घरमहाराष्ट्रशेतकर्‍याची गळफास लावून आत्महत्या

शेतकर्‍याची गळफास लावून आत्महत्या

Subscribe

वाढत्या कर्जामुळे उचलले पाऊल

देसाईगंज येथील नैनपूर वॉर्डातील रहिवासी चेतन तलमले (३५) या युवा शेतकर्‍याने सततची नापिकी व कर्जबाजारीपणामुळे रविवारी आत्महत्या केली. तलमले आपली परिवाराची जबाबदारी सांभाळत होता. वडिलोपार्जित जेमतेम अडीच एकर कोरडवाहू शेती असल्याने पावसाच्या पाण्यावरच शेतीचे पीक निर्भर असायचे.

मागील तीन वर्षांपासून पावसाच्या लहरीपणामुळे धानपीक सतत बाधित होत गेले. संबंधित असलेल्या व्यक्तींकडून कर्ज घेऊन शेती व्यवसाय करायचा, पत्नी स्वाती (३०) व मुलगा स्वागत (३) असा परिवार असून, मुलगा स्वागत नेहमी आजारी असायचा. गेल्या ३ वर्षांपासून पीक संकटात आल्याने चेतनचा धीर खचला. गेल्या ४ दिवसांपासून तो चिंताग्रस्त होता.

- Advertisement -

रविवारी सकाळी घरची सर्व कामे आटोपून त्याने बैलांना चारा घातला. पत्नीला व लहान मुलाला शेतावर जाऊन येतो असे सांगितले व तो शेतावर गेला. खचलेल्या चेतनने शेतातीलच मोहाच्या झाडाला दोराने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करणारा चेतन हा गडचिरोलीतील पहिला युवा शेतकरी ठरला. शासनाच्या विविध योजना कार्यान्वित होत असल्यातरी नैसर्गिक पद्धतीने शेतीचा व्यवसाय करणार्‍या शेतकर्‍यांना त्याचा प्रत्यक्ष लाभ होण्यास बराच कालावधी लागतो व पर्याय नसल्याने शेतकर्‍याला जीव गमवावा लागतो. शासनाने शेतकर्‍याच्या आत्महत्या थांबविण्यासाठी प्रत्यक्ष लाभ होईल अशा योजना कार्यान्वित करण्याची आवश्यकता असून, चेतनसारखे अनेक कर्जबाजारी शेतकर्‍यांचे जीव वाचविणे शक्य होईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -