काय म्हणाले मला माहीत नाही. मला मीडियातूनच ही माहिती मिळाली. मात्र, त्यात काहीही तथ्य नाही. पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मी शेतकर्‍यांच्या मदतीच्या निर्णयाशिवाय कोणताही निर्णय घेतलेला नाही. मुळात बुलेट ट्रेनसाठी केंद्र सरकारकडून कुठलाही निधी मिळालेला नाही. त्यासाठी केंद्र सरकारच्या अखत्यारीत एक कंपनी सुरू करण्यात आली आहे. त्या प्रकल्पासाठी निधी आलाच तर तो थेट संबंधित कंपनीकडे जाणार आहे. महाराष्ट्र सरकारकडे येणार नाही. राज्य सरकारकडे केवळ भूसंपादनाची जबाबदारी आहे. त्यामुळे व्हॉट्स अ‍ॅपवर फॉर्वर्ड होणार्‍या माहितीवर विश्वास ठेवू नये,’ असे आवाहनही त्यांनी केले आहे.

विरोधकांचा फडणवीसांवर हल्लाबोल
भाजप खासदार हेगडेंच्या दावामुळे राज्यातील राजकारण मात्र चांगलेच तापले आहे. महाराष्ट्राचा विकास निधी केंद्राकडे परत केला असेल तर त्याची चौकशी केली जाईल. त्यात तथ्य आढळले तर देवेंद्र फडणवीस यांना त्याचे उत्तर द्यावे लागेल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. तर ही महाराष्ट्राशी बेईमानी आहे. त्यांना विधानसभेची पायरी चढण्याचा अधिकार नाही. याबाबत मुख्यमंत्री खुलासा करतील. त्यात काहीतरी काळंबेरं नक्कीच आहे. सत्य समोर येईल. हे सत्य असेल फडणवीस यांचा निषेध केला जाईल, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here