मुंडे भावा-बहिणीत जुगलबंदी

Mumbai
pankaja-munde-dhananjay
पुन्हा एकदा धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे आमनेसामने

बीड, बीडमधील एका कार्यक्रमात ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे एकाच व्यासपीठावर आले होते. यावेळी पंकजा मुंडेंनी वक्तशीरपणावरुन बंधू धनंजय यांना टोला लगावला, तर धनंजय मुंडेंनीही बहिणीला प्रत्युत्तर देण्याची संधी दवडली नाही.त्यामुळे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी असलेल्या या दोघांमध्ये यावेळी चांगलीच जुगलबंदी रंगली. परळीत गुरुवर्य आबासाहेब वाघमारे यांचा अमृतमहोत्सवी कार्यक्रम रविवारी पार पडला. यावेळी लोकनेते गोपीनाथ मुंडे नटराज रंग मंदिरात व्यासपीठावर पंकजा आणि धनंजय मुंडे एकत्र आले होते.

झाले असे की, या कार्यक्रमाला धनंजय मुंडे उशिरा आल्याचे हेरत ‘मी वेळेवर येणारी विद्यार्थिनी आहे’ अशा शब्दांत पंकजा मुंडेंनी त्यांना टोला लगावला. ‘मी वेळेत आले, मात्र कार्यक्रम उशिरा सुरू झाला. दुसर्‍या कार्यक्रमाला जाणे गरजेचे आहे, त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करते’ असे म्हणत कार्यक्रम संपण्याच्या आधीच पंकजा मुंडे निघून गेल्या.

पंकजा वेळेपूर्वी निघाल्यामुळे धनंजय मुंडेंनीही टोला लगावला. ‘चांगले विद्यार्थी लवकर येतात आणि वेळेआधीच जातात, हे मला पहिल्यांदाच समजले. शेवटी, मार्कशीटवर कोण विद्यार्थी चांगला, कोण वाईट हे ठरते. मात्र वेळेला आम्ही कायम सोबत असतो, हे निश्चित’ असे उत्तर धनंजय मुंडेंनी दिले. विरोधी पक्ष आधी बोलत असतो आणि त्याचे उत्तर सत्ताधारी देत असतो. मात्र इथे उलट झाले आहे. कदाचित भविष्याची त्यांना चाहूल लागली असावी, असेही पुढे धनंजय मुंडे म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here