घरमहाराष्ट्रनाशिककपाट अंगावर पडून विद्यार्थ्याचा मृत्यू

कपाट अंगावर पडून विद्यार्थ्याचा मृत्यू

Subscribe

मराठा हायस्कुल मधील घटना

येथील मराठा हायस्कूलमध्ये मंगळवारी (दि.३०) वर्गातील लोखंडी कपाट अंगावर पडून सातवीच्या वर्गातील विद्यार्थी जयेश सखाराम अवतार (१२, रा.क्रांतीनगर, पंचवटी) याचा मृत्यू झाला.

मराठा हायस्कूलमध्ये दुपारी सव्वातीनच्या मधल्या सुटीत विद्यार्थी खेळत असताना सातवी ‘ब’ च्या वर्गात अचानक लोखंडी कपाट पडल्याने मोठा आवाज झाला. विद्यार्थ्यांसह शिक्षक आवाजाच्या दिशेने घटनास्थळी आले असता कपाटाखाली एक विद्यार्थी दबल्याचे दिसले. सर्वांनी तत्काळ कपाट बाजूला करत जखमी विद्यार्थ्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. धूम यांनी घोषित केले.

- Advertisement -

                                        

पोलिसांच्या माहितीनुसार मराठा हायस्कूलमध्ये मंगळवारी (ता.३०) दुपारी सव्यातीनच्या सुमारास जेवणाच्या सुटीत विद्यार्थी वर्गात खेळत असताना सातवी ब’च्या वर्गात लोखंडी कपाट खाली पडल्याने मोठा आवाज झाला. त्याखाली जयेश अवतार हा विद्यार्थी सापडला. आवाजाच्या दिशेने विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी धाव घेतली. सर्वांनी कपाट उभे केले असता जयेश कपाटाखाली सापडून गंभीर जखमी झाल्याचे निदर्शनास आले. त्याला शिक्षक बाळासाहेब रंगनाथ रायते व दत्तात्रय नामदेव पवार यांनी जिल्हा शासकीय रुग्णालय दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. धूम यांनी मृत घोषित केले. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. जयेशचा मृत्यू झाल्याने दुपारनंतर शाळेत तासिका न होता सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास शाळा सुटली. जयेशच्या मृत्यूची बातमी समजताच कुटुंबियांसह नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात गर्दी केली. जयेशला क्रिकेटची आवड होती. तो अभ्यासात हुशार होता. त्याला सैन्यदलात जायचे होते. त्यांच्या मृत्यूस शाळा जबाबदार असून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, असे जयेशचा मोठा भाऊ गिरीश अवतार याने सांगितले.

- Advertisement -

दुर्दैवी घटना

कपाट अंगावर पडल्याने जयेश अवतार याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. पाऊस सुरू असल्याने मधल्या सुटीत सर्व विद्यार्थी वर्गात खेळत होते. वर्गातील कपाटात चित्रकलेचे साहित्य होते. कपाटाजवळ पाय अडकल्याने जयेशच्या अंगावर कपाट पडल्याचे प्रत्यक्षदर्शी मुलांनी सांगितले आहे. – अरुण पवार, मुख्याध्यापक, मराठा हायस्कूल, नाशिक.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -