नाथाभाऊंच्या बाजूने विरोधकांची घोषणाबाजी; खडसेंचे पवारांसोबत हस्तांदोलन

Mumbai
Eknath Khadse
एकनाथ खडसे

मागील पाच वर्षात सरकारमध्ये असूनही नसल्या सारखे एकनाथ खडसे यांनी अनेकदा अप्रत्यक्षपणे सरकारवर टीका केली आहे. तसेच त्यांनी त्यांच्या मनातील देवेंद्र फडणवीस सरकार विरोधातील खदखद देखील बोलून दाखवली आहे. मात्र आज विरोधकांनी ‘नाथाभाऊंना डावलणाऱ्या सरकारचा धिक्कार असो’ अशी घोषणा देताच समोरून येणाऱ्या नाथाभाऊंनी अजित पवार यांना हस्तांदोलन करत स्मित हास्य दिले.

विरोधी पक्षाचे सदस्य विधानभवनाच्या पायर्‍यांवर आंदोलन करत असतानाच भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांचे आगमन झाले. त्यावेळी नाथाभाऊंना डावलणाया सरकारचा धिक्कार असोअशा घोषणा देण्यात आल्या. त्यावेळी पुढे येवून एकनाथ खडसे यांनी अजितदादा पवार यांना हस्तांदोलन केले. आज पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशीही विधानभवनाच्या पायर्‍यांवर राष्ट्रवादीसह विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

राज्याचा अर्थसंकल्प काल सादर करण्यात आला. परंतु अर्थसंकल्प सादर होतानाच तो अर्थ मंत्र्यांच्या सोशल मिडियावर प्रसिद्ध होत असल्याचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी समोर आणला त्यामुळे या मुद्दयावर राष्ट्रवादी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.आज सकाळी अधिवेशन सुरू व्हायच्या अगोदर विधानभवनाच्या पायर्‍यांवर उतरुन अर्थसंकल्प फुटल्याचा जोरदार निषेध करण्यात आला. याशिवाय राज्यातील गंभीर दुष्काळ आणि सरकार करत असलेले दुर्लक्ष किंवा शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफी मिळावी यासह इतर मुद्दयावरही राष्ट्रवादीसह विरोधी पक्षाच्या सदस्यांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर उतरुन आंदोलन केले.