निवडणुकांसाठी आमचे जवान वापरून घेणार का? – राज ठाकरे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सोमवारी संध्याकाळी सोलापूरमध्ये जाहीर सभा झाली. यावेळी त्यांनी भाजप सरकार आणि मोदींच्या योजना आणि घोषणा फसव्या असल्याची जोरदार टीका केली आहे.

Solapur
Raj Thackeray at Solapur Rally
मनसे अध्यक्ष राज ठाकरे सोलापूर रॅलीमध्ये...

पुलवामामध्ये आमचे जवान हकनाक मारले गेले. आई-वडिलांनी यासाठीच जवानांना सैन्यात पाठवले का? हेच मोदी आधी विचारायचे आरडीएक्स कुठून आलं हे सरकारनं सांगावं. मग आता पुलवामामध्ये आरडीएक्स कुठून आलं हे मोदींनी सांगावं. निवडणुकांसाठीच आमच्या जवानांना वापरणार का? अशा शब्दांत मनसे प्रमुख राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारवर सडकून टीका केली. सोलापूरमध्ये सोमवारी संध्याकाळी राज ठाकरेंची जाहीर सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवरून भाजप सरकार आणि मोदी-शहांवर टीका केली.

राज्यातल्या कोणत्याही उद्योगात महाराष्ट्रातल्या तरुणांना रोजगार मिळाला, तर महाराष्ट्राला आरक्षणाची गरजच नाही. इथे जागा भरल्या जातात, ते राज्यातल्या तरुणांना माहीतच नसतं. आम्ही फक्त जातीपातींमध्ये भांडत असतो. आरक्षण सरकारी उद्योगातच आहे, खासगीमध्ये नाही. सध्या देशभरात ४ ते ५ टक्के सरकारी नोकऱ्या आहेत. म्हणजे हे आरक्षणाचं फक्त आमिष आहे.

‘माझ्या सभांच्या खर्चाऐवजी, तुमच्या थापा मोजा’

राज ठाकरेंच्या सभांचा खर्च कसा मोजायचा यापेक्षा ५ वर्षांत किती थापा मारल्या हे जरी मोजलं तरी खूप झालं. हे तंत्र आहे. एकामागोमाग नव्या गोष्टी तुमच्या समोर आणायच्या म्हणजे तुम्ही आधीच्या गोष्टी विसरता. मग सत्ताधाऱ्यांनी आधी काय सांगितलं, हे तुमच्या लक्षात देखील राहात नाही. मागचं सगळं विसरून जातो आपण. सत्ताधाऱ्यांना हेच हवंय. महाराष्ट्रात २८ हजार गावं दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर होतात आणि मुख्यमंत्री म्हणतात १ लाख २० हजार विहिरी राज्यात बांधल्या. याकडे दुर्लक्ष होण्यासाठी तुमच्यात जातीवरून भांडणं लावली जातात.

‘राजांचं स्मारक समुद्रात नाही, गडकिल्ल्यांमध्ये’

बाबासाहेबांच्या स्मारकाची कल्पना मी दिली होती. पण हे गेल्या ५ वर्षांपासून स्मारकाची फक्त आश्वासनं देत आहेत. मी म्हटलं होतं जगातली सर्वात मोठी लायब्ररी उभी करा. पुतळे उभं करणं म्हणजे स्मारक नाही. छत्रपतींचं स्मारक समुद्रात उभं करणार आहेत. येडा बनवायला काही लिमिट आहे की नाही? महाराजांचे गडकिल्ले म्हणजे महाराजांचं खरं स्मारक आहेत. ते आधी नीट करा. ते नीट राहिले, तर आमच्या पुढच्या पिढ्यांना महाराजांबद्दल सांगता येईल.

‘तुमचं लक्ष फिरवण्यासाठीच दंगली’

देशात जातींमध्ये भांडणं लावून फूट पाडायची. याच सरकारने वर्षाला २ कोटी लोकांना रोजगार द्यायचं कबूल केलं होतं. म्हणजे ५ वर्षांत १० कोटी रोजगार आणि ४० कोटी लोकांचा प्रश्न सुटला असता. पण ते झालंच नाही. उलट नोटाबंदीमुळे देशातल्या ४-५ कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या हा अधिकृत आकडा आहे. हे असे प्रश्न तुम्ही विचारू नयेत म्हणून दंगली, जातीपातींमध्ये भांडणं लावायची आणि त्यातून हे यांची ५ वर्ष काढून घेतात. मोदींनी गेल्या ५ वर्षांत योजनांच्या जाहिरातींवर केलेला खर्च ४ हजार ८८० कोटी रुपये आहे. स्वच्छ भारत, स्टॅण्ड अप इंडिया, मेक इन इंडिया यात कुणाला कामं मिळाली? मेक इन इंडियात नोकरी मिळवण्यासाठी तरुणांना पैसे द्यावे लागत आहेत.

‘हरिसाल’च्या जाहिरातीतला मॉडेल राज ठाकरेंच्या मंचावर!

यावेळी राज ठाकरेंनी हरिसाल या पहिल्या डिजिटल व्हिलेजबद्दल त्यांनी केलेल्या आरोपांनंतर मुख्यमंत्र्यांनी केलेल्या खुलाशाचा एका वृत्तवाहिनीने केलेला पर्दाफाश देखील उपस्थितांना व्हिडिओच्या माध्यमातून दाखवला. या व्हिडिओमध्ये देखील हरिसार गावाची परिस्थिती सुधारली नसल्याचंच समोर दिसत होतं. दरम्यान, यावेळी राज ठाकरेंनी भाजपच्या जाहिरातीतल्या मॉडेललाच मंचावर बोलावल्यानंतर उपस्थितांनी एकच गलका केला. ‘हा तरूण रोजगारासाठी मुंबईत आला असून त्याला भाजपवाले फोन करून परत बोलावतायत’, असा दावा देखील यावेळी राज ठाकरेंनी केला.

‘असा पंतप्रधान कधी पाहिला नाही!’

देशातल्या शहीदांच्या नावाने पंतप्रधान मतं मागतायत. पण त्यांच्या घरातल्यांची भेट घ्यायला तुम्हाला वेळ नाही. असा निर्लज्ज पंतप्रधान आजपर्यंत मी बघितला नाही. त्यामुळे मी जे म्हणालो होतो की निवडणुकांआधी युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण केली जाईल, हा त्याचाच पुरावा आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here