घरमहाराष्ट्रऑक्टोबरमध्ये रेस्टॉरंट आणि बारचे दरवाजे उघडणार

ऑक्टोबरमध्ये रेस्टॉरंट आणि बारचे दरवाजे उघडणार

Subscribe

रेस्टॉरंट व्यवसायिकांच्या संघटना प्रतिनिधीशी संवाद

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सामवारी रेस्टॉरंट व्यावसायिकांच्या संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. यावेळी लॉकडाऊनमुळे बंद असलेल्या रेस्टॉरंट पुन्हा सुरु करण्याबाबत महत्वपूर्ण चर्चा करण्यात आली. यावेळी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून रेस्टॉरंट  नव्या नियमावलीनुसार सुरु करण्याची परवानगी देण्यात आली. यावेळी १७ ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या नवरात्रीच्या तोंडावर राज्य शासनाने तब्बल ४ लाख रेस्टॉरंट सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर पार्सल सेवा सुरु करण्यात आली. यामध्ये फक्त ४० टक्के कामगारांना रोजगार मिळाला होता. मात्र मोठ्या संख्येने कामगार गावी निघून गेले होते. दरम्यान, आता राज्य शासनाने रेस्टॉरंट सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाने थेट तब्बल ६० लाख हॉटेल कर्मचारी आणि हॉटेल व्यावसायाशी संबंधीत असलेल्यांना आणि १.८ कोटी कामगारांना अप्रत्यक्षपणे रोजगार मिळणार आहेत. दरम्यान, राज्य शासनाने रेस्टॉरंट सुरु करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे तयार केली असून ती सर्व संबंधितांना पाठवण्यात आली आहेत. ती अंतिम झाल्यानंतर रेस्टॉरंट सुरु करण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील औरंगाबाद, पुणे, मुंबई आणि नागपूर येथील रेस्टॉरंट व्यवसायिक संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. यावेळी त्यांनी ही माहिती दिली.

- Advertisement -

कोरोनाचे संकट मोठे असून या संकटकाळात हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यवसायिक शासनासोबत आहेत. या गोष्टीचं समाधान वाटत असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. ते पुढे म्हणाले की, आजही कोविडवर लस किंवा औषध उपलब्ध नाही त्यामुळे कोरोनासोबत जगताना अत्यंत काळजीपूर्वक पुढची पावलं टाकावी लागत आहेत. रुग्णांमध्ये पोस्ट कोविड लक्षणं दिसून येत आहेत. आर्थिक बाबींसाठी जबाबदारीने आपण काही पाऊले टाकायला सुरुवात केली आहे. आतापर्यंत अनेक व्यवहार बंद होते ते आपण एकेक सुरु करत आहोत. व्यवहार बंद ठेवणे हा काही आवडीचा विषय असूच शकत नाही. त्यामुळे त्यांच्याकडून कर रुपात राज्य शासनाला मिळणारा महसूल ही बंद आहे. केंद्र शासनाकडून जीएसटीची काही हजार कोटी रुपयांची रक्कम मिळणे बाकी आहे. या सर्व आर्थिक अडचणींची शासनाला जाणीव आहे म्हणूनच मर्यादा पाळून आणि जबाबदारीचे भान ठेऊन व्यवहार सुरळीत करण्याचा आपला प्रयत्न आहे.

माझे कुटुंब माझी जबाबदारी, तशीच तुमचीही

राज्य शासनाने ‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’ हे अभियान राबविण्यास सुरुवात केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. ते म्हणाले की, संपूर्ण महाराष्ट्र हे माझं कुटुंब आहे, त्यात हॉटेल-रेस्टॉरंट व्यवसायीक ही आलेच. जशी माझी जबाबदारी इतरांप्रमाणे तुमच्याप्रती आहे तशीच तुमची जबाबदारी ही तुमच्या ग्राहकासाठी आणि तुमच्या रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांप्रती आहे. कोरोनामुळे कोरोना योद्धे ही बाधित झाले आहेत, दुर्देवाने काही जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जी गोष्ट आपण सुरळीत करू ती अतिशय काळजीपूर्वक, जबाबदारीचे भान ठेऊन सुरु करत आहोत. त्याचदृष्टीने रेस्टॉरंट व्यवसायिकांसाठी एसओपी तयार करण्यात आली आहे. ती त्यांना अडचणीत आणण्यासाठी नक्कीच नाही.

- Advertisement -

कोरोना सोबत जगताना आता आपल्या प्रत्येकाला आपल्या जीवनशैलीत बदल करावा लागणार आहे. म्हणजे काय तर मास्क लावणे, हात धुणे,  शारीरिक अंतर राखणे अत्यंत महत्वाचे ठरणार आहे. रेस्टॉरंट सुरु करताना या तीनही गोष्टींची अत्यंत काळजी घेणे अत्यावश्यक ठरणार आहे रेस्टॉरंटमधील शेफ, सेवा देणारे व इतर कर्मचाऱ्यांची आरोग्यविषयक काळजी घेणे महत्वाचे राहणार आहे. मास्क लावणे, हात धुणे गरजेचे आहे. रेस्टॉरंटची सुरक्षितता आणि स्वच्छता या दोन्ही गोष्टी महत्वाच्या राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

कोरोना विषाणूने बाधित ८० टक्के लोकांना लक्षणे दिसून येत नसली तरी त्यांच्याकडून विषाणूचा प्रसार होऊ शकतो जी बाब गंभीर आहे हे स्पष्ट करून मुख्यमंत्री म्हणाले की, एसओपीचे पालन, स्वच्छता, सुरक्षितता, शारीरिक अंतर पाळणे ही रेस्टॉरंटसाठीची रेसीपी आहे. आपले नाते विश्वासाचे असल्याचेही सांगतांना महाराष्ट्राला आपलं कुटुंब मानणारी प्रत्येक व्यक्ती या जबाबदारीचे भान ठेऊन यात सहभागी होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला तसेच सर्वांनी एकत्रित बसून मार्गदर्शक तत्वे अंतिम करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या. सर्व रेस्टॉरंट व्यवसायिकांची पुन्हा एकदा बैठक घेऊन एसओपी फायनल करू असे गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी यावेळी सांगितले.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -