घरमहाराष्ट्रविकासकांनी थकविले म्हाडाचे १६७ कोटी

विकासकांनी थकविले म्हाडाचे १६७ कोटी

Subscribe

अनेकांना कामे थांबविण्याच्या नोटिसा

मुंबईतील म्हाडाच्या पुनर्विकास योजनांतील सुमारे ४४ विकासकांनी संक्रमण शिबिरातील ३ हजार ३५३ घरे स्वत:च्या ताब्यात ठेवली असून या घरांच्या भाडेपोटी येणारी सुमारे १६७ कोटींची रक्कम थकविल्याची माहिती मंगळवारी उघडकीस आली आहे. या ४४ विकासकांना म्हाडातर्फे नोटिसा पाठविण्यात आली असून लवकरच यांच्याविरोधात आता कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

यातील १२ थकबाकीदार विकासकांविरोधात खेरवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती मंगळवारी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत दिली. मुंबईतील म्हाडाच्या पुनर्विकास योजनांमध्ये असलेल्या खासगी विकासकांनी भाड्यापोटी येणारे १६७ कोटी रुपये थकविल्याप्रश्नी आमदार बालाजी किणेकर, प्रताप सरनाईक, सुनील प्रभू, आशिष शेलार, अजय चौधरी, कॅप्टन सेल्वन यांच्यासह अनेकांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी वरील माहिती दिली.

- Advertisement -

दरम्यान, या ४४ विकासकांपैकी ६ विकासक एसआरए अंतर्गत देखील पुनर्विकास करीत असून त्या विकासकांनाही काम थांबवा नोटीस देण्यात आल्या आहेत. या विकासकांना इतर परवानग्या देण्यात येवू नये, असे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांना म्हाडाकडून कळविण्यात आल्याचे आव्हाड यांनी दिलेल्या उत्तरात स्पष्ट केले आहे. यावेळी जितेंद्र आव्हाड म्हणाले की, या ४४ विकासकांना म्हाडा अधिनियम १९७६चे कलम १८० अंतर्गत कारवाई करण्यासाठी विकासकांच्या बँक खात्याचा तपशील आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडून विकासक यांचे जंगम व स्थावर मालमत्तेचा तपशीलाचा अहवाल मागविण्यात आला आहे.

या अहवालानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे, तर या विकासकांकडील संक्रमण गाळ्यापोटी थकीत भाड्याच्या वसुलीकरिता हायकोर्टात याचिका दाखल करण्यात येणार असून त्यासाठी वकिलांच्या पॅनलकडून अहवाल मागविण्यात आला असून तो आल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

- Advertisement -

नोटिसींनंतर भाडे भरले
विकासकांना काम थांबवा नोटीस दिल्यानंतर १ एप्रिल २०१६ ते ३१ जानेवारी २०२० कालावधी दरम्यान एकूण २७ विकासकांनी एकूण १०३ कोटींच्या थकीत भाडे रकमेचा भरणा केली असल्याचे आव्हाड यांनी दिलेल्या उत्तरात नमूद केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -