Pune Heavy Rains: पुरात ४ जण वाहून गेले, तिघांचे मृतदेह सापडले

पुण्यात रात्रीपासून पडत असलेल्या मुसळधार पावसाने कहर केला आहे. पुण्यात जिकडेतिकडे पाणी साचलं आहे. सर्वांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. दरम्यान, मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरात चार तरुण वाहून गेले आहेत. पुण्यातील दौंड तालुक्यातील राजेगावच्या ओढ्याला आलेल्या पुरात चार तरुण वाहून गेल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये तिघांचे मृतदेह सापडले असून एकाचा मृतदेह शोधण्याचं काम सुरू आहे. दोन दुचाकीवरुन जात असताना हे तरुण वाहुन गेले.

मिळालेल्या माहितीनुसार दोन दुचाकीवरुन हे चार तरुण ओढा पार करत होते. यावेळी पाम्याच्या प्रभावासमोर त्यांचा निभाव टीकू शकला नाही. भिगवण येथून दौंडकडे जात असताना राजेगावच्या चोपडे वस्तीजवळील ओढ्यात ते वाहून गेले आहेत. पाण्याची पातळी आणि वेग इतका मोठा होता की चौघांचाही वाहून मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बचावकार्य सुरू करण्यात आलं. यावेळी तिघांचे मृतदेह मिळाले असून त्यांची ओळख पटवण्याचं काम सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, पुण्यात रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. जागोजागी घरात पाणी शिरलं आहे तर रस्त्यांना नद्यांचं स्वरुप आलं आहे. काही ठिकाणी तर भल्या मोठ्या गाड्याही पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याचं पाहायला मिळालं. मध्यरात्रीपर्यंत पावसाचा जोर कायम होता. दरम्यान, वसाहतींमध्ये शिरलेले पाणी काढण्याबरोबरच नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याबाबत अग्निशामक दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून रात्री उशिरापर्यंत काम सुरू होतं.


हेही वाचा – पुण्यात पावसाचा कहर; काळजात धडकी भरवणारा व्हिडीओ व्हायरल