घरताज्या घडामोडीशिवसेना हा विचारधारा, मूल्य नसलेला पक्ष - देवेंद्र फडणवीस

शिवसेना हा विचारधारा, मूल्य नसलेला पक्ष – देवेंद्र फडणवीस

Subscribe

काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या शिवसेनेबाबतच्या गौप्यस्फोटानंतर आता नव्या राजकीय चर्चेला तोंड फुटले आहे. २०१४ साली देखील शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसमोर सत्ता स्थापनेचा प्रस्ताव ठेवला होता, असा दावा चव्हाण यांनी केला होता. त्यानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. चव्हाण यांच्या वक्तव्यामुळे शिवसेनेचा खरा चेहरा उघड झाला असून त्या पक्षाला विचारधारा आणि मूल्य यांच्याशी काहीच देणेघेणे नसल्याचे उघड होत आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली आहे.

भाजपचे कार्याध्यक्ष जे.पी. नड्डा यांची आज राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड केली जाणार आहे. यासाठी देवेंद्र फडणवीस दिल्ली येथे आले असताना त्यांनी माध्यमांशी बोलताना शिवसेनेवर टीका केली. “पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने वक्तव्य केल्यामुळे ते गांभीर्याने घेतले गेले पाहीजे. शिवसेनेचा चेहरा यातून उघडा पडला असून शिवसेनेने यावर खुलासा केला पाहीजे, अशी मागणी त्यांनी केली. तसेच चव्हाण यांच्या माहितीमुळे शिवसेनेने विचारधारेला काहीही महत्त्व ठेवले नाही हे दिसून येते, असेही ते म्हणाले.

- Advertisement -

फडणवीस यांनी टीका केल्यानंतर शिवसेनेने मात्र चव्हाण यांच्या दाव्यावर अद्याप खुलासा केला नाही. परिवहन मंत्री अनिल परब यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले की, मी २०१४ साली चर्चेत नव्हतो. त्यामुळे चव्हाणांसोबत काय चर्चा झाली ते मला माहीत नाही, याबाबत चव्हाण यांनींच खुलासा करावा, अशी मागणी त्यांनी केली.

जे.पी. नड्डा यांच्या नियुक्तीबाबत फडणवीस म्हणाले की, अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली भाजपने खूप मोठा विस्तार केला. मोदींजींच्या नेतृत्वाखाली दोनवेळा केंद्रात बहुमताने सरकार आले. आता जे. पी. नड्डा यांच्या हातात पक्षाची कमान येत आहे. कार्यकर्ता ते नेता असा नड्डा यांनी प्रवास केला आहे.

- Advertisement -

राज्यात सध्या साईबाबांच्या जन्मस्थळाचा वाद चांगलाच चिघळला आहे. यावर देखील फडणवीस यांनी भाष्य केले. सरकारच्या वक्तव्यामुळे हा वाद चिघळला आहे. त्यामुळे सरकारनेच मध्यस्थी करायला हवी. तसेच साईबाबा हे देशातल्या अनेक भाविकांचे श्रद्धास्थान आहे. अशाप्रकारचा वाद होणे योग्य नसल्याचे फडणवीस म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -