घरमहाराष्ट्रमुख्यमंत्र्यांची यशस्वी मध्यस्थी शिर्डीकरांचे समाधान, बंद मागे

मुख्यमंत्र्यांची यशस्वी मध्यस्थी शिर्डीकरांचे समाधान, बंद मागे

Subscribe

लवकरच पाथरीकरांची घेणार बैठक

साईबाबा यांच्या जन्मस्थळाच्या मुद्द्यावरुन सुरु झालेला वादात अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी यशस्वी मध्यस्थी केली. त्यामुळे आता शिर्डीकरांनी पुकारलेला बेमुदत शिर्डी बंद मागे घेण्यात आला असल्याची घोषणा भाजपाचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. दरम्यान,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे लवकरच पाथरीकरांची देखील भेट घेणार असून त्यानंतर ते अंतिम निर्णय जाहीर करतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष पाथरीकांच्या बैठकीवर लागून राहिले आहे.

गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या साई जन्मस्थळाच्या वाद पेटला आहे. यामुळे शिर्डीत बंदची हाक देखील देण्यात आली होती. याप्रश्नी सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सह्याद्री अतिथीगृहात विशेष बैठक बोलाविली होती. या बैठकीला मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री अजित पवार, महसुल मंत्री बाळासाहेब थोरात, खासदार सदाशिव लोखंडे, आमदार राधाकृष्ण विखे-पाटील, शिर्डी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर आदींसह शिर्डी ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी शिर्डीच्या ग्रामस्थांनी पाथरीच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास हरकत नसल्याचे जाहीर केले.

- Advertisement -

पाथरीला तीर्थक्षेत्र म्हणून विकसित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. जन्मस्थळाचा वाद कशासाठी, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. जवळपास ३० जणांचे शिष्टमंडळ यावेळी उपस्थित होते. या बैठकीनंतर राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, या बैठकीत आमच्या शिष्टमंडळाचे समाधान झाले असून आम्ही आमचे आंदोलन मागे घेत आहोत. तर शिर्डीचे शिवसेना खासदार सदाशिव लोखंडे मुख्यमंत्र्यांनी जन्मस्थळाबाबतचे आपले विधान मागे घेतल्याचे सांगितले. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा मुख्यमंत्री कार्यालयाकडून करण्यात आलेले नाही. पाथरी येथील तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला औरंगाबाद येथील बैठकीत मंजुरी मिळाली आहे.

या पार्श्वभूमीवर या विकास आराखड्यास हरकत नसल्याचे शिर्डीच्या ग्रामस्थांनी बैठकीत जाहीर केले आहे. तर शिर्डी ग्रामस्थांची भूमिका मांडताना साईभक्तांच्या भावना लक्षात घेऊन बंद पाळला. यापूर्वी जन्मस्थळाबाबत शासनाची कुठलीच भूमिका नव्हती, अशीच भूमिका आता असावी असा मुद्दा आमदार विखे- पाटील यांनी बैठकीत मांडला. बैठकीत मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, ग्रामस्थांनी श्रद्धा आणि सबुरी ठेवावी. औरंगाबाद येथे झालेल्या विभागीय बैठकीत आपण पाथरीच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला मंजुरी दिली आहे. त्यामुळे या भागाचा देखील विकास व्हावा, अशी भूमिका आहे. मुख्यमंत्र्यांच्या या यशस्वी मध्यस्थीनंतर पाथरीच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला आमची हरकत नसल्याचे शिर्डीच्या ग्रामस्थांनी यावेळी स्पष्ट केले.

- Advertisement -

नेमका वाद काय?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद येथील एका कार्यक्रमात ‘साईबाबांचे जन्मस्थळ असलेल्या पाथरी गावाचा शंभर कोटींचा विकास आराखडा तयार आहे’ असे वक्तव्य केले होते. याच वक्तव्यावरुन शिर्डीकर आक्रमक झाले होते. त्यानंतर शिर्डी ग्रामस्थांनी बंदची हाक दिली. पाथरीच्या विकासाला विरोध नाही तर मुख्यमंत्र्यांकडून पाथरी ही साईबाबांची जन्मभूमी असल्याचा उल्लेख केला, त्याला विरोध असल्याचे ग्रामस्थांनी या अगोदर सांगितले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -