घरट्रेंडिंगधुळ्यात राडा; आमदार गोटेंच्या गाडीवर दगडफेक

धुळ्यात राडा; आमदार गोटेंच्या गाडीवर दगडफेक

Subscribe

दगडफेकीच्यावेळी आमदार अनिल गोटे गाडीमध्ये नसल्याने मोठा अनर्थ टळला.

धुळे निवडणुकीच्या पूर्वसंध्येला धुळ्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अचानक झालेल्या राड्यामध्ये आमदार अनिल गोटे यांच्या गाडीवर अज्ञात युवकांनी दगडफेक केली. शनिवारी रात्री उशीरा हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाने दगडफेकीच्यावेळी आमदार गोटे गाडीमध्ये नसल्याने त्यांना कोणतीही इजा झाली नाही. आज धुळे शहरात महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. यादरम्यान त्यांनी आपल्या ड्रायव्हरला चहा आणायला सांगितलं. चहा आणण्यासाठी ड्रायव्हर गाडी घेऊन शिवतीर्थ चौकात जाण्यासाठी निघाला असताना, समोरून दोन मोटरसायकलस्वार अचानक गाडीसमोर आले. त्यापैकी मागे बसलेल्या तरुणाने चालकाच्या बाजूच्या सिटच्या दिशेने दगड फेकला. मात्र, त्या सीटवर आमदार गोटे नसल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेनंतर लगेचच गोटे यांचे कार्यकर्ते त्याठिकाणी गोळा झाले. दुसरीकडे आमदार अनिल गोटे यांनाही ही वार्ता समजली. मात्र, प्रकरण चिघळू नये म्हणून गोटे यांनी कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचे आदेश दिले.


वाचा: धुळे, नगर महापालिकांसाठी आज मतदान

भाजप कार्यकर्त्यांनीच केला हल्ला

दरम्यान, या सगळ्या प्रकारानंतर प्रकृती अस्वास्थ्यामुळे अनिल गोटे यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या गोटे रुग्णालयामध्ये उपचार घेत असल्याचं समजतंय. दरम्यान रुग्णालयातूनच प्रसारमाध्यमांशी बोलताना गोटे यांनी स्थानिक भाजप कार्यकर्त्यांवर निशाणा साधला. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील भाजपच्या कार्यकर्त्यांनीच कट रचून, माझ्या गाडीवर दगडफेक केली, असा आरोप गोटे यांनी केला. माझ्या गाडीवर झालेल्या हल्ल्यामागे स्थानिक भाजप नेते आणि कार्यकर्ते यांचाच हात आहे, असा दावा गोटे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतेवेळी केला.

- Advertisement -

दरम्यान, काल रात्री घडलेल्या या दगडफेक प्रकरणाचा धुळे पोलीस तपास करत असल्याची माहिती,  पोलिस अधीक्षक विश्वास पांढरे यांनी दिली आहे. पांढरे यांनी काल घटनास्थळी जाऊन पाहाणी केली आणि त्यानंतर धुळे शहर पोलीस ठाण्यात याविशयी गुन्हा दाखल करण्यात आला. सध्या दगडफेक करणाऱ्या आरोपांनी शोधून त्यांना अटक करण्यासाठी, पोलिसांचं पथक नेमण्यात आल्याचं कळतंय.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -