पोलीस ठाण्यातच मद्यपी महिलांमध्ये फ्री-स्टाईल

दोन महिला पोलिसांना शिवीगाळ, मारहाण

मद्यधुंद अवस्थेत पोलीस ठाण्यात येत दोन महिलांनी आरडाओरड करत भांडणास सुरुवात केली. दोन महिला पोलीस भांडण सोडविण्यासाठी मध्यस्थी झाल्या असता त्यांनाच मद्यपी महिलांनी शिवीगाळ करत मारहाण केली. ही घटना बुधवारी (दि.५) रात्री ११.३० वाजेदरम्यान गंगापूर पोलीस ठाण्यात घडली. याप्रकरणी महिला पोलीस शिपाई मिरा सुरेश मोटे यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी अमिका विलास कोइनकर (दोघीही रा. श्रीराम अपार्टमेंट, श्रीगुरुजी रूग्णालयामागे, गंगापूररोड), सिमा विलास कोइनकर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मद्यधुंद अवस्थेत अमिका कोइनकर ही गंगापूर पोलीस ठाण्यात सिमा कोइनकरविरुद्ध तक्रार देण्यासाठी आली. त्यावेळी दोघींमध्ये भांडण चालू झाले. भांडण सोडविण्यासाठी महिला पोलीस शिपाई मिरा मोटे मध्यस्थी झाल्या असता मद्यधुंद अवस्थेत असलेल्या दोघींनी महिला पोलीस मोटे व रूपवते यांना मोठमोठ्याने आरडओरड व शिवीगाळ केली. त्यानंतर संगनमताने दोघी महिला पोलीस मोटे यांच्याकडे धावून आल्या. सरकारी कामात अडथळा आणत दोघींनी मोटे यांना खाली पाडून मारहाण केली. त्यात त्या जखमी झाल्या आहेत.अमिका कोइनकर हिने महिला पोलीस रूपवते यांना चावा घेत दुखापत केली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक पवार करत आहेत.