५६ इंच छातीचा सामना करण्यासाठी ५६ पक्ष एकत्र

सिडकोच्या पवन नगरात उमेदवार हेमंत गोडसेंसाठी प्रचारसभेत आदित्य ठाकरे यांची टीका

Nashik
आदित्य ठाकरेंच्या सभेला उपस्थित जनसमुदाय

मोदींच्या ५६ इंची छातीचा मुकाबला करण्यासाठी ५६ पक्ष एकत्र आले आहेत. त्यांचे हात एकमेकांच्या हातात असले, तरी पाय एकमेकांत अडकले आहेत. ‘गरिबी हटाव’चा नारा देणार्‍यांनी गेल्या ७० वर्षात फक्त स्वतःचीच गरिबी दूर केली. ५६ पक्षांचा नेता कोण हेच त्यांना माहीत नाही, अशी टीका युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केली.

नाशिक लोकसभा मतदार संघातील शिवसेना, भाजप, रिपाइंं, रासपा व शिवसंग्राम महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ सोमवारी (दि.१५) पवननगर येथे जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राज्यमंत्री दादा भुसे, आमदार सीमा हिरे, शिवसेना जिल्हा प्रमुख विजय करंजकर, संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी, महेश बडवे, अजय बोरस्ते, भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी, सर्व नगरसेवक, महिला पदाधिकारी उपस्थित होते.

आदित्य ठाकरे म्हणाले, नाशिकपासून दिल्लीपर्यंत युतीचेच शासन असल्याने विरोधकांना काम करण्यास संधी राहिलेली नाही. त्यामुळे आगामी निवडणुकीत राज्यात सर्वत्र भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही. यांच्या हातात सत्ता दिली, तर देशाचे तुकडे झाल्याशिवाय राहणार नाहीत. आतंकवाद्यांना जी म्हणताना स्वातंत्र्यवीर सावरकरांना देशद्रोही म्हणणार्‍यांच्या हातात सत्ता देणार का, असा प्रश्न उपस्थित करून ठाकरे यांनी हेमंत गोडसे यांनाच मतदान करून नाशिकचा इतिहास बदलण्याचे आवाहन केले. राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी चौफेर फटकेबाजी करताना ही निवडणूक गटर-वॉटर-मीटरची नसून देशाचे भवितव्य ठरवणारी असल्याचे सांगितले. देशाचे भविष्य सुरक्षित हाती सोपवण्यासाठी नाशिककरांसह परिसरातील खान्देशी मतदारांना युतीच्या मागे ठामपणे उभे राहण्याचे आवाहन केले. यावेळी महायुतीचे नेते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते, महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here