घरमहाराष्ट्रएका मंत्र्यासह सहा आमदार, 45 कर्मचार्‍यांना कोरोना

एका मंत्र्यासह सहा आमदार, 45 कर्मचार्‍यांना कोरोना

Subscribe

विधिमंडळ अधिवेशनातही संकटाची चाहूल

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेल्या राज्य विधिमंडळाच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनात उपस्थित राहणार्‍या राज्यातील सर्व पक्षांच्या सहा आमदारांना कोरोना झाल्याचे उघड झाले आहे. या आमदारांशिवाय अधिवेशन काळात विधान भवनात कार्यरत असलेल्या 45 कर्मचार्‍यांनाही कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव झाल्याने मोठे संकट टळले आहे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शनिवार आणि रविवार या दोन दिवसात मंत्री, सचिव, आमदार, अधिकारी, पत्रकार आणि कर्मचार्‍यांच्या चाचण्यांची मोहीम उघडण्यात आली होती. कोरोनाच्या या चाचणीत 6 आमदार आणि 45 अधिकारी कर्मचारी कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले.

विधान भवन परिसरात करण्यात आलेल्या कोरोना चाचणीत नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे हे पॉझिटिव्ह निघाले. त्यांनी ट्विट करून ही माहिती दिली. तनपुरे यांच्याबरोबरच अलिबागचे शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांचाही कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान कोरोना चाचणीचा अहवाल न मिळाल्याने अनेक आमदार आणि अधिकार्‍यांना विधान भवनाच्या प्रवेशद्वारावर बराचवेळ ताटकळत राहावे लागले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हस्तक्षेप केल्यावर ते निगेटिव्ह असल्याचे पाहून या आमदार आणि अधिकार्‍यांना विधान भवनात प्रवेश देण्यात आला. अधिवेशनापूर्वी खबरदारी म्हणून मंत्री, अधिकारी, कर्मचारी आणि पत्रकार अशांच्या 2200 कोरोना चाचण्या करण्यात आल्या.

- Advertisement -

शनिवारी करण्यात आलेल्या चाचण्यांचा अहवाल काल म्हणजेच रविवारी आल्याने ज्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे अशांना सोमवारी विधान भवनात प्रवेश देण्यात आला. तर रविवारी ज्यांच्या चाचण्या करण्यात आल्या त्यांचा अहवाल प्राप्त न झाल्याने अशा आमदार आणि अधिकारी-कर्मचार्‍यांना प्रवेशासाठी प्रवेशद्वारावर ताटकळत उभे राहावे लागले होते. हा प्रकार सुरू असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आगमन झाले. आमदारांनी आपली नाराजी पवार यांच्या कानावर घातली. अजित पवार यांनी हस्तक्षेप केल्यानंतर या आमदारांना विधान भवनात प्रवेश देण्यात आला.

प्रेक्षागृहात आमदार
फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासाठी सभागृहातील दोन आसनांच्या बैठकीवर एकाच आमदाराला जागा देण्यात आली आहे. अपुर्‍या आसन व्यवस्थेमुळे प्रेक्षागृहे आणि अभ्यागतांसाठीची आसने आमदारांना देण्यात आली आहेत. तिथे माईक आणि व्हिडिओ कॅमेर्‍यांची व्यवस्था करण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना कोरोनाची लागण झाल्याने उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या पीठासनाखाली कामकाज सुरू करण्यात आले.

- Advertisement -

विधान परिषद उपसभापतीपदासाठी निलम गोर्‍हे आणि गिरकर यांना उमेदवारी 

राज्य विधान परिषदेच्या रिक्त होणार्‍या उपसभापतीपदासाठीच्या उमेदवारी भरण्याच्या अखेरच्या दिवशी विद्यमान उपसभापती, सेना नेत्या निलम गोर्‍हे यांना महाविकास आघाडीकडून पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपच्या वतीने विजय गिरकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

ही निवडणूक मंगळवारी पार पडणार आहे. विधानमंडळ सचिव राजेंद्र भागवत यांच्या कार्यालयात गोर्‍हे यांचाअर्ज सादर करण्यात आला तेव्हा महाआघाडीच्या वतीने तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित होते. तर गिरकर यांचा उमेदवारी अर्ज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर यांच्या उपस्थितीत सादर करण्यात आला.

विधान परिषदेतील संख्याबळ

एकूण – ७८. राष्ट्रवादी – ९, काँग्रेस – ८, शिवसेना – १४, भाजप – २२, लोकभारती – १, पीझंट्स अँड वर्कर्स पार्टी ऑफ इंडिया – १, राष्ट्रीय समाज पक्ष – १, अपक्ष – ४. रिक्त – १८.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -