घरमहाराष्ट्रटाटा कॅन्सर हॉस्पिटलच्या आगीत २.५ कोटींचं नुकसान; कारण अद्याप कळेना!

टाटा कॅन्सर हॉस्पिटलच्या आगीत २.५ कोटींचं नुकसान; कारण अद्याप कळेना!

Subscribe

खारघर येथील टाटा कॅन्सर हॉस्पिटलमधील कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूट अर्थात कर्करोग संशोधन केंद्रात लागलेल्या भीषण
आगीत सुमारे अडीच कोटी रुपयांची अत्याधुनिक यंत्र सामुग्री जळून खाक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. २७ मार्च रोजी ही आगीची घटना घडली. मात्र, देशातल्या इतक्या महत्त्वाच्या संशोधन संस्थेमध्ये घडलेल्या इतक्या गंभीर घटनेनंतर अजूनपर्यंत त्याच्या मागच्या कारणांचा माग घेण्यात आलेला नाही. त्यामुळे या घटनेभोवती संशयाचं जाळं निर्माण व्हायला सुरुवात झाली आहे. कॅन्सर सारख्या जीवघेण्या रोगावर इथे उपचार आणि संशोधन केले जाते. मात्र, इथल्या टाटा हॉस्पिटल परिसरात अचानक कोणती दुर्घटना घडल्यास हॉस्पिटलची स्वतःची आपत्कालीन यंत्रणा कार्यान्वित नाही. त्यामुळे टाटा हॉस्पिटल प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे सदर आग लागल्याचे बोलले जात आहे. टाटा कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूटच्या उपसंचालिका डॉ. प्रसन्ना व्यंकटरामण यांची ही लॅब होती.

हॉस्पिटलमध्ये आपात्कालीन यंत्रणा का नाही?

दरम्यान, आग कशी लागली? नुकसान किती झाले? याबाबत संशोधन सुरु असल्याचे खारघर टाटा कॅन्सर हॉस्पिटलचे संचालक डॉ. सुदीप गुप्ता यांनी सांगितले. खारघर येथील टाटा हॉस्पिटल हे कॅन्सरसारख्या भयानक रोगावर उपचार आणि संशोधन करणारे देशातील महत्वपूर्ण हॉस्पिटल आहे. हॉस्पिटलमध्ये आजघडीला सुमारे २०० रुग्ण उपचारासाठी अॅडमिट आहेत. दररोज सुमारे ४०० ते ५०० रुग्णांची ओपीडी चालते. सुमारे ६०० कर्मचारी कार्यरत आहेत. त्यामुळे हॉस्पिटलची सुरक्षा आणि आपत्कालीन यंत्रणा नेहमी सज्ज आणि तत्पर असणे अपेक्षित आहे. मात्र , हॉस्पिटल प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे येथील आपत्कालीन यंत्रणाच बंद पडल्याचे हॉस्पिटलमधील सूत्रांनी सांगितले.

- Advertisement -

आगीला जबाबदार कोण?

चार दिवसांपूर्वी लागलेल्या भीषण आगीला प्रशासनाचा हाच हलगर्जीपणा जबाबदार असल्याचे बोलले जात आहे. अत्यंत
महत्वाच्या विभागाला आग लागलीच कशी? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. चार दिवसांपूर्वी आग लागल्यानंतर त्वरीत बाहेरील अग्निशमन दलाला पाचारण केले गेले नाही. प्रथमतः हॉस्पिटल कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात घालून आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, आगीने भीषण रूप धारण केल्यानंतर खारघर येथिल अग्निशन दलाला पाचारण करण्यात आले. तोपर्यंत आगीत सुमारे अडीच कोटी रुपयांची यंत्र सामुग्री जळून खाक झाली होती. कर्करोग संशोधन केंद्रात अत्यंत ज्वलनशील केमिकल वापरले जाते. मात्र, खारघर अग्निशमन दलाने कार्यतत्परता दाखवल्यामुळे मोठी मनुष्यहानी होण्याचा धोका टळला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -