Coronavirus Maharashtra: श्रीवर्धनमध्ये आणखी चौघे करोना पॉझिटिव्ह

Shrivardhan
the number of corona affected in raigad is 32
कोरोना विषाणू

श्रीवर्धन तालुक्यातील भोस्ते गावामध्ये दोन दिवसांपूर्वी सापडलेल्या करोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या चौघांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने प्रचंड खळबळ उडाली असून, दक्षिण रायगडात गेल्या तीन दिवसांत लागोपाठ ६ पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने प्रशासनही हादरून गेले आहे. वरळी येथून आलेल्या ही व्यक्ती करोना पॉझिटिव्ह आढळल्याने त्याच्या संपर्कातील त्याच्या कुटुंबासह श्रीवर्धन शहरातील खासगी दवाखान्याचे डॉक्टर, लॅब टेक्निशयन, दवाखान्यातील कर्मचारी, मेडिकल स्टोअर्सवाले अशा एकूण २७ जणांना संशयित म्हणून पनवेल येथे पाठविण्यात आले होते. त्यांच्या करोना कोव्हिड-१९ चाचणीचे नमुने खारघर येथील खासगी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले.

रविवारी चाचणीचे अहवाल प्राप्त झाले असून, २७ पैकी २३ जणांचे अहवाल निगेटिव्ह, तर ४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये चारही रुग्ण पहिल्या पॉझिटिव्ह रुग्णाचे नातेवाईक असल्याचे समजते. त्यांच्यावर पनवेल येथील उप जिल्हा कोविड रुग्णालयात उपचार सुरू असून, सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.