सप्तश्रृंगी गडावर नवीन प्रदक्षिणा मार्गाचे मोजमाप

वन विभाग अधिकारी, ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांकडून जागा पाहणी

Nashik

सप्तश्रृंगीगडावरून दगड कोसळून भाविक ठार झाल्याच्या दुर्घटनेनंतर देवीमंदिरापासून प्रारंभ होणारा आणि परशुराम बाला मंदिराचे दर्शन घेऊन पुन्हा देवीच्या मंदिराकडे येणारा प्रदक्षिणा मार्ग जिल्हा प्रशासनाने बंद केला होता. मात्र, भाविकांची मागणी लक्षात घेता गावातून ताबुलतीर्थमार्गे परशुराम बाला मंदिराकडे जाणारा नवीन प्रदक्षिणा मार्गसप्तश्रृंगीगड ग्रामपंचायतीसह शासनाच्या सचिवस्तर उच्चाधिकार समितीने मान्य केला. या मार्गाच्या कामाला आता मुहूर्त लागला असून, वन विभाग अधिकारी तसेच ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांनी रविवारी (दि.25) नव्या जागेची पाहणी करून मोजमाप केले.

गडावर देवीचे दर्शन घेऊन प्रदक्षिणा करणार्‍या भाविकांची संख्या मोठी आहे. नवसपूर्ती म्हणूनही गडाला प्रदक्षिणेची परंपरा आहे. मात्र, दोन-तीन वर्षापूर्वी प्रदक्षिणा मार्गावर गडाचे दगड कोसळून भाविक जखमी झाले होते. काहींचा जीवही गेल्याचे बोलले जाते. त्यामुळे गडावर जाळ्या बसवण्याचे आणि प्रदक्षिणा मार्गावर भाविकांच्या सुरक्षिततेसाठी योग्य त्या उपाययोजना करण्याचे काम प्रलंबित आहे. दोन-तीन वर्षांपासून प्रदक्षिणा मार्गच बंद असल्याने सप्तश्रृंगी निवासनी देवी ट्रस्टनेही जिल्हा प्रशासनाला भाविकांच्या आस्थेचा मुद्दा लक्षात आणून देत मार्ग सुरू करण्यासाठी पत्र दिले होते. पण, त्यावर अद्यापही तोडगा निघालेला नाही.

भाविकांची ही गैरसोय ओळखून आणि सुरक्षित प्रदक्षिणा मार्गाचा पर्याय लक्षात घेऊन सप्तश्रृंगीगड ग्रामपंचायतीने ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्याकडे ताबुलतीर्थ ते परशुराम बाला मंदिर हा प्रदक्षिणा मार्ग गावातून आणि देवीमंदिराच्या पायथ्यापासून जाणार्‍या मार्गाचा पर्याय सूचविला होता. यासाठी ग्रामपंचायतीने वनविभागाच्या अधिकार्‍यांशी चर्चा केलेली होती. गडावर विकासासाठी शासनाने तीर्थक्षेत्राला ‘ब’ वर्ग दर्जा दिला. त्यात गडविकासाची कामे करताना ग्रामपंचायतीने सुचवलेला नवीन प्रदक्षिणा मार्ग मान्य करण्यात आला. मात्र, हे काम करताना वन विभागाच्या पर्यावरणवादी सर्व निकषांचे पालन करण्यात यावे, अशी अट घालून नव्या मार्गासाठी 2 कोटी 88 लाख रुपयांचीही आर्थिक तरतुदही केलेली आहे. नवीन प्रदक्षिणा मार्ग करताना तो सिमेंट काँक्रिटचा नव्हे तर दगड, गोटेे, गवत, आणि मातीचा भराव घालून करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. या मार्गाने जाताना गडावरचे नैसर्गिक सौंदर्यही भाविकांच्या नजरेस पडणार आहेत.

सचिवस्तर उच्चाधिकार समितीने आराखड्याला मंजुरी दिल्यानंतर एक महिन्यात नवीन प्रदक्षिणा मार्गाच्या कामाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यानुसार गडावर आज पॉलीगोन, वन विभाग अधिकार्‍यांनी नवीन जागेची पाहणी केली. त्यासाठी वन विभागाच्या अधिकार्‍यांनीही सकारात्मक भूमिका घेतली असून, ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांनी जागा हस्तांतरण प्रक्रियेचेही सोपस्कार पार पाडले.

गावातील आर्थिक उलाढालीला चालना मिळणार

गडाच्या संपूर्ण डोंगराला सुती धाग्याने बांधण्याचा नवस भाविक करीत असतात. गडावरून जाणारा मार्ग बंद असल्याने भाविकांची नवसपूर्तीसाठी गैरसोय होत होती. ग्रामपंचायतीने पर्यायी मार्ग सूचवताना ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांना गावातून शिवालय तीर्थ, ताबुल तीर्थ ते परशुराम बाला मंदिर हा रस्ता सूचवला होता. तसेच भाविक गावातून या मार्गाकडे रवाना होणार असल्याने गावातील आर्थिक उलाढालीला चालना मिळणार आहे, असे पटवून दिले होते. हा रस्ता मंजूर झाल्यावर आज प्रत्यक्ष वन विभागाच्या अधिकार्‍यांच्या उपस्थितीत जागेची पाहणी आणि रस्त्याचे मोजमाप केले. या जागेच्या हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रदक्षिणामार्ग भाविकांसाठी खुला होईल. – राजेश गवळी, उपसरपंच, सप्तश्रृंगीगड ग्रामपंचायत, कळवण