घरमहाराष्ट्रतलवारी चालवून लोकांना रोजगार, उद्योग मिळणार असेल तर तसं सांगावं

तलवारी चालवून लोकांना रोजगार, उद्योग मिळणार असेल तर तसं सांगावं

Subscribe

राज्यातील मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर मराठा आरक्षणचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मराठा समाज आरक्षणासाठी पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे. तुळजापूरमध्ये मराठा क्रांती ठोक मोर्चा काढण्यात आला. यावेळी कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी आम्हाला कायदा हातात घेण्याची वेळ आणू देऊ नका, वेळ आली तर तलवार पण काढेन, असं वक्तव्य केलं होतं. यावर आता शिवसेनेने ‘सामना’ या मुखपत्राच्या अग्रलेखातून संभाजीराजेंना सवाल केला आहे.

मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिल्यानंतर पोलीस भरती करू नये, नोकर भरतीसाठीच्या ‘MPSC’सारख्या परीक्षा घेऊ नयेत, अशी मागणी मराठा संघटनांनी केली होती. त्यानंतर मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचं नेतृत्व करणारे भाजपचे राज्य सभेतील खासदार कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांनी MPSC परीक्षा रद्द करण्याची मागणी करत ‘वेळ आल्यास तलवारी काढू’, असा इशारा दिला होता. यावर सामनाच्या अग्रलेखात “जातीय आरक्षणांसाठी महाराष्ट्रात तलवारी उपसण्याची भाषा सुरू आहे. अशी भाषा करणारे राज्यातील तालेवार लोक आहेत. आता दसराही येत आहे. त्यामुळे शमीच्या झाडावर ठेवलेली शस्त्र नेमकी कोण काढतंय, शस्त्र कोणावर चालवली जातील, ते पाहावेच लागेल,” असं म्हटलं आहे.

- Advertisement -

“प्रकाश आंबेडकर यांची जीभ घसरली व म्हणाले, ‘एक राजे बिनडोक आहेत, तर दुसऱ्या राजांचे आरक्षण सोडून वेगळेच काही चालले आहे.’ कोल्हापूर व सातारचे ‘राजे’ मराठा आरक्षणात उतरले आहेत. त्यावर श्री. आंबेडकर यांनी हे विधान केले. प्रश्न कोणी बिनडोक असण्याचा किंवा तलवारी चालविण्याचा नाही. जिभेची तलवारबाजी लोकं फार काळ सहन करतील अशी स्थिती नाही. राज्याचे प्रश्न वेगळे आहेत व त्यावर कोणी गांभीर्याने बोलायला तयार नाही. राज्यातील दोन घटनांकडे आम्ही गांभीर्याने पाहत आहोत. पहिली घटना पिंपरी शहरातली आहे. पगारात भागत नसल्याने दोन उच्चशिक्षितांनी एटीएम मशीन फोडली व मोठी रक्कम लुटण्यात आली. दुसरी घटना नाशिकची आहे. सव्वादोनशे रुपये पगार झाल्याने एसटी कर्मचाऱ्यांने आत्महत्या केली. या दोन्ही घटना राज्यातील सध्याच्या स्थितीचे प्रातिनिधिक स्वरूप आहे. कोरोना व लॉक डाऊनचे हे ‘साइड इफेक्ट’ आहेत. लोकांचा रोजगार पूर्णपणे गेला आहे. त्यामुळे घर, संसार चालविण्यासाठी, पोराबाळांचे पोट भरण्यासाठी समाजातील पांढरपेशा वर्ग गुन्हेगारीचा मार्ग स्वीकारू लागला आहे. मुंबई, ठाण्यासारख्या शहरांत मंगळसूत्र चोरीच्या गुन्ह्यांत गेल्या महिनाभरापासून वाढ झाली आहे. हे त्याचेच लक्षण आहे.”

“आता अनलॉक काळात राज्यातील काही हजार उद्योग उघडल्याचे सांगितले जाते, पण त्याचा लाभ किती लोकांना झाला? जर पन्नासेक टक्के लोकांच्या क्षमतेने उद्योग सुरू झाले असतील तर उरलेल्या पन्नास टक्के लोकांच्या उपाशी पोटाची, त्यांच्या पोराबाळांची काय व्यवस्था सरकार करणार आहे? या गरीब लोकांच्या घरात जे किडूकमिडूक होते ते आता संपले. त्यामुळे एकतर आत्महत्या करणे नाहीतर गुन्हेगारीचा मार्ग पत्करून जिवंत राहणे, हाच मार्ग त्यांच्यासमोर आहे. सीमेवर चीनचे 60 हजार सैनिक जमा झाले आहेत व आपले सैनिक त्यांना चोख उत्तर देतील, पण त्यामुळे गोरगरिबांच्या पोटापाण्याचे, रोजगाराचे प्रश्न सुटणार नाहीत. लोकांना रोजगार हवा आहे. लोकांना जगायचे आहे. पोराबाळांना कसेही करून जगवायचे आहे,” असं अग्रलेखात म्हटलं आहे.

- Advertisement -

“‘रेस्टॉरंट’ सुरू करताच पोलिसांनी हॉटेलवर धाडी टाकायला सुरुवात केली. गोरेगावच्या एका बारमध्ये ११ बारबाला नृत्य करतात. अशातच हा बार उशिरापर्यंत सुरू होता, असे पोलिसांचे म्हणणे आहे. ते खरे आहे, पण हा जो मोठा वर्ग याच व्यवसायावर जगत होता, तो सात-आठ महिन्यांपासून कसाबसा अर्धपोटी अवस्थेत जिवंत राहिला आहे. आता त्यांच्या रोजगार व पोटापाण्याची व्यवस्था सरकार किंवा प्रशासन करू शकेल काय? मुंबई-पुण्यासारख्या शहरांत रोजगार देणारा प्रत्येक व्यवसाय पुढचे सहा महिने चालू राहील, याची काळजी घेतलीच पाहिजे. कायद्याचे पालन कोण किती करतो यावर बोलायचे म्हटले तर अनेकांचे वस्त्रहरण होईल. जगा आणि जगू द्या या मंत्रानेच सगळ्यांना जगविता येईल. तलवारी चालवून लोकांना रोजगार, उद्योग मिळणार असेल तर तसे सांगावे,” असा सवाल शिवसेनेने केला आहे.


हेही वाचा – Hathras Rape Case: आज लखनऊ खंडपीठासमोर होणार सुनावणी; कडेकोट पोलीस बंदोबस्तात पीडितेचे कुटुंब रवाना


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -