घरदेश-विदेशडॉ. आंबेडकरांचा पुतळा चीनऐवजी महाराष्ट्रात

डॉ. आंबेडकरांचा पुतळा चीनऐवजी महाराष्ट्रात

Subscribe

राज्य सरकारकडे प्रस्ताव मांडणार - मूर्तीकार अनिल सुतार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचा प्रस्तावित पुतळा आता चीनऐवजी महाराष्ट्रात तयार करण्याच्या दृष्टीने सकारात्मक पावले उचलण्यासाठीची सुरुवात झाली आहे. त्यामुळे ‘मेड इन चायना’ ऐवजी ‘मेक इन इंडिया’ स्वरूपाचाच पुतळा इंदु मिलच्या जागेत साकारणार आहे. ‘मेड इन इंडिया’ पुतळा तयार करण्यासाठीचा तसा प्रस्ताव सध्या तयार करण्यात येत आहे. भारतात पुतळा तयार करण्यासाठीच्या गोष्टींची तयारी या प्रस्तावाच्या माध्यमातून मांडण्यात येणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत इंदु मिल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम हाती घेण्यात आले आहे.

गुजरात येथे सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा हा चीनमध्ये तयार करण्यात आला होता. त्याचवेळी हा पुतळा चीनमध्ये तयार न करता भारतात तयार करावा, अशी मागणी जोर धरू लागली होती. त्यामुळेच आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळाही महाराष्ट्रात तयार करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. सरदार पटेल यांचा पुतळा चीनमध्ये तयार झाला होता, म्हणूनच महाराष्ट्रासह भारतातून पुतळा देशात तयार व्हावा ही मागणी जोर धरू लागली होती. आमची तेव्हाही तयारी होती, आताही तयारी आहे. चीन असो वा भारत दोन्हीकडे तंत्रज्ञान हे सारखेच आहे, असे मत मूर्तीकार अनिल सुतार यांनी व्यक्त केले आहे.

- Advertisement -

मूर्तीकार हा कोणत्याही देशात कास्टिंगचे काम करू शकतो. सरदार पटेल यांचा पुतळा तयार करताना आम्ही अडीच ते तीन वर्षे चीनमध्ये जाऊन काम केले. पुतळा तयार करताना धोतर, शॉलपासून चप्पल बनवण्यातले बारकावे सांगत हा पुतळा तयार केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा भारतात तयार केला तर देशातील तसेच महाराष्ट्रातील लोकांना रोजगार मिळेल. तसेच समुद्री वाहतूकीतून पुतळा बाहेरून आणण्याची गरज भासणार नाही. साधारणपणे ५०० ते ६०० लोकांना रोजगार मिळेल, असे ते म्हणाले.

आता भारतातच आम्ही बंगळूर येथे १५३ फुटांची ब्राँझची शंकराची मूर्ती तयार करत आहोत. तर पुण्यात १०० फुटांची संभाजी महाराजांची मूर्ती तयार करण्यात येत आहे. आपल्याकडे देशात सर्व इन्फ्रास्ट्रक्चर आहे, त्यामुळे आपण भारतात मूर्ती तयार करू शकतो. आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या बाबतीत राज्य सरकारचा निर्णय असेल की पुतळा नेमका कुठे तयार होईल. आतापर्यंतच्या अनेक बैठकांमध्ये पुतळा भारतात बनवू शकता का म्हणून विचारणा झाली. भारतात बनवताना काय तंत्रज्ञान वापरणार याचे एक सादरीकरण तसेच प्रस्ताव हा एमएमआरडीए आणि शापुरजी पालनी यांना देणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

- Advertisement -

चीनमध्ये मोठे पुतणे तयार करतात. त्यांच्याकडे मोठे फाऊंड्रीचे इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध आहे. त्यामुळे मोठे पुतळे तयार होतात. मोठी फाऊंड्री असल्यानेच त्यांच्याकडून पुतळे तयार करून घेण्यासाठी प्राधान्य असते. सरदार पटेल यांच्या पुतळ्याच्या कामात चीनमध्ये फक्त कास्टिंगची प्रोसेस झाली; पण पुतळ्याचे डिटेलिंगचे काम मात्र आमच्याकडूनच झाले. कास्टिंगची प्रोसेस ही मेकॅनिकल आहे; पण त्यामध्ये मुख्यत्वेकरून कलेचा भाग हा महत्त्वाचा आहे. चीनवर अवलंबून राहिलो असतो, तर चांगला पुतळासुद्धा तयार झाला नसता. चीनमध्ये तयार होणारे पुतळे हे चिनी स्टाईलचे असतात; पण आम्ही त्या ठिकाणी थांबून काम केल्याने तो पुतळा हुबेहुब सरदार पटेल यांच्यासारखा झाला. देशाबाहेर पुतळा करायचा म्हणजे वाहतूक खर्च द्यावा लागतो. कस्टम ड्युटी द्यावी लागते. तसेच पैशांच्या स्वरूपात अमेरिकन चलन द्यावे लागते. उलट भारतात पुतळा तयार केला तर भारतीय लोकांना यामधून रोजगार मिळू शकेल. तसेच भारतात पुतळा झाल्यावर आपल्याला स्वाभिमान वाटतो की भारतात झाला.

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -