दोन मिनिटांच्या रोलसाठीही हिरोशी शय्यासोबत करावी लागते -कंगना रानौत

kangana ranaut
कंगना रानौत

बॉलीवूडमध्ये दोन मिनिटांचा रोल मिळवण्यासाठीसुद्धा हिरोसोबत शय्यासोबत करावी लागते, असा खळबळजनक आरोप अभिनेत्री कंगना रानौत हिने केला आहे. बॉलिवूडला बदनाम करण्याचे कारस्थान रचण्यात येत असून, खाल्ल्या ताटाला भोक पाडण्याचे काम काही लोक करत असल्याचा आऱोप जया बच्चन यांनी काल राज्यसभेत केल्यानंतर आता कंगनाने एक सनसनाटी गौप्यस्फोट करत त्यांना प्रत्युत्तर दिले आहे.

जया बच्चन यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना केलेल्या ट्विटमध्ये कंगना म्हणाली की, जया बच्चन आणि त्यांच्या इंडस्ट्रीने मला कुठले ताट दिले आहे. एक ताट मिळाले होते ज्यामध्ये दोन मिनिटांचा आयटम्स नंबर्स आणि एका रोमँटिक सीनचा रोल मिळायचा तोसुद्धा हिरोसोबत शय्यासोबत केल्यानंतर. त्यानंतर मी या इंडस्ट्रीला फेमिनिझम शिकवला. तसेच हे ताट देशभक्ती आणि स्त्रीप्राधान्य असलेल्या भूमिकांना सजवले. जयाजी हे माझे स्वत:चे ताट आहे, असा टोला कंगनाने लगावला.

आपल्या मनाली येथील घरी परतल्यानंतर कंगनाने बॉलिवूडला पुन्हा एकदा टीकेचे लक्ष्य केले आहे. हा शो बिझनेस विषारी आहे अशी टीका तिने केली आहे. आपल्या ट्विटमध्ये कंगना म्हणाली की, शो बिझनेस पूर्णपणे विषारी आहे. प्रकाशाचा झगमगाट आणि कॅमेर्‍याचे हे जग कुणाचेही जीवन चालवण्याचे आणि आभासी वास्तवावर विश्वास ठेवायला देते. या आभासीपणाची जाणीव होण्यासाठी अध्यात्मिकदृष्ठ्या भक्कम असणे आवश्यक आहे. खासदार जया बच्चन यांनी कंगना रानौतला फटकार लगावली होती. बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणानंतर बॉलिवूडवर घराणेशाहीचा आरोप झाला. त्यानंतर अभिनेत्री कंगना रानौत हिने बॉलिवूड माफिया आणि ड्रग्स कनेक्शन हा मुद्दा ऐरणीवर आणला.

अभिनेत्री रिया चक्रवर्तीसह आतापर्यंत १० पेक्षा अधिक जणांना एनसीबीने ड्रग्स प्रकरणात अटक केली आहे. त्यामुळे बॉलिवूड आणि ड्रग्स यांचे कनेक्शन आता उघड होऊ लागले आहे. मात्र, बॉलिवूडला बदनाम करण्याचे षड्यंत्र रचले जात आहे, असा आरोप खासदार जया बच्चन यांनी केला होता. याबाबत राज्यसभेत जया बच्चन म्हणाल्या की, बॉलिवूडला बदनाम करण्याचा डाव रचला जात आहे. मनोरंजन क्षेत्र दिवसाला ५ लाख लोकांना रोजगार देते. देशाची आर्थिक स्थिती बिकट आहे आणि अन्य गोष्टींपासून लक्ष हटवण्यासाठी बॉलिवूडचा वापर केला जात आहे. सोशल मीडियात बॉलिवूडला निशाणा बनवला जात आहे. आम्हाला सरकारकडून समर्थन मिळत नाही. ज्या लोकांना या फिल्म इंडस्ट्रीजने नाव दिले आज तेच बॉलिवूडला गटार संबोधत आहेत, मी याचे समर्थन करणार नाही, असे जया बच्चन यांनी सांगितले.