शरद पवार आमचे ‘बिग बी’ – जितेंद्र आव्हाड

'राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे आमचे अमिताभ बच्चन आहेत', असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.

Pune
sharad pawar and jitendra awhad
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड

आक्रमकपणे विरोधकांवर टीका करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ‘राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे आमचे अमिताभ बच्चन आहेत’, असे प्रतिपादन केले आहे. जितेंद्र आव्हाड एका कार्यक्रमानिमित्त पुण्यात आले होते. त्या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधत असताना जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवार यांच्याबाबत हे उद्गार काढले आहे. ‘शरद पवार हे आमचे अमिताभ बच्चन आहेत. त्यांनी वयाची ७५ वर्षे उलटून गेल्यावरही ते अजूनही त्या उत्साहाने काम करत आहेत. त्यांचा या कामाची सगळ्याच तरुणांना भुरळ पडली आहे. वयाच्या ३५ वर्षांपासून शरद पवार यांच्यावर टीका केली जात आहे. यापूर्वी बाळासाहेब ठाकरे आणि गोपीनाथ मुंडे हे शरद पवारांवर टीका करत होते आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे देखील टीका करत आहेत. याचाच अर्थ हा आहे की, महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आजही शरद पवार आहेत’, असेही आव्हाड यांनी स्पष्ट केले आहे.

निवडणूक जिंकणे हाच भाजपचा उद्देश

पुण्यात एका कार्यक्रमात जितेंद्र आव्हाड बोलत होते. त्यावेळी ते पुढे म्हणाले की, ‘शरद पवार यांच्यावर प्रेम करा किंवा त्यांचा तिरस्कार करा. मात्र, तुम्ही त्यांना टाळू शकत नाही’. एवढेच नाहीतर त्यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील टोला लगावला आहे. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाकिस्तानची साखर चालते, कांदा चालतो, नवाज शरीफला दिलेली अचानक भेट, बिर्याणी सगळे चालते आणि इथे येऊन फक्त पाकिस्तानवर टीका करायची. निवडणूक जर महाराष्ट्राची आहे. तर, शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, बंद झालेले एक लाखापेक्षा जास्त कारखाने या सगळ्या विषयांवर मोदी केव्हाच काही का बोलत नाही’, असा प्रश्न आव्हाड यांनी विचारला आहे. इतकेच नाही तर ‘राज्यातल्या एकाही प्रश्नावर मोदींनी कोणतेही भाष्य केलेले नाही. त्याचप्रमाणे यंदा मुसळधार पावसामुळे सोलापूर, कोल्हापूर याठिकाणी मोठा महापूर आला. त्याचा साधा उल्लेखही मोदींनी आपल्या भाषणात केलेला नाही. यावरुन भाजपचा फक्त निवडणूक जिंकण्याचा उद्देश असल्याचे दिसून येत आहे’, असेही आव्हाड यावेळी म्हणाले आहेत.

आव्हाडांची युतीबाबत बोचरी टीका

यावेळी पत्रकरांनी शिवसेना आणि भाजपाबाबत प्रश्न विचारला असता शिवसेनेला १०० जागा दिल्या तरीही ते युती करतील, नाहीतर पक्ष फुटेल, अशी देखील त्यांना भीती असल्याची बोचरी टीका आव्हाड यांनी यावेळी केली आहे. त्याचप्रमाणे शरद पवारांइतके अजित पवार चर्चेत नाहीत, असे विचारले असता, ‘शरद पवार आमचे अमिताभ बच्चन आहेत, मात्र आमचा पक्ष म्हणजे काही मल्टिस्टार सिनेमा नाही’, असेही मिश्कील उत्तर त्यांनी यावेळी दिले आहे.


हेही वाचा – ठाकरे म्हणतात ठरलंय, पाटील म्हणतात ठरायचंय; मग युतीचा फॉर्म्युला तरी कोणता?