मुंबईत पावसाचा हाहा:कार

३८१ झाडे कोसळली, दोघांचा मृत्यू

मुंबई शहर आणि उपनगरात कोसळधार सुरु असतानाच गेल्या दोन दिवसांत मुंबईत तब्बल ३८१ ठिकाणी झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या. यात शहरात २८४, पूर्व उपनगरात ५० आणि पश्चिम उपनगरात ४७ ठिकाणी झाडे कोसळली. तर पावसामुळे विजेचा धक्का लागून दोघांचा मृत्यू झाला आहे. कुर्ला येथील हॉल व्हिलेज लगतच्या ग्लीप परेरा चाळीवर झाड पडले. यात जखमी झालेल्या केन डिसुजा यांना कुपर रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. मुंबई शहरात ४८ ठिकाणी, पूर्व उपनगरात ३ आणि पश्चिम उपनगरात ६ ठिकाणी अशा एकूण ५७ ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या.

दहिसर येथे बुधवारी सकाळी माईल स्टोन सोसायटी परिसरात शॉक लागून एक जण जखमी झाला. कांदिवली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात सदर व्यक्तीला उपचारार्थ दाखल करण्यात आले. मात्र दाखल करण्यापूर्वी रुग्णालयाने त्यास मृत घोषित केले. मृताचे नाव शंभु सोनी (३८) असे आहे. तर मस्जिद बंदर येथे गुरुवारी पहाटे रेल्वे कर्मचारी संजीव (३२) यांना शॉक लागला. त्यांना मुंबई रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले.

१९१६ या मदत क्रमांकावर ३ हजार २०२ दूरध्वनी प्राप्त झाले. ३६१ ठिकाणी झाडे कोसळली. शॉर्टसर्किट घडू नये म्हणून वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. मध्य रेल्वेच्या तीन ते चार लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चिंचपोकळी दरम्यान अडकल्या होत्या. यातील ८० प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. फोर्ट ते कुर्ला या मार्गावर ८३ बेस्ट बसेसची व्यवस्था करण्यात आली होती.

प्रभादेवीत इमारतीचे दोन मजले कोसळले
मागील दोन दिवसांपासून मुंबईत कोसळणार्‍या मुसळधार पावसामुळे प्रभादेवी येथील साई भक्ती मार्गावर असलेल्या ओंकार इमारतीचे दोन मजले कोसळल्याची घटना घडली. गुरुवारी सकाळी 11.30 वाजताच्या सुमारास ही पडझड झाली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

प्रभादेवी भागात जयप्रभा आणि ओंकार या दोन्ही तीन मजली इमारती तळमजल्यासह इमारती एकमेकांना लागून आहेत. या दोन्ही इमारती जुन्या आहेत. गेले 2 दिवस सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे यातील ओंकार इमारतीची पडझड झाली. यात इमारतीच्या दुसर्‍या आणि तिसर्‍या मजल्यावरील भाग कोसळला. यावेळी घरात रहिवाशी राहत होती. इमारत कोसळल्याचे लक्षात येताच रहिवाशांमध्ये गोंधळ झाला. यानंतर या रहिवाशांनी तात्काळ इमारतीच्या खाली धाव घेतली.

कोल्हापूर जिल्ह्याला पुराचा धोका
पंचगंगा नदीने सांयकाळी धोका पातळी ओलांडल्याने आणि राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडल्याने कोल्हापूर जिल्ह्यात पुराचा धोका निर्माण झाला आहे. दरम्यान, संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात एनडीआरफची आणखी दोन पथके दाखल झाली आहेत. सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून १०२ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. ३७ मार्ग बंद झाले असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. आंबेवाडी, चिखली यासह अनेक गावातील लोकांचे स्थलांतर करण्यात येत आहे.

वारणा धरण क्षेत्रात धोक्याचा इशारा
वारणा धरण क्षेत्रात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे धरणातील पाणीसाठा ८५ टक्क्यांवर गेल्याने पाटबंधारे विभागाने गुरुवारी दुपारपासून पाण्याचा विसर्ग सुरू केला. धरणाच्या दरवाजांमधून तीन हजार क्युसेक, तर वीज निर्मिती गृहातून १४०० असा एकूण ४४०० क्युसेक पाण्याचा विसर्ग वारणा नदीत सुरू आहे. विसर्ग सुरू झाल्याने वारणा नदीच्या पाणी पातळीत गतीने वाढ होत आहे. जिल्हा प्रशासनाने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.